झुआरीनगर येथील झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील तीन कंत्राटी कामगारांच्या मृत्यूप्रकरणी काल दुपारी कंपनीच्या पाच अधिकारी व कर्मचार्यांना वेर्णा पोलिसांनी अटक केली. तसेच बुधवारी अटक केलेल्या बोकारो इंडस्ट्रीयल वर्क्स कंपनीच्या साईट सुपरवायझर ए. प्रधान याची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, तिन्ही मृत कामगारांचे नातेवाईक गोव्यात दाखल झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या संबंधित अधिकार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक बी. एस. उसगावकर, सुरक्षा व्यवस्थापक जी. एस. लोटलीकर, सुरक्षा अधिकारी आर. जे. सिराटे, सुरक्षा कर्मचारी एस. बिचोलकर आणि एम. प्रभुदेसाई या कंपनीच्या पाच अधिकारी व कर्मचार्यांना वेर्णा पोलिसांनी काल अटक केली. वेर्णा पोलिसांनी तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकार्यांवर विविध कलमांखाली गुन्हे नोंद केले आहेत.
या भीषण स्फोटात मृत पावलेल्या इंद्रजीत घोष (पश्चिम बंगाल), रंजन चौधरी (बिहार), अवकाश करण सिंग (पंजाब) या तिघांचेही नातेवाईक काल सकाळी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी वेर्णा पोलीस स्थानक गाठले. रितसर चौकशी केल्यानंतर या तिन्ही मृतदेहांची मडगाव हॉस्पिसिओत शवचिकित्सा केल्यानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.