>> 45 दिवसांत 80 लाख भाविकांनी घेतले दर्शन
गेल्या 19 नोव्हेंबरपासून जुने गोवे येथे सुरू झालेला सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शनाच्या सोहळ्याचा काल रविवारी समारोप झाला. समारोपानंतर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष सें कॅथेड्रल येथून काल रविवारी बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्चमध्ये हलवण्यात आले. या 18 व्या अवशेष दर्शन सोहळ्यासाठी जगभरातील सुमारे 80 लाख भाविकांनी हजेरी लावून आशीर्वाद घेतले.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष दर्शन शनिवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून बंद करण्यात आले. तर रविवारी सकाळी 9 वा. प्रार्थनेचा कार्यक्रम झाला. तद्नंतर 9.30 वा. सें कॅथेडॅल येथून सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष ‘बासिलिका ऑफ बॉम जिझस’ या चर्चमध्ये हलवण्यात आले. अवशेष दर्शन सोहळ्यानिमित्त ते ‘सें कॅथेड्रल’ या चर्चमधून बासिलिका ऑफ बॉम जिझस या चर्चमध्ये आणण्यात आले होते. तेथे अवशेष दर्शन सोहळ्यानिमित्त ठेवलेल्या या पवित्र अवशेषांचे 45 दिवस भाविकांनी दर्शन घेतले. 45 दिवसांत जगभरातील सुमारे 80 लाख लोकांनी अवशेष दर्शन सोहळ्याला हजेरी लावली. त्यात भाविकांबरोबच देश-विदेशांतील ख्रिस्ती धर्मगुरू, देश विदेशांतील अतिमहनीय व्यक्ती, राजकीय नेते आदींचा समावेश होता.