सॅनिटायझेशन – मास्क – सोशल डिस्टंसिंग (एस्‌एम्‌एस्)

0
53
  • डॉ. मनाली पवार

हे जे कोरोना योद्धा दिवसरात्र कार्यरत आहेत, ते तुमच्या सर्वांच्या हितासाठीच. त्यामुळे घरात- बाहेर कुठेच गर्दी करू नका. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास सुरक्षित अंतर ठेवूनच सगळीकडे वागा. श्रावण हा कितीही पवित्र महिना असला तरी देवदर्शनासाठी गर्दी नको.

श्रावण महिना सुरू झाला. हा महिना म्हणजे व्रत-वैकल्यांचा महिना. पुढे भाद्रपदात गणेश चतुर्थी आलीच. आपण भारतीय उत्सवप्रिय माणूस. पण लक्षात असू द्या, कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. लसीकरण पूर्णपणे १००% झालेले नाही. लसीकरण झाले म्हणजे आपल्याला कोरोनाची बाधा होणार नाही असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने कितीही लॉकडाऊन शिथिल केले तरी, स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावी. सणा-सुदीच्या निमित्ताने सारखी गर्दी, इकडे-तिकडे दिसत आहे. पण खरंच गर्दी करणे गरजेचे आहे का? अशी गर्दी केल्याने कोरोना व्हायरस वेगाने पसरेल हे सगळ्यांनाच माहीत आहे, तरीपण कळतं पण वळत नाही, असेच काहीसे सगळ्यांचे झाले आहे.
शासन-प्रशासन, मिडिया, डॉक्टर सगळेच परत-परत प्रतिबंधक उपाय सांगत आहेत, पण कुणीही लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करत आहेत. काय ते सारखे ऐकायचे? असा सगळ्यांचा पवित्रा आहे. पण पुढे हाच निष्काळजीपणा घातक ठरणार आहे. तेव्हा कितीही तोच-तोचपणा वाटला तरी कोरोना व्हायरस प्रसार थांबविण्यासाठी प्रतिबंधक उपायांचे पालन हे करायलाच पाहिजे.
आयुर्वेदशास्त्र सांगते- कुठलाही आजार झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये याची काळजी घ्या. मग आता श्रावणामध्ये सगळ्या मंदिरांत गर्दी करून आजार पसरवण्यापेक्षा घरातच राहा, सुरक्षित राहा. शासनाने कितीही बंधने हटवली तरी तुम्हाला गरज असेल तेव्हाच तुम्ही घरातून बाहेर पडा. हे सण झाल्यावर कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध घालायचा असल्यास खरंच (एस्‌एम्‌एस्) या तीन बाबींचा काटेकोरपणे पालन करा.

  • सॅनिटायझेशन –

दर दहा मिनिटांनी हात सॅनिटाइज करा. दर दोन तासांनी हात सॅनिटायझरने स्वच्छ करा हे सगळे आता कालबाह्य झाले. लोक याकडे गांभीर्याने पाहात नाहीत. पण अशा प्रकारच्या आजारांमध्ये जंतू पाण्यातून, स्पर्शातून, हवेतून पसरत असतात. म्हणूनच दरवेळी आपण कुठेही स्पर्श केल्यावर हात धुणे सक्तीचे आहे. आपण घरी असो किंवा बाहेर, आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा स्पर्श करतो, मग याच स्पर्शातून एखादा जंतू नाकावाटे, श्‍वसन मार्गावाटे, आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. हे टाळण्यासाठीच तर सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे.
बाहेर असता सॅनिटायझरचा वापर करावा, घरात असता स्वच्छ पाण्याने व साबणाने हात धुवावे.

  • हात कधी धुवावे? –
  • कोणतेही काम केल्यावर
  • जेवायच्या अगोदर, जेवल्यानंतर
  • संडास, लघवीला जाण्याअगोदर, आल्यानंतर
  • अडगळीच्या जागी हात लावल्यावर इत्यादी.
    महत्त्वाचे म्हणजे हात धुतल्याशिवाय आपल्या नाका-तोंडाला स्पर्श करायचा नाही.
  • हात कसे धुवावेत? – हात धुवायच्या सहा पायर्‍या आहेत.
    १) प्रथम तळहाताला साबण लावून चोळावे.
    २) नंतर हाताच्या मागील बाजूस साबण लावून चोळावे
    ३) नंतर बोटांच्या बेचक्यात साबण लावून चोळावे.
    ४) नंतर नेहमी दुर्लक्षित राहणारा अंगठा साबणाने चोळावा.
    ५) नंतर मनगट, चांगले साबणाने चोळावे.
    ६) शेवटी बोटांचे अग्रभाग चांगले एकमेकांवर घासून चोळावेत.
    अशा प्रकारे चांगले चाळीस सेकंद साबण लावून स्वच्छ पाण्याने आपले हात धुवावेत.
    सॅनिटायझर घरच्या घरी बनविण्यासाठी निंब, कढिपत्ता, हळद, तुरटी, रिठा यांचा वापर करून त्यांचा काढा बनवून बाटलीमध्ये भरून ठेवावा व त्याचा सॅनिटायझर म्हणून वापर करावा.
  • मास्क –

हवेमार्फत जो जंतुसंसर्ग होतो तो टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा.
मास्कमध्ये महत्त्वाचे म्हणजे मास्कला सारखा हात लावू नये. मास्क ऍडजेस्ट करताना पुढून हात लावून करू नये, मागच्या कानाला अडकवण्याच्या दोरीला किंवा रबराला पकडून मास्क ऍडजेस्ट करावा.

  • मास्क गळ्यात अडकून ठेवू नये.
  • मास्क एन-९५ असावा असे काही नाही, पण कॉटनचा असला तरी चालेल, पण चांगला स्वच्छ धुतलेला वापरावा.
  • मास्क लावताना संपूर्ण नाक व तोंड झाकले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अर्धवट तोंडावर मास्क लावू नये.
  • बाहेरून आल्यावर मास्क इकडे-तिकडे, टेबलवर, टीव्हीवर, बेडवर, खुर्चीवर कृपया टाकू नका.
  • बाहेरून मास्क लावून आल्यावर तो काही काळ बाहेरच ठेवावा. मग स्वच्छ एका जागेवर ठेवावा. कॉटनचा असेल तर धुऊन परत वापरता येतो.
  • मास्कची विल्हेवाट लावताना बाहेर कुठेही फेकू नयेत. शक्यतो जाळून टाकावेत.
  • घरात एखादा विलगीकरणामध्ये पॉझिटिव्ह असल्यास घरातील इतर माणसांनीही मास्कचा वापर करावा.
  • दोन वर्षांखालील मुलांना मास्क वापरण्याची गरज नाही.
  • सोशल डिस्टंसिंग –

हाही एक महत्त्वाचा नियम आहे. आजकाल मुलं घरात बसून कंटाळली म्हणून घेतलं कडेवर गेलं बाजारात, भाजी आणायला जरी गेलात तरी चल फेरफटका होईल म्हणून मुलांना सोबत घेऊन जातो. मॉलमध्ये बघाल तर तिथेही गर्दी. फक्त शाळेत मात्र गर्दी नाही. बाजारात गर्दी, लग्नकार्याला गर्दी, काही नाही आपल्या घरातलेच तर आहेत. कंटाळा आला, चला गेट टूगेदर करू, वाढदिवसाची पार्टी म्हणा, काय ऍनिव्हर्सरी पार्टी सगळे नियम धाब्यावर…

यात ना सरकारचा फायदा ना ही पोलीस यंत्रणेचा. हे जे कोरोना योद्धा दिवस रात्र कार्यरत आहेत, ते तुमच्या सर्वांच्या हितासाठीच. त्यामुळे घरात-बाहेर कुठेच गर्दी करू नका. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास सुरक्षित अंतर ठेवूनच सगळीकडे वागा. कितीही श्रावण हा पवित्र महिना असला तरी देवदर्शनासाठी गर्दी नको. घरातच राहून घरामध्ये होम-हवन, जप-तप करूनही पूजा-अर्चा करता येते.
या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालायचा असल्यास एस्‌एम्‌एस् या तीनही नियमांचे काटेकोरपणे पालन करा.