सेझा फुटबॉल अकादमी चॅम्पियन

0
132

>> जीनो – जीएफए प्रथम विभागीय लीग फुटबॉल

सेझा फुटबॉल अकादमीने सां मिंगेल दी ताळगाव संघाचा काल गुरुवारी १-० असा पराभव केला. धुळेर मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. या विजयासह सेझाने जीनो जीएफए प्रथम विभागीय लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सेझाने ३९ पैकी ३४ गुण मिळवताना ११ विजय, १ बरोबरी व १ पराभव अशी कामगिरी केली.

कालच्या सामन्यातील निर्णायक गोल सेझाचा स्टार खेळाडू ऑल्विन कार्दोझ याने नोंदविला. या स्पर्धेतील त्याचा हा तब्बल १५वा गोल ठरला. सामन्याच्या आठव्या मिनिटाला सेझाने पहिला गोलप्रयत्न केला. मध्यरक्षक ऍश्‍ली कार्दोझ याने उजव्या बगलेत स्टीफन कुलासोला चेंडू पास दिल्यानंतर स्टीफनने बॉक्समध्ये उभ्या असलेल्या ऑल्विनकडे चेंडू सोपविला. परंतु, चेंडू क्रॉसबारवरून गेल्याने लीगमधील सर्वाधिक गोल नोंदविणार्‍या ऑल्विनचा प्रयत्न अपयशी ठरला. पहिल्या सत्रात जोस्टन व स्टीफन यांनी सेझाकडून जोर लावला.

परंतु, ताळगावच्या शेखर सावतोडकर व विक्रम बालेकर यांचा बचाव त्यांना भेदता आला नाही. गोलकोंडी फोडण्यासाठी सेझाला ३५व्या मिनिटापर्यंत वाट पहावी लागली. डॉमनिक सुआरिस याने बॉक्समध्ये ऑल्विनला पास दिल्यानंतर ऑल्विनने यावेळी कोणतीही चूक न करता संघाला १-० असे आघाडीवर नेले. दुसर्‍या सत्रात सेझाने वर्चस्व राखले. परंतु, ऑल्विन, स्टीफन, जोस्टन यांनी गोलसंधी दवडल्या. त्यामुळे त्यांना मोठ्या विजयापासून वंचित रहावे लागले. दुसर्‍या सत्रातच्या मध्यावर ताळगावला बरोबरीची संधी चालून आली होती. परंतु, आघाडीपटूंमधील समन्वयाच्या अभावामुळे गोलरक्षक हेन्सल कुएल्हो याला हा प्रयत्न उधळून लावण्याचा मौका मिळाला.

बक्षीस वितरण समारंभाला जीनो फार्मास्युटिकल्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिलीप साळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जीनोचे कार्यकारी संचालक डॉ. सागर साळगावकर, सेझा फुटबॉल अकादमीच्या अध्यक्ष अनन्या अगरवाल, वेदांता फुटबॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखविंदर सिंग, अर्जुन पुरस्कारविजेते ब्रह्मानंद शंखवाळकर, जीएफएचे उत्तर गोवा उपाध्यक्ष लविनियो रिबेलो आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिलीप साळगावकर यांनी यावेळी विजेत्या संघाचे अभिनंदन केले तसेच व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून स्पर्धा आयोजित केल्याबद्दल जीएफएचे आभार मानले. डॉ. सागर साळगावकर यांनी विजेत्या संघाला गोवा प्रो लीगसाठी शुभेच्छा दिल्या. आंबेली मैदानावर झालेल्या स्पर्धेतील अन्य सामन्यात साळगावकर ज्युनियर्सने कुडतरी जिमखान्याचा २-१ असा पराभव केला. कुडतरीने १३व्या मिनिटाला ऍलिस्टन फर्नांडिसकरवी आघाडी घेतली. यानंतर फेझर गोम्सने साळगावकरला बरोबरी साधून देणारा गोल केला. ऍरोन रॉड्रिगीसने संघाचा विजयी गोल केला.