स्मार्ट सिटीच्या कामांची न्यायिक अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा

0
2

काँग्रेसची पत्रकार परिषदेद्वारे मागणी

पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे करदात्यांच्या पैशाची खुलेआम लूट केली जात आहे. स्मार्ट सिटीच्या कामांची न्यायिक अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.
यावेळी सरचिटणीस विजय भिके, उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आणि पणजी गटाच्या महिला अध्यक्ष लविनिया डिकॉस्ता यांची उपस्थिती होती.

‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड’च्या मंडळ सदस्यांचा सुमारे 1140 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते गोम्स यांनी केला. पणजीचे भाजप आमदार आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजी ‘स्मार्ट सिटी’चे सुरू असलेले काम दर्जाहीन असल्याचे मान्य केले आहे. बाबूश मंत्री असल्याने ते या सरकारचा भाग आहे, म्हणून जेव्हा सरकारने भ्रष्टाचार कबूल केला तेव्हा संबंधितांवर एफआयआर नोंदवला गेला पाहिजे, असेही गोम्स यांनी सांगितले.

सायकल रॅलीचे आयोजन
पणजी शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे योग्य पद्धतीने झालेली नसल्याने पावसाळ्यात काही अनुचित घडू प्रकार शकतात. यासाठी काँग्रेस पक्ष कामाची पाहणी करण्यासाठी आणि शहरातील धोकादायक ठिकाणांबद्दल जागरूकता करण्यासाठी ‘पणजी शहर दर्शन’ नावाची सायकल रॅली आणि चालण्याची सहल आयोजित करणार आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी सांगितले.

‘स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना जनतेच्या पैशाची खुलेआम लूट सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबतचे सर्व अधिकार स्मार्ट सिटी मंडळाकडे आहेत. मुख्य सचिव, जे राज्याचे मुख्य दक्षता अधिकारी आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सरकार कोणावर कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार बाबूश मंडळावर आहेत आणि त्यांचा महापौर मुलगासुद्धा मंडळावर आहे, असे गोम्स यांनी सांगितले. या कथित भ्रष्टाचारप्रकरणात कारवाईची करण्याची गरज आहे. मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असताना विकासाची माहिती जनतेला देणे हे संबंधित मंडळाचे कर्तव्य आहे, असेही गोम्स यांनी सांगितले.