स्तन्यउत्पत्तीसाठी पाककृती

0
794
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

मेथ्या बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी करून त्याला प्राकृत स्थितीत आणण्यासाठी विशेष उपयुक्त असतात. याशिवाय स्तन्यशुद्धीसाठी तसेच बाळंतिणीचे वजन कमी करण्यासाठीही मदत करतात.

कुळथामध्ये गर्भाशय आकुंचन करण्याचा विशेष गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेद शास्त्रात हे सूप बाळंतपणानंतर स्त्रीसाठी उत्तम आहे असे सांगितले आहे. पहिल्या सव्वा महिन्यात या पद्धतीने बनवलेले कुळीथ सूप अवश्य घ्यावे.

बाळंतपणानंतर व्यवस्थित स्तन्यउत्पत्ती व्हावी म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भारपणात तसेच पुढे बाळंतपणात कोणता आहार-विहार घ्यावा याचे सविस्तर वर्णन आहे. आजकाल दूध कमी येणे किंवा बाळंतपणानंतर दूधच येत नाही अशा तक्रारी सर्रास दिसून येतात व लागलीच बाळाला डबाबंद दुधाची पावडर सुरू करतात. पण हे बाळाच्या व आईच्या दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. म्हणूनच गर्भिणी अवस्थेपासूनच जो आहार घ्यायला पाहिजे त्यातील काही आवश्यक पाककृतींबद्दल आज आपण जाणून घेऊ.

१) डिंकाचे लाडू
उत्तम प्रतीच्या डिंकाची तुपात तळून तयार केलेली लाही हाडांना मजबुती देणारी आहे. खारीक कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे. यातील बदाम, काजू, पिस्ते वगैरे गोष्टी वीर्य- शक्तीवर्धक व पोषक आहेत. या सगळ्या पोषक गोष्टी शरीरात सहज पचण्यासाठी व शरीराकडून स्वीकारल्या जाण्यासाठी सुंठ, पिंपळी, केशरासारखी द्रव्येही यात घातली जातात.
….कॅल्शियम व लोह पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी असा डिंकाचा लाडू बाळंतिणीने तर रोज सकाळी खावाच पण गर्भवतीनेसुद्धा खाणे उत्तम होय.
साधारण ३०-३५ लाडू बनवण्यासाठी साधारण १ तास लागतो.
साहित्य – डिंक- २०० ग्रॅ., खारीक पूड- २०० ग्रॅ., खोबरे- १०० ग्रॅ., खसखस- १०० ग्रॅ., काजू-बदाम-पिस्ता-चारोळी प्रत्येकी- ५० ग्रॅ.
गूळ- ३०० ग्रॅ., साखर- २०० ग्रॅ., सुंठ चूर्ण- २५ ग्रॅ., पिंपळी चूर्ण- २५ ग्रॅ., जायफळ चूर्ण- २ चमचे, केशर चूर्ण- पाव चमचा, दूध- अंदाजे पाव कप, तळण्यासाठी तूप- आवश्यकतेनुसार.
कृती – डिंकाचे फार मोठे खडे असल्यास हलक्या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा व चांगला तूपावर तळून घ्यावा. डिंक चांगला फुलतो व त्याच्या लाह्या होतात.
– काजू, बदाम, पिस्ते, चारोळी यांची जाडसर भरड करून घ्यावी. तीही तूपात परतून घ्यावी.
– लोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावा.
– खोबरे किसून मंद आचेवर भाजून घ्यावे. गार झाल्यावर हातानेच थोडेसे कुस्करावे. उरलेल्या तुपात खारीकपूड भाजून घ्यावी.
– मोठ्या परातीत तळलेला डिंक, खारीक, खोबरं, काजू-बदाम-चारोळी-पिस्त्याची भरड, खसखस, सुंठ, पिंपळी, जायफळ चूर्ण एकत्र मिसळावे.
– जाड बुडाच्या पातेल्यात गूळ, साखर व दूध टाकावे व मंद आचेवर ठेवावे. गूळ विरघळल्यानंतर पाकाला बुडबुडे यायला लागले की आचेवरून खाली उतरवून त्यात केशराची पूड टाकावी.
– याप्रमाणे तयार झालेल्या पाकात वरील सर्व मिश्रण हळूहळू टाकून कलथ्याने एकत्र करून गरम असतानाच लाडू बांधावेत.

२) मेथीचे लाडू
मेथ्या बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी करून त्याला प्राकृत स्थितीत आणण्यासाठी विशेष उपयुक्त असतात. याशिवाय स्तन्यशुद्धीसाठी तसेच बाळंतिणीचे वजन कमी करण्यासाठीही मदत करतात. मेथ्या तुपात भिजवून ठेवण्याने रूक्षता व कडवटपणा कमी होतो.
अंदाजे २५-३० लाडूंसाठी – १ तास अवधी लागेल.
साहित्य – मेथ्यांचे चूर्ण- ७५ ग्रॅ., तूप- १०० ग्रॅ., गव्हाचे पीठ- १५० ग्रॅ., पिठी साखर- ४०० ग्रॅ., डिंक- २५ ग्रॅ., खसखस- ५०ग्रॅ.
– बदाम, पिस्ते, गोडंबी, काजू, चारोळी यांची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
– लोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावी. गार झाल्यावर खलबत्त्यात कुटून घ्यावी.
– कढईतील तुपात डिंक थोडा-थोडा तळून घ्यावा. गार झाल्यावर हातानेच जरासा कुस्करून घ्यावा.
– उरलेल्या तूपात गव्हाचे पीठ गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत भाजावे.
– परातीत भाजलेले गव्हाचे पीठ, तळलेला डिंक, बदाम, पिस्ता, काजू, चारोळी, गोडंबीची भरड, खसखस, मेथी चूर्ण व तुपाचे मीश्रण आणि पिठीसाखर एकत्र मिसळावे व लाडू बांधावे.

३) अहळीव लाडू
अहळीव व ओला नारळ स्तन्यवर्धक असल्यामुळे हे लाडू बाळंतपणात बाळ स्तन्यपान करत असताना अवश्य खावेत.
२५-३० लाडूंसाठी अंदाजे लागणारा वेळ – ४० मिनिटे
साहित्य – अहळीव- २५ ग्रॅ., गूळ- ३०० ग्रॅ., बदाम, काजू, पिस्ता- प्रत्येकी ५० ग्रॅ. जायफळ पूड- छोटा चमचा, नारळाचा चव- १०० ग्रॅ., नारळाचे पाणी/दूध- आवश्यकतेनुसार.
कृती – अहळीव पुरेशा नारळाच्या दुधात तीन-चार तास भिजवावेत
– बदाम, पिस्ते, काजूची जाडसर भरड करून घ्यावी.
– फुगलेले अहळीव, नारळाचा चव व किसलेला गूळ जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून शिजवावे.
– शीजत आल्यावर सुक्या मेव्याची भरड व जायफळ चूर्ण टाकून एकत्र करून थोडे गार झाल्यावर लाडू वळावेत.
डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू व अहळीवाचे लाडू हे तिन्ही लाडू बाळंतिणीच्या आहारात असणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळा बाजारात विकत मिळणार्‍या डिंकाचा लाडू हा खोबर्‍याचा लाडू असतो.

४) बाळंतिणीची सुपारी
ओवा पचनाला मदत करतो. तीळ गर्भाशयातील वात नाहीसा करतो. बाळंतशोप स्तन्यवर्धक तसेच बालकाच्या पोटदुखीला प्रतिबंध करते.
या पाककृतीस लागणारा वेळ अंदाजे- ३० मिनिटे.
साहित्य – ओवा, तीळ, बडीशेप, बाळंतशेप, धन्याची डाळ व खोबर्‍याचा कीस- प्रत्येकी ५० ग्रॅ.
– ज्येष्ठमध चूर्ण व काळे मीठ – २५ ग्रॅ.
लवंग चूर्ण- २.५ ग्रॅ., लिंबू – १
कृती – काळे मीठ व लिंबाचा रस एकत्र मिसळून घ्यावे.
– हे मिश्रण बडीशेप, बाळंतशेप, ओवा, तीळ यांना लावावे.
– तव्यावर बडीशेप, बाळंतशेप, ओवा, तीळ व शेवटी किसलेले खोबरे मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्यावेत.
– गार झाल्यावर बडीशोप व बाळंतशोप जाडसर भरड करावी. तसेच भाजलेल्या खोबर्‍याचा कीस हाताने थोडा कुस्करून घ्यावा.
– शेवटी सर्व घटक एकत्र करून हवाबंद डब्यात ठेवावे. बाळंतिणीने या पद्धतीने बनवलेली सुपारी रोज जेवणानंतर नीट चावून खावी.

५) कुळीथ सूप
कुळीथ पचायला हलके, वात व कफदोष शमवणारे असते. याने जाठराग्नीची ताकद वाढते. पोट तसेच मूत्रप्रवृत्तीही साफ व्हायला मदत होते. कुळथामध्ये गर्भाशय आकुंचन करण्याचा विशेष गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेद शास्त्रात हे सूप बाळंतपणानंतर स्त्रीसाठी उत्तम आहे असे सांगितले आहे. पहिल्या सव्वा महिन्यात या पद्धतीने बनवलेले कुळीथ सूप अवश्य घ्यावे.

साहित्य – कुळथाचे पीठ- ५० ग्रॅ., तूप- ३ चमचे, जिरे- १ चमचा, हिंग – अर्धा चमचा, हळद- पाऊण चमचा, नारळाचा चव- ३ चमचे, वाटलेली मिरची- पाव चमचा, गरम पाणी- १ लीटर. आमसूल- २-३ तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर- १ चमचा.
कृती – जाड बुडाच्या पातेल्यात तुपावर जिरे, हिंग, हळद, खोबरे, मिरची घालून थोडा वेळ परतावे.
– या फोडणीवर गरम पाणी, मीठ व आमसूल घालून उकळी आल्यावर आच मंद करावी.

– यातच वरून कुळथाचे पीठ गुठळ्या होणार नाहीत अशा बेताने हळूहळू भुरभुरावे व सुमारे ५-६ मिनिटे शिजू द्यावे.
– बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढायला घ्यावे.

६) पालक- दुधी- मूगडाळ सूप
पालकामध्ये लोह भरपूर असल्याने हे सूप गर्भारपणात व बाळंतपणानंतर विशेष उपयोगी असते. दुधी अतिशय पथ्यकर व त्रिदोषांना संतुलित करणारा असतो. तर मूगातही प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच गर्भारपणात व बाळंतपणानंतर घ्यायला हे सूप उत्तम असते.

साहित्य – पालक- ५० ग्रॅ., दुधी- १५० ग्रॅ., मूग डाळ- ५० ग्रॅ. गरम पाणी- सव्वा लीटर, किसलेले आले- दीड चमचा, मीठ- चवीनुसार, साखर- अर्धा चमचा, जिरे- १ चमचा, हळद – पाव चमचा, नारळाचा चव – तीन चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर – १ चमचा.
कृती ः-

* दुधी धुवून, साल काढून बारीक तुकडे करावेत, पालक निवडून धुवून बारीक चिरावा.

* मुगाची डाळ धुवून घ्यावी.

* जाड बुडाच्या पातेल्यात तुपावर जिरे, हिंग, हळद, खोबरे, मिरची घालून थोडा वेळ परतावे. नंतर त्यातच दुधी, पालक व मुगाची डाळ टाकून परतावे.

* नंतर गरम पाणी टाकून मीठ, साखर व आले टाकून मुगाची डाळ व दुधी-गाजर शिजेपर्यंत उकळावे.

* शिजल्यावर रवीने थोडे एकजीव करून घ्यावे व वरून कोथिंबीर टाकून वाढावे.
ही मूळ कृती लक्षात ठेवून त्याप्रमाणे इतर भाज्या वापरून सूप बनवल्यास इतर अनेक स्वादिष्ट सूप बनवता येतील.