स्मार्ट सिटीचे काम महापौरांनी बंद पाडले

0
107

महापौर उदय मडकईकर यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत कांपाल येथे बालभवनाच्या समोरील पदपथावर पदपथ खोदून केबल घालण्याचे काम काल सकाळी बंद पाडले. दरम्यान, महापौर मडकईकर आणि काही नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांना घेराव घालून पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने मनपा क्षेत्रात सुरू असलेली सर्व कामे बंद करण्याची मागणी केली.

महानगरपालिका क्षेत्रात ३० एप्रिलनंतर कोणतेही काम न करण्याची सूचना करण्यात आली होती. तथापि, कांपाल येथे पदपथ फोडून केबल घालण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्याने महापौर मडकईकर यांनी तिथे धाव घेऊन काम बंद करण्याची सूचना केली. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी ठेकेदाराचे सामान जप्त केले. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली जात नाही. महानगरपालिकेकडून मान्यता न घेता रस्त्यावर खोदकाम केले जात असल्याने पावसाळ्यात गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० एप्रिलनंतर रस्ता खोदण्याचे काम न करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या कामांना
जिल्हाधिकार्‍यांची मान्यता
मनपामध्ये महापौर आणि आयुक्त यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिली असून १५ मे पर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त शशांक त्रिपाठी यांनी दिली.