सूर्यसंताप

0
85
  • डॉ. मनाली महेश पवार

अत्यंत रखरखीत, कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्याचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे व गरमी असह्य होत चालली आहे. उष्मा तर एवढा वाढला आहे की उष्णतेचे तापमान ५० अंश सेल्सिअस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आपल्यासाठी हे ५० अंश सेल्सिअसचे तापमान म्हणजे जणू भट्टीच! या उकाड्यापासून, उष्णतेपासून, विविध आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये जी ग्रीष्मऋतुचर्या सांगितली आहे, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. हा उकाडा सुसह्य होण्यासाठी आपल्या आहार-विहारामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

अत्यंत रखरखीत, कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्याचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे व गरमी असह्य होत चालली आहे. उष्मा तर एवढा वाढला आहे की उष्णतेचे तापमान ५० अंश सेल्सिअस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आपल्यासाठी हे ५० अंश सेल्सिअसचे तापमान म्हणजे जणू भट्टीच! आपण उष्णतेने भाजूनच निघू!
या काळात सूर्य उत्तर गोलार्धात कर्कवृत्ताच्या जवळपास आलेला असतो. त्यामुळे सूर्यकिरण अगदी सरळ, लंबरूपाने येत असतात. यावेळी दिनमानही बरेच वाढलेले असते. रात्र अगदी लहान व दिवस बराच मोठा असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश बराच वेळ मिळत राहतो. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे, तीव्र, प्रखर सूर्यसंतापामुळे, वाढलेल्या उष्णतेमुळे सर्व सृष्टी अगदी भाजून निघत असते. या काळात वाराही फारसा वाहत नाही. वार्‍याची एखादी झुळूक आली तरी ती गरम, असह्य अशीच असते. वाढलेल्या उष्णतेमुळे तलाव, निर्झर, ओढे आटतात. नद्या कोरड्या पडतात. विहिरीतील पाणीही अधिकाधिक खोल जाऊ लागते. त्याचप्रकारे आपल्या शरीरातील पाणीही कमी-कमी होऊ लागते. द्रव्यांश, स्नेहांश बाहेर पडू लागतात व अनेक आजार उद्भवू लागतात.

कडक, भाजून काढणार्‍या सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीतलावरील सर्व जलीय अंश कमी होऊ लागतो, तसेच स्निग्ध गुणही नाहीसा होऊन रूक्षता अधिकाधिक प्रमाणात वाढू लागते. याच बाह्य वातावरणातील वाढलेल्या रूक्षतेच्या परिणामस्वरूप सर्व धातूंमधील स्नेह व ओलावा उष्णतेने शोषला जाऊन रूक्षता वाढते. या रूक्षतेमुळे शरीरात वातदोषाचा संचय वाढू लागतो. आदानकाळामुळे कमी झालेले बल, त्यामुळे निर्माण झालेला धातुक्षय व आलेले दौर्बल्य या सर्वांंमुळेही शरीरात वात वाढण्यास मदत होते.

बाह्य वातावरणातील तप्त हवामानामुळे असह्य उकाडा होत आहे. त्यामुळे घाम फार येतो. त्वचेवाटे शरीरातील उष्णता बाहेर पडत असते, त्यामुळे या ऋतूत अग्निमांद्य निर्माण होते. तीव्र स्वरूपाचे अग्निमांद्य, वातसंचय, कमी झालेले शारीरिक बल व याच्या जोडीला वातावरणातील असह्य उष्णता या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे कोणतेच काम करण्याचा उत्साह राहत नाही. अंगदुखी, अंग मोडल्यासारखे होणे, झोप न येणे, निरुत्साह इत्यादी वातविकारांना सुरुवात होते. त्याचप्रमाणे पित्तप्रकोपजन्य, रक्तदुष्टीजन्य रोगही संभवतात. विशेषतः लघवीचे विकार. उदा. लघवी साफ न होणे, जळजळ होणे, वारंवार लघवीला होणे, लघवी करताना दुखणे किंवा मूतखड्यासारखे आजार हमखास डोके वर काढतात. त्याचप्रमाणे सारखी तहान लागणे, घशाला कोरड पडणे, निर्जलीकरण (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे), त्वचाविकार, त्याचबरोबर नाकाचा घोळणा फुटणे, बायकांमध्ये रक्तप्रदर असे आजार संभवतात. त्याचबरोबर डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यांतून सारखे पाणी येणे इत्यादी दृष्टिजन्य आजार संभवतात. असा उकाडा वाढत गेला तर उष्माघात, मूर्च्छासुद्धा येऊ शकते.
या उकाड्यापासून, उष्णतेपासून, विविध आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये जी ग्रीष्मऋतुचर्या सांगितली आहे, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. हा उकाडा सुसह्य होण्यासाठी आपल्या आहार-विहारामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

आहार कसा असावा?
स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम्‌|
लवणाम्लकटूष्णानि व्यायामं चात्र वर्जयेत्‌॥
या ऋतूत आहाराचे नियोजन करताना मधुर म्हणजे चवीला गोड, शीत म्हणजे थंड, द्रव म्हणजे पातळ पदार्थ, स्निग्ध म्हणजे स्नेहयुक्त असे अन्नपदार्थ आहारात असावेत याकडे लक्ष द्यावे. ग्रीष्म ऋतूतील हे सूत्र लक्षात ठेवून त्यानुसार त्याचे आचरण केल्यास बाहेरील उकाडा आपल्या शरीराला सुसह्य होऊ शकतो.
ग्रीष्म ऋतूत असणारे जठराग्निमांद्य लक्षात घेऊन जो काही आहार घ्यायचा आहे तो लघु म्हणजे पचायला हलका असावा व अल्प प्रमाणातच घ्यावा. खारट, तिखट, कडू, उष्ण पदार्थांचे सेवन अल्प प्रमाणात करावे. आहारात भात, भाकरी, पोळी यांसारख्या मधुर, स्निग्ध आहारद्रव्यांचा वापर करावा. भाताचे प्रमाण अधिक असले तरी चालेल. म्हणूनच पूर्वीच्या काळी उन्हाळा सुरू झाला म्हणजे भाताची पेज जेवायची पद्धत होती.

दूध, तूप, तेल यांचा भरपूर वापर या ऋतूत करावा. दुधाच्या पदार्थांपैकी दूध, ताक, दही, श्रीखंड, बासुंदी यांसारखे पदार्थ आहारात असणे चांगले. ताक तर अगदी भरपूर प्रमाणात प्यावे. रव्याची व गव्हाची खीर करून खावी. आहारात खडीसाखरेचा वापर करावा. म्हणूनच तर गुढीपाडव्याला गुढीला साखरेची माळ घातली जाते. मात्र साखर रसायनमुक्त असावी. याच ऋतूत नाचणीची आंबील करून पिण्याची पद्धती आहे. या आंबिलीचे नित्य सेवन केल्यास ग्रीष्मातील कडक उष्णता व रूक्षता यांपासून शरीराचे संरक्षण होते. साळीच्या लाह्यांपासून बनविलेला लाजामंडही या ऋतूत वापरला जावा. आहारात पालेभाज्या अधिक असाव्यात. माठ, तांदुळजा, चाकवत, राजगिरा, पुनर्नवा, पालक या किंवा या प्रकारच्या पालेभाज्या सेवन कराव्यात. भेंडी, पडवळ, दोडका, घोसाळी यांसारख्या फळभाज्याही खायला हरकत नाही. गाजर, बीट, रताळी, सुरण यांसारखी कंदमुळेही मधुर रसाची असल्याने शरीरास योग्य ठरतात. डाळींचा वापर मात्र या ऋतूत टाळावा. मुगाची डाळ किंवा मूग मात्र पथ्यकर आहेत. तूरडाळ तर वापरूच नये. उन्हाळा बाधू नये म्हणून वापरले जाणारे महत्त्वाचे आहारद्रव्य म्हणजे कांदा. कांदा शीतवीर्य असल्याने उष्णतेच्या सर्व प्रकारच्या रोगांपासून शरीराचे संरक्षण करणारा आहे. कांदा नुसता खाणे, भाजून खाणे वा इतर पदार्थांबरोबर शिजवून खाणे हे सर्वच चांगले. पण कच्चा कांदा खाणे हे अधिक हितावह ठरते.
मांसाहारी व्यक्तींनी मांसाहार करताना जलचर वा आनुप प्राण्यांचे मांस खावे. निरनिराळे मासे, खेकडा, लॉबस्टरसारखे जलचर व बदकासारख्या पक्ष्याचे मांस तसेच डुक्कर आदी प्राण्यांचे मांस हितकर ठरते. मात्र या ऋतूत असणारे अग्निमांद्य लक्षात घेता मांसाहार करताना अल्प प्रमाणात करावा. मांस शिजवताना मसाल्याचे पदार्थ कमीत कमी वापरावेत.

स्वयंपाक करताना जिरे, धणे, दालचिनी, तामलपत्र, हळद, कोकम, वेलची, आले अशा सौम्य मसाल्यांचा वापर करावा. काकडीचे काप किंचित मीठात कोथिंबीर म्हणून खावेत. द्राक्षे, कलिंगड, खरबूज यांचा वापर करावा. फळांपैकी द्राक्षे सर्वोत्तम समजावीत. उन्हाळ्याचा राजा आंब्याचेही सेवन करावे. आंबा खाण्याआधी साधारण तासभर तरी पाण्यात भिजवून ठेवावा. नंतर त्याचा रस काढून त्यात दोन चमचे घरचे साजूक तूप व चिमूटभर सुंठीचे चूर्ण घालून घ्यावा. अशाप्रकारे खाल्लेला आंबा ग्रीष्म ऋतूतला कोरडेपणा व निरुत्साह घालवून स्फूर्ती व शरीरशक्ती वाढवण्यास समर्थ ठरतो.

याखेरीज केळे, गोड संत्री, मोसंबी, सफरचंद, नारळ अशी फळे खावीत. सुक्यामेव्यापैकी मनुका, खारीक, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खावेत. गव्हाचा शिरा, दुधी हलवा खावा. दूध टाकून केलेला शिरा, कोहळ्याचा पेठा, साखर-भात अशा गोड पदार्थांचे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा सेवन करावे.
अनेक आंबट फळे या ऋतूत आवश्यक असतात व ती निसर्गही पुरवीत असतोच. या फळांचा जरूर वापर करावा. कैरी, करवंदे, आवळा, कोकम ही अम्लरसात्मक फळे या ऋतूतील मेवाच ठरतात. कैरीचे लोणचे किंवा नुसती साधी कैरी मिठाबरोबर खाण्यानेही लाभ होतो.

दूध तसेच घरचे ताजे लोणी व तूप यांचे रोज सेवन करावे. रातांबे किंवा कोकमफळांचा भरपूर उपयोग करावा. या फळाची वरची साल सुकवून अमसूल तयार होते. ते उष्णता व पित्तावरचे उत्तम औषध आहे. ४-५ कोकम कुसकरून ग्लासभर पाण्यात टाकावीत. पाण्याला चांगला रंग आला की गाळून घ्यावे व त्यात चवीनुसार साखर, मीठ व चिमूटभर जिर्‍याची पूड टाकावी. हे सरबत उन्हाळ्याच्या झळा लागल्यानंतर किंवा दुपारच्या उन्हातून फिरून आल्यानंतर घेतल्याने उन्हाचा त्रास होत नाही. तसेच पित्ताचे शमनही होते.
कलिंगड हे या दिवसांत निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे. कलिंगड शीतकारक, पित्तहारक, मधुर व मूत्रल आहे. उन्हाळ्यात उष्णतेने अंगाचा दाह होतो, अशावेळी कलिंगडाचा लाल गर थोडा-थोडा खावा व सालीच्या आत असणारा पांढरा गर मऊ करून अंगावर बाहेरून लावावा. काकडी उन्हाळ्यासाठी निसर्गाचे दुसरे वरदान आहे. काकडी कापून, मीठ लावून खावी. तसेच काकडीची कोथिंबीर उन्हाळ्यात अवश्य खावी. कमी होणार्‍या लघवीसाठी काकडी उपयोगी पडते. कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम आहे.

विविध पानकं किंवा सरबते
उन्हाळ्यात ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने जसा बाहेरील जलीय अंश कमी होतो तसेच शरीरातीलही द्रवांश कमी होतात. रस, रक्तादी सप्तधातूंतील द्रवांश, स्निग्धपणाही या काळात कमी होतो. हा द्रवांश शरीराला मिळवण्यासाठी विविध पानकं या ऋतूत सेवन करावीत. या सप्तधातूतील द्रवभाग, स्निग्धपणा जेव्हा कमी होतो तेव्हा अंगाची आग-आग होते, थकल्यासारखे होते, तहान-तहान होते, लघवीच्या जागी जळजळ होते, उन्हाळी लागते, छातीत धडधडल्यासारखे होते, बेचैनी वाढते. अशावेळी शरीरातील रसधातूचे प्रीणन होणे आवश्यक असते. म्हणूनच या काळात विविध पानकं हितकर ठरतात.

पानकं म्हणजे सरबते. विविध सरबते, जी प्यायल्याने शरीराला तरतरीतपणा येतो. मनाचा क्षीण कुठल्या कुठे निघून जातो. उष्णता कमी होऊन शीतपणा, थंडगार वाटतो. ही सरबते म्हणजे ‘कॉल्ड्रिंक्स’ नव्हेत. भारतीय पाक-संस्कृतीनुसार ही सरबते तयार करावीत व दुपारच्या वेळी जेव्हा उष्णतेचा वणवा पेटलेला असतो तेव्हाच या पानकांचे सेवन करावे. सकाळी उपाशीपोटी ही सरबते सेवन करू नयेत. ही पानकं तयार करण्यासाठी माठातील थंड पाणी घ्यावे. ही पानकं विशिष्ट अशा आयुर्वेदिक पद्धतीने बनवल्यास यांचे गुण द्विगुणित होतील.

पानकं बनविण्याची कृती
सर्वप्रथम साधारण १५० मि.लि. माठातील थंड पाणी घ्यावे. त्यात आपल्या आवडीनुसार साधारण दोन चमचे एवढी पिठीसाखर घालावी. ही पिठीसाखर पत्री खडीसाखरेपासून बनविलेली असावी (चौकोनी खडीसाखर घेऊ नये). नंतर त्यात चिमूटभर वेलची पूड, दोन लवंगा ठेचून, एक चिमूटभर मिरी पावडर, कणभर भीमसेनी कापूर (नैसर्गिक), १-२ चमचा जिरे पूड हे सर्व पदार्थ एकत्र मिसळून सर्व पानकांचा मुख्य घोळ (बेस) तयार करून घ्यावा. मग ह्या ‘बेस’मध्ये लिंबाचा रस टाकला म्हणजे लिंबूसरबत तयार होते. कोकम आगळ टाकला म्हणजे कोकम सरबत तयार होते. आवळ्याचा रस टाकला की आवळ्याचे सरबत तयार होते. चिंचेचा कोळ टाकल्यास चिंचेचे सरबत व खजुराची चटणी टाकल्यास खजूर सरबत तयार होते. कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसांत उत्तम. कैरी उकडून, आतील गर पाण्यात कुसकरून, गाळून त्यात हा बेस टाकला म्हणजे कैरी पन्हे तयार होते.
या सगळ्या पानकांबरोबर कोथिंबिरीचे सरबत हे कडकी लागणे, हाता-पायांची आग-आग होणे यावर खूपच उपयुक्त आहे. हे सरबत तयार करण्यासाठी वरील प्रकारे बनविलेल्या बेसमध्ये दोन चमचे ताज्या कोथिंबिरीचा रस घालावा व तयार सरबत साधारण दिवसातून ३-४ वेळा घ्यावा. ओली कोथिंबीर उपलब्ध नसल्यास सुक्या धण्याची पूड किंवा धणे भिजत घालून त्यात १ चमचा जिरे घालून, चवीपुरती साखर टाकून काढाही बनवता येतो. तोही मूत्रल आहे. जळजळ, उन्हाळी कमी करणारा आहे.

उन्हाळ्यामध्ये पाण्याचे महत्त्व
उन्हाळ्यामध्ये नुसतं तहान-तहान होत असतं. तसेच पाणी कमी प्यालो म्हणजे मूत्रसंस्थेच्या व्याधीही उत्पन्न होतात. त्यामुळे तहान लागल्यावर पाणीच प्यावे. कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम किंवा फ्रीजमधील किंवा बर्फ टाकून पाणी पिऊ नये.
पाणी उकळून मगच वापरावे म्हणजे बाधत नाही; अन्यथा या ऋतूत अनेक साथीच्या रोगांना तोंड द्यावे लागेल. पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी चांगले गार असावे. मातीच्या माठामध्ये नैसर्गिकरीत्या पाणी थंड करून मगच पाणी प्यावे.
वाळा, चंदन, गुलाब, भीमसेनी कापूर वगैरेनी सुगंधित केलेले, संस्कारित केलेले जल वापरावे. जाई, जुई, मोगरा, पारिजातक इत्यादी सुगंधित फुलांचा संस्कार केलेले थंडगार पाणीही उपयुक्त ठरते. आंघोळीसाठीही गार पाणी वापरावे. जर गार पाण्याच्या आंघोळीची सवयच नसेल तर अगदी कोमट पाणी स्नानासाठी वापरावे.

उष्णता वाढविणारे पदार्थ
काही पदार्थ सतत, परत-परत, लागोपाठ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. या काळात गूळ उष्ण असल्याने टाळावे. गूळ हे थंडीमध्ये हितकर असल्याने संक्रांतीला तीळगूळ खाल्ले जातात. गूळ खायचा असल्यास तो नैसर्गिक असावा व थोड्या प्रमाणात खावा. बाजरी उन्हाळ्यात उष्ण असल्याने खाऊ नये. काजू, पिस्ते, अक्रोडासारखा सुकामेवा टाळावा. याउलट मनुका, अंजीर व बदाम खायचे असल्यास रात्री भिजत घालूनच खावे. तेलामध्ये तिळाचे व करडयीचे तेल टाळावे. तिळाची चटणी टाळावी. मोहरी व मेथी फोडणीमध्ये टाळावी. फोडणीसाठी जिरे, कडिपत्ता, तमालपत्र यांचा वापर करावा. डाईट म्हणून कितीही पपई खात असला तरी या काळात पपईचा अतिरेक टाळावा. हिरवी मिरची उष्ण असल्याने टाळावी. या काळात लसूण कितीही हृदयासाठी हितकर असली तरी जपूनच वापरावी. सर्रास लसणीची चटणी, फोडणीसाठी लसूण, लसणीचे लोणचे टाळावे. सिमला मिरचीसारखी भाजी टाळावी. मेथी, शेपूसारख्या पालेभाज्याही टाळाव्यात. खडा मसाला, गरम मसाला, चटकदार, मसालेदार पदार्थ टाळावेत. हरभरा, पावटा, उडीदडाळ, छोले, वाल, चवळी अशी कडधान्ये टाळावीत.

उन्हाळ्यात आचरण कसे हवे?
सध्या उष्णता वाढत असल्याने अगदीच महत्त्वाचे काम व आवश्यक असल्यासच उन्हात घराबाहेर पडावे. पातळ व सुती कपडे घालावेत व तेही शक्यतो पांढर्‍या किंवा फिक्क्या रंगाचे असावेत. बाहेर जाताना छत्री, टोपी, गॉगल्सचा वापर करावा. घरात खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावून पाणी शिंपडून थंडावा निर्माण करावा. घामाघूम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा व्यायाम करावा. साबणाचा वापर टाळावा. शक्यतो चंदन, वाळा अशा शीतद्रव्यांचे चूर्ण वापरावे. इतर ऋतूत दुपारची झोप निषिद्ध सांगितली आहे, पण उन्हाळ्यात अर्धा तास झोप आवश्यक आहे. सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालावे. स्वशक्तीपेक्षा जास्त काम, व्यायाम, मैथुन करू नये. रात्री चांदण्यात झोपावे.
शरीराचा थकवा घालवण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी रोज सकाळी शतावरी कल्प दुधाबरोबर घ्यावे. मोरावळा, गुलकंद, आमलक रसायन सारखी औषधे आहारीय पदार्थ म्हणून सेवन करावीत.

लक्षात ठेवावे असे काही…

  • उष्माघात झाल्यास कांद्याचा रस पाजावा.
  • गुळवेल सत्त्व, प्रवाळ भस्म, मोती भस्म, गुलकंद, मोरावळा या औषधींचा खास उपयोग करावा.
  • दूर्वांचा रस पोटात घ्यावा. घोळणा फुटल्यास किंवा पाळीत रक्त जास्त प्रमाणात जात असल्यास उपयुक्त ठरतो.
  • मूत्रल दोष वाढत असल्यास धणे व खडीसाखर घालून पाणी प्यावे.
  • औदुंबराच्या फळाचे सरबत हे उन्हाळी लागल्यास उत्तम औषध आहे.
  • उगाळलेल्या चंदनाचा लेप कपाळावर लावल्याने थंडावा मिळतो.
  • घाम फार येत असल्याने चंदन, मंजिष्ठा या औषधी द्रव्यांची पावडर काखेत लावावी.
  • तळपाय व तळहाताची आग होत असल्यास मेंदीची पाने वाटून लेप लावावा किंवा तूप लावून तळपाय व तळहात काशाच्या वाटीने चोळावे.
    या वैशाखचा सूर्य कितीही उष्णता जरी ओकत असला तरी त्याचा वणवा पेटू देऊ नका. वरील काही सोप्या उपायांनी व ग्रीष्मऋतुचर्येचे पालन करून हा उकाडा सुसह्य करावा. कारण सूर्य हाच शरीराला मानसिक व आध्यात्मिक आरोग्य देणारा आहे. सूर्यउपासना हीच श्रेष्ठ उपासना.