स्त्री-शक्तीचा जागर म्हणजेच नवरात्रोत्सव

0
1016

– सौ. लक्ष्मी जोग

अश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून देवी नवरात्र सुरू होते. आदिशक्ती दुर्गा! हिची नऊ दिवस नऊ रूपांमधून साग्रसंगीत पूजा करतात. जणू निसर्गरूपी देवी नऊ रूपांनी आपल्यासमोर ठाकते.

आपले पूर्वज अतिशय प्रगल्भ विचारांचे व अभ्यासू होते. म्हणूनच प्रत्येक सणात त्या कालावधीतील फुले, पत्री, फळे मोठ्या गौरवाने देवीदेवतांना अर्पण करून त्यांची महती व्यक्त करण्याची अतिशय सुंदर व्यवस्था त्यांनी योजिली. त्यामुळे देव, निसर्ग व मानव यांच्यात एक अनुपम नातं निर्माण झालं. शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही माणसाच्या आरोग्याला, मनाला त्यापासून मोठाच लाभ होतो हे अभ्यासातून त्यांनी सिद्ध केलं.

गोव्यातला श्रावणमास जाई-जुईंच्या सुगंधाने घमघमलेला असतो. घराघरांत व्रतवैकल्ये, मंदिरातून भजन-कीर्तन-प्रवचनांमधून भक्तिरस वाहत असतो. कुठेही गेलात तरी मुली-बायकांच्या केसांत जाईचे गजरे झुलत असतात. मैत्रिणींचे घोळके मंगळागौरीसाठी, नागांसाठी, आदित्यासाठी हिरवीगार पत्री काढून आपल्या परड्या भरतात. घरात आई, आजी, वहिनी वाती-वस्त्रे करण्यात मग्न असतात. ही तयारी पुढे येणार्‍या चतुर्थी व नवरात्रासाठी आधीपासूनच करत असतात. कारण चतुर्थीतील श्री गणरायाच्या आगमनाच्या उत्सवामुळे वेळ कसा तो मिळणार नसतो. हां हां म्हणता गणरायाला निरोप देऊन पितरांची शांती होते न होते तोवर अश्‍विन महिना लागतोसुद्धा!
निसर्गाच्या अनोख्या विभ्रमातच अश्‍विन महिना सुरू होतो. पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली असली तरी सगळीकडे हिरवाईचे साम्राज्य असतेच. शेते मात्र पिकून पिवळीधमक झालेली दिसतात. त्यामुळे आनंदाला भरती येते. अश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून देवी नवरात्र सुरू होते. आदिशक्ती दुर्गा! हिची नऊ दिवस नऊ रूपांमधून साग्रसंगीत पूजा करतात. जणू निसर्गरूपी देवी नऊ रूपांनी आपल्यासमोर ठाकते. प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात शिवाय सार्वजनिक ठिकाणी तिचा उत्सव साजरा करतात.
प्रत्येक घरात कुलधर्म कुळाचाराप्रमाणे जी परंपरा आहे त्यानुसार नवरात्र असतं. कुणाकडे रोज सुवासिनी तर कुणाकडे ब्राह्मण-सुवासिनी तर कुणाकडे सुवासिनी-कुमारिका अशी जेवायला बोलवण्याची पद्धत आहे. शिवाय देव्हार्‍यात फुलांच्या माळा बांधायच्या असतात. कुणाकडे रोज एक माळ तर कुणाकडे चढत्या माळा बांधतात. म्हणजे पहिल्या दिवशी एक माळ तर दुसर्‍या दिवशी दोन माळा बांधायच्या. अशा वाढवत दसर्‍याच्या दिवशी दहा माळा बांधायच्या. कुणाकडे रुजवण घालायची पद्धत असते तर कुणाकडे देवीचा गोंधळ घालतात. हे झालं घरच्या नवरात्राचं स्वरूप.
गोव्यातील देवालयांत तर नवरात्रोत्सवात फुलांची मनोवेधक सजावट, मखरात देवीला बसवून ते हलवणे, कीर्तन-भजन-प्रवचन यांचा जणू महोत्सवच असतो. नवरात्रातले नऊ दिवस म्हणजे जगदंबेच्या भक्तीची पर्वणीच! घरातली दिवसभराची कामे उरकून घरातली लहान-मोठी माणसे मंदिरात कीर्तन ऐकायला, मखर डोलवायला गेल्याशिवाय राहत नाहीत. नवरात्रीच्या निमित्ताने परिसर दुमदुमून गेलेला असतो.
पुराण काळात महिषासुर, चंड-मुंड वगैरे राक्षस खूप मातले होते. लोकांना छळून त्यांना जीवन नकोसं केलं होतं. सर्वशक्तिमान देवांनीसुद्धा त्यांच्यापुढे हात टेकले होते. अशा परिस्थितीत सर्व देव आदिशक्तीला शरण गेले. त्यावेळी देवीने नऊ दिवस अहोरात्र युद्ध करून त्या राक्षसांना मारले. पृथ्वी संकटमुक्त केली. लाखो राक्षस देवीच्या भयाने पाताळात पळून गेले. देवीने म्हणजे एका स्त्री-शक्तीने जगावरचं अरिष्ट दूर केलं. पुराणकाळात असं अनेकदा घडल्याचे दाखले सापडतात. म्हणूनच तर त्या आदिशक्तीची मंदिरे बांधून तिचा सलग नऊ दिवस उत्सव साजरा करतात. तिची स्तुती-स्तोत्रे गातात. अशीच शक्ती काही अंशी स्त्रीमध्ये असते… जी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले कुटुंब सावरते, सामाजिक बांधीलकी जपून समाजाला दिशा देते.
नवरात्रात भगवती आदिशक्तीचे ज्या नऊ रूपात पूजन करतात त्यांची आपण थोडक्यात माहिती पाहू.
१. पहिल्या दिवशी घटस्थापना होते. या दिवशी आदिशक्ती दुर्गेला ‘‘शैलपुत्री’’ हे नामाभिधान आहे. शैल म्हणजे पर्वत. पर्वताची कन्या म्हणून शैलपुत्री! पार्वती! ही द्विभुजा असते. ही अतिशय मोहक रूपात वृषभावर स्वार झालेली असते.
२. दुर्गेचे दुसरे रूप सकल विश्‍वात सत्-चित्-आनंदस्वरूप आहे. ब्रह्म प्राप्त करून देणारी म्हणून तिला ‘‘ब्रह्मचारिणी’’ असे नाव आहे. ती वेदस्वरूप, तत्वस्वरूप व तपस्वरूप आहे. पांढरे शुभ्र वस्त्र नेसलेली, उजव्या हातात जपमाळा तर डाव्या हातात कमंडलू घेतलेली आहे. देवीचे स्वरूप ज्योतिर्मय व भव्य आहे. भक्तांना अनंत शुभ फळे देणार्‍या या दुर्गेचे दुसर्‍या दिवशी पूजन करतात.
३. देवीचे तिसरे रूप म्हणजे ‘‘चंद्रघंटा’’. हे रूप निर्वेदात्मक, आल्हाददायी व शांत आहे. ही दशहस्ता आहे. हिची कांती सुवर्णाप्रमाणे लखलखायमान आहे. तिच्या हातात कमळ, धनुष्यबाण, त्रिशूल, गदा आणि खड्‌ग ही शस्त्रे आहेत. या शक्तीच्या उपासनेने अलौकिक वस्तूंचे दर्शन व दिव्य सुगंधाची अनुभूती येते.
४. ही जगदंबा अष्टभुजा आहे. त्रिविधताप भयाने युक्त संसार भक्षण करणार्‍या या रूपाला ‘‘कुष्मांडा’’ म्हणतात. कुष्मांड म्हणजे कोहळा. तो देवीला आवडतो. हाच कोहळा नवचंडी अनुष्ठानात होमहवनात अर्पण करतात. चौथ्या दिवशी दुर्गेच्या या रूपाचे पूजन होते.
५. देवीच्या या रूपाला ‘‘स्कंदमाता’’ म्हणतात. शक्ती, स्फूर्ती आणि उत्साह प्रदायी असे या रूपाचे त्रिविध स्वरूप आहे. ‘स्कंद’ हे कार्तिकेयाचे नाव. ही देवी चतुभूर्जा आहे. दोन हातात कमलपुष्प, एका हाताची वरमुद्रा व एका हाताने स्कंदाला धरलेले आहे. वर्ण शूद्र आहे. ती कमळावर विराजमान आहे. सिंह हे तिचे वाहन आहे. तिच्या उपासनेने बाह्यक्रिया व चित्तवृत्ती नाहीशी होते.
६. भगवतीच्या या रूपाला ‘‘कात्यायनी’’ म्हणतात. हे रूप वृद्ध मातेप्रमाणे सर्वांचा प्रतिपाळ करणारे, संगोपन करणारे आहे. ‘कत’ नावाच्या ऋषी गोत्रात ती निर्माण झाली. म्हणून तिला कात्यायनी हे नाव आहे. हीसुद्धा चतुर्भूजा आहे. उजवा हात अभयमुद्रेत तर दुसरा हात वर मुद्रेत आहे. तसेच एका हातात तलवार व दुसर्‍यात कमलपुष्प आहे. ती सिंहावर आरूढ आहे. हिच्या उपासनेने धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अलौकिक तेज प्राप्त होते.
७. देवीच्या या सातव्या उग्र रूपाला ‘‘कालरात्री’’ असे म्हणतात. सर्व संहारक, प्रलयंकारी असे हे रूप! कालरात्री म्हणजे ‘‘रौद्री तपोरता देवी, तामसी शक्तिरुत्तमा| संहारकारिणी नाम्ना कालरात्रींच तां विदुः|’’
भयंकर रूप धारण केलेली, तपश्चर्येत रममाण, संहारक अशी ही तामसी शक्ती! ही चतुभूर्जा आहे. उजव्या हातांची वरमुद्रा व अभयमुद्रा आहे. डाव्या हातात तलवार व लोखंडाचा कांटा आहे. गर्दभ हे तिचे वाहन आहे. दिसायला भितीदायक असली तरी शुभफल देणारी आहे. हिला ‘‘शुभंकरी’’ म्हणूनही ओळखतात.
८. देवीच्या आठव्या रूपाला ‘‘महागौरी’’ नाव आहे. हे रूप कुमारिकेप्रमाणे अल्लड, नाचणारे, बागडणारे चंचल आहे. वाहन बैल व ती चतुर्भूज आहे. उजव्या हातात त्रिशूल व अभय मुद्रा. डाव्या हातात डमरू व वरमुद्रा. चेहरा शांत, भक्तांचे किल्मिश दूर करणारी. हिच्या उपासनेने पूर्वसंचित व पाप जाते. संताप व दैन्य, दुःख येत नाही. भक्ताला अक्षय पुण्य मिळते. हिच्या कृपेने अलौकिक सिद्धी प्राप्त होते. अशक्य काम शक्य होते. अंबिका देवी पार्वतीच्या शरीर कोषातून प्रकट झाली असे सांगतात.
अष्टमीच्या या रूपाला महालक्ष्मी असेही म्हणतात. आठव्या दिवशी ही सकाळी कुमारिका, दुपारी तरुणी व रात्री वृद्धेच्या रूपात दर्शन देते. ब्राह्मण समाजात हिचे महालक्ष्मी व्रत करतात. घागरींची फुगडी घालून रात्र जागवणे हे या व्रताचे वैशिष्ट्य आहे. दुपारी मंगळागौर पुजून रात्री तांदळाच्या पिठापासून देवीचा मुखवटा करून तिला शालू नेसवतात. दागदागिने, फुलांचे गजरे घालतात. फुलांची नयनरम्य सजावट करतात. फराळ असतो. पहाटे विसर्जन करतात.
९. दुर्गेचे नववे रूप म्हणजे ‘‘सिद्धिदात्री’’! सकल मनोरथ पूर्ण करणारे हे मोक्षदायक स्वरूप! हिचा उल्लेख सिद्धिदा असाही आहे. पुरुषार्थाची कृतार्थता मोक्षाने होते. तो मोक्ष देणारी व अष्टसिद्धी देणारी म्हणून सिद्धिदात्री. चतुर्भूजा व कमळावर आरूढ झालेली. देवीने आपल्या विविध रूपात महिषासुर, चंडमुंड, रक्तबीज अशा अगणित असुरांचा वध केला. शुंभ-निशुंभांचा वध केला. तेव्हापासून भगवती अंबिकाच जगताचं पालनपोषण करीत आहे. असा तिच्या भक्तांना विश्‍वास आहे.
नवव्या दिवशी घनघोर युद्धात दैत्यांचं निर्दालन करणारी दुर्गा विजयी मुद्रेने भक्तांना दर्शन देते. सर्व देव तिच्यावर पुष्पवर्षाव करतात. संकटमुक्त झालेले भक्त देवीची मनोभावे पूजा करून तिची अत्यानंदात मिरवणूक काढतात. त्यावेळी सुवासिनी साजशृंगार करून महामायेची आरती करतात.
आरती – महिषासुरासि मर्दुनी अंबा बैसली सिंहावरी| मातुलिंग गदा उजवे करी| करवीर क्षेत्री श्री जगदंबा सर्व जनांची आई| तारि हो तारी अंबाबाई ॥
डावे भुजेवरी चक्र घेऊनी निघाली ग दैत्यावरी| गदा ओपिली मस्तकावरी| दैत्य मर्दुनी भक्त रक्षिले| तारि ग अपुले पायी | प्रतापे थोर अंबाबाई ॥
मंगळवारी निघता फेरी वाद्यांचा गजर | अंबा ती बैसली सिंहावर | साधुसंत हे सर्व मिळोनी अंबारी हत्तीवर | आंत बैसले विठोबावीर | हरिनामाचा गजर ऐकुनी | पुढे धांवती स्वार | निशाणे लाविली प्रयागावर दोन्ही बाजूंनी नळ वाहती पुढे हौदावर पाय| भोवती हिंडती सवत्सा गाई ॥
तुझी कीर्ति मी ऐकुनी आलो | करशील अंगिकार | म्हणुनी आलो करविरावर | सत्य कराया भक्त प्रतिज्ञा, तारी भवसागर | असा हा लाभे भक्तांवर | अखंड वाहे कृष्णाबाई श्री दत्तगुरूचे पायी | तुझे चरणी नर्मदा बाई ॥
आपल्या देशात दुर्गापूजेची मोठी परंपरा बंगालमध्ये आहे. आपल्याकडे गणेशोत्सव जसा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तसाच तिथे दुर्गापूजेचा उत्सव होतो. हल्ली गोव्यातसुद्धा दुर्गापूजेचा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करू लागले आहेत. या सगळ्यापेक्षा प्रत्येक मंदिरातून जे नवरात्र असते ते पाहण्यासारखे असते. त्याला एक आगळे वेगळे पावित्र्य असते.
विद्येची देवता श्री शारदा! नवरात्रीमध्ये शारदोत्सवही साजरा करतात. शाळेत श्रीसरस्वतीची स्थापना करतात व त्या निमित्ताने अनेक ज्ञानवर्धक कार्यक्रम आयोजित करतात. तसेच मनोरंजक कार्यक्रम करून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतात. सरस्वतीपूजनाच्या दिवशी घरोघरी पवित्र ग्रंथांची पूजा करतात. नवव्या दिवसाला ‘‘घट्‌ग नवमी’’ असे म्हणतात. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करतात. ही पूजा झाल्यानंतर दहाव्या दिवशी दसर्‍याला शस्त्रे बाहेर काढून त्यांचा यथोचित उपयोग करतात. महाभारत काळात पांडवांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती कारण ते अज्ञानवासात गेले होते. शेवटी दसर्‍याच्या दिवशी येऊन ते ती शस्त्रे काढतात व युद्धासाठी सज्ज करतात. त्या दिवसाची आठवण म्हणून शस्त्रांचे पूजन करतात. दसर्‍याला सीमोल्लंघन करून सोने लुटायचे. हा उत्सव अनेक मंदिरातून होतो.
श्रावणापासून सुरू झालेली सण-उत्सवांची मालिका दसर्‍यापर्यंत अविरत चालूच असते. या ना त्या निमित्ताने आपण निसर्गरुपी शक्तिदेवतेचं पूजन करतच असतो. या देवतेला असंख्य नावे आहेत. कधी ती विद्येची देवता म्हणून वीणा पुस्तक धारिणी, हंस वाहिनी किंवा सरस्वती म्हणून पूजतो तर कधी चामुंडेश्‍वरी या नावाने तिचं रौद्र रूपाची पूजा करतो. कधी तुळजाभवानी तर कधी महिषासुर मर्दिनी. कधी कालीमाता तर कधी माहेश्‍वरी! भक्तांच्या कल्याणासाठी ती कधी चतुर्भूजा होते तर कधी षड्‌भूजा, कधी अष्टभूजा तर कधी दशभूजा तर कधी सहस्त्रभूजा सुद्धा!! घटस्थापनेला नऊ धान्यांचं रुजवण मातीत पेरून त्याच्या मधोमध घट स्थापन करतात. महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी या रूपातल्या त्या कलशावर रोज फुलांच्या माळा बांधतात. षोडषोपचारे त्यांची पूजा होते. तिथे नंदादीप तेवत ठेवतात. नऊ दिवसात पेरलेल्या धान्याला अंकुर आलेले असतात.
आपले पूर्वज अतिशय प्रगल्भ विचारांचे व अभ्यासू होते. म्हणूनच प्रत्येक सणात त्या कालावधीतील फुले, पत्री, फळे मोठ्या गौरवाने देवीदेवतांना अर्पण करून त्यांची महती व्यक्त करण्याची अतिशय सुंदर व्यवस्था त्यांनी योजिली. त्यामुळे देव, निसर्ग व मानव यांच्यात एक अनुपम नातं निर्माण झालं. शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही माणसाच्या आरोग्याला, मनाला त्यापासून मोठाच लाभ होतो हे अभ्यासातून त्यांनी सिद्ध केलं. हे त्यांचे आपल्यावर मोठे उपकारच आहेत. माणसाने नेहमी आनंदी रहावे यासाठीच सण व उत्सवांना मोठं महत्त्व आहे. ते साजरे करता करता दिवसाचे चौवीस तास, महिन्याचे तीस दिवस, वर्षाचे बारा महिने आणि तपांची बारा वर्षे कशी व कधी मागे पडतात हे कळतही नाही. ते (सण व उत्सव) नसते तर मानवी जीवन रखरखित वाळवंट बनलं असतं!