सूर्यनमस्काराच्या क्षेत्रात नविन विश्वविक्रम करण्यासाठी गोवा सज्ज……. 

0
139

सुशांत दत्ताराम तांडेल (हरमल)

विक्रम किंवा विश्वविक्रमाला गवसणी घालणारे ‘विक्रमादित्य’ अगदी विरळच नव्हे तर फारच दुर्मिळ असतात. त्यासाठी पराकोटीची जिद्द आणि अविरत परिश्रम घेण्याची शारिरीक व मानसिक क्षमता असलेली माणसेच लागतात. अशी अगदी ध्येयवेडी माणसे फारच क्वचित असली तरिही आहेत मात्र नक्की. म्हणुनच तर चक्क विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा तेही अगदी विरळ अशा सूर्यनमस्काराच्या क्षेत्रात नविन विश्वविक्रम प्रस्थापित करणार्‍या एक आणि दोन नव्हे चक्क २३१ गोमंतकियांना एकाच वेळी पाहण्याचे दुर्मिळ सौभाग्य समस्त गोमंतकियांना येत्या रविवारी दि. ४ फेब्रूवारी रोजी फोंडा तालुक्यातील निसर्गरम्य अश्या केरी गावच्या श्री विजयदूर्ग मंदिर परिसरात लाभणार आहे. तो दुर्मिळ क्षण ‘याच देही’ पाहण्यासाठी समस्त गोमंतकिय सूर्यनमस्कारप्रेमी केरी गावात पोहचतील अशी आशा बाळगतो.

योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या पतंजलि युवा भारत संस्थेशी सलग्न आपल्या गोवा राज्याच्या काना कोपर्‍यातील २३१ आबालवृद्ध गत चार महिने घेत असलेल्या अथक व अविरत परिश्रमाची फलश्रृती म्हणजेच सूर्यनमस्काराच्या क्षेत्रात रविवारी गोमंतभूमीत नोंदविले जाणारे एक किंवा दोन नव्हे तर तीन विश्वविक्रम होत. यात वास्को येथिल ६४ वर्षीय जेष्ठ योगशिक्षक रत्नाकर राव हे सलग १२०० सूर्यनमस्कार घालण्याचा विश्वविक्रम करणार असून यांच्या सोबत राज्यभरातील १६० महिला व शालेय मुले प्रत्येकी पाचशे (एकूण ऐंशी हजार) सूर्यनमस्कार एकाच वेळी सामुहिकरित्या घालण्याचा दुसरा विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. याशिवाय खुल्या गटात ७० गोमंतकीय पुरूष व महिला प्रत्येकी एक हजार ( एकूण ७० हजार) सूर्यनमस्कार घालण्याचा तिसरा भीम पराक्रमी विश्वविक्रम नोंद करणार आहे्‌त. हे तिनही विश्वविक्रम मिळून एकूण १,५१,२०० सूर्यनमस्कारांचा एकाच दिवशी एकाच ठिकाणी वर्षाव होणार आहे. कदाचित तोही एक आपल्या गोमंतक भुमितील गोमंतकीयांचाच आगळा वेगळा नवा विक्रमच असेल.

तसे पाहता इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे सूर्यनमस्काराच्या क्षेत्रातही आज मितीला विविध विश्वविक्रम नोंद झालेले आहेत. ज्यात दि. १९ नोव्हेंबर २००५ रोजी मध्यप्रदेश राज्यातील ग्वालियर शहरात जीवाजी विद्यापीठ मैदानावर २९९७३ शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालून गिनेस बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंद केलेला विश्वविक्रम, त्यानंतर दिल्ली येथे राजपथ मार्गावर एकाच वेळी ३५ हजार जणांनी सूर्यनमस्कार घालून ग्वालियर शहराचा रिकॉर्ड मागे टाकून नोंदविलेला आपला नविन विश्वविक्रम, त्यानंतर गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात एकाच वेळी पन्नास हजार जणांनी सुर्यनमस्कार घालून नोंदविलेला स्व्त:चा नवा विश्वविक्रम, त्यापाठोपाठ दि. १२ जानेवारी २०१७ रोजी स्वामी विवेकानंद जयंती दिनी योगऋषी स्वामी रामदेवजी महारांच्या उपस्थितीत एक लाख जाणांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालून पूर्वीचे सर्व विश्वविक्रम मोडीत काढत नोंदविलेला नविन विश्वविक्रम व त्यानंतर नुकताच दि २४ जानेवारी २०१८ रोजी नासिक, महाराष्ट्र येथिल नासिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या पंधरा हजार विद्यार्थ्यांनी मिळून सलग एक वर्षभर निश्चित वेळेत नित्य बारा सूर्यनमस्कार घालून एकूण १,४५,९५,७८६ सूर्यनमस्कार घालण्याचा केलेला वेगळाच विश्वविक्रम, इत्यादींचा समावेश आहे.

या सूर्यनमस्काराच्या क्षेत्रात विश्वविक्रम नोंदविण्यात आपण गोमंतकियही काही मागे नाही आहोत हे सिद्ध करताना डिचोली तालुक्यातील पिळगांवचा सूपूत्र कु. पंकज अरविंद सायनेकर याने गतवर्षी अवघ्या तीन महिन्याच्या कालावधित दोन विश्वविक्रम नोंद केले. ज्यात दि. २६ मार्च २०१७ रोजी आपल्या पणजी शहरात संपन्न झालेल्या सूर्यनमस्कार मॅराथॉन मध्ये सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत सलग २०१५ सूर्यनमस्कार घालून आशिया बूक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंदविलेला विश्वविक्रम व त्यानंतर दि. २० जून २०१७ रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या सूर्यनमस्कार मॅराथॉनमध्ये सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत सलग २२९५ सूर्यनमस्कार  बारा तास व पंचविस मिनिटामध्ये घालून गोल्डन बूक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंदलिलेल्या विश्वविक्रमाचा समावेश आहे.

सूर्यनमस्कार केल्याने मानसाचा सर्वांगसुंदर व्यायाम तर होतोच पण त्याशिवाय शारिरीक, मानसिक व आत्मिक सामर्थही प्राप्त होते,  शरिराला डौल येतो, मन शांत राहते, ह्रदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढते, सर्व महत्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो, ह्र्‌दय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते, बाहु व कंबर यांचे स्नायू बळकट होतात, पाठीचा मणका व कंबर लवचिक होते, पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी व शरीर सुडौल होण्यास मदत होते, पचनक्रीया सुधारते, मनाची एकाग्रता वाढते, इत्यादी सूर्यनमस्काराच्या जगतमान्य फायद्यांची माहिती सर्वदूर पोहचऊन सर्वांना सूर्यनमस्काराच्या माध्यामातून आपले शरिर व मन सक्षम व सुदृढ ठेवण्याकडे आकर्षित करणे हेही एक अति महत्वाचे उद्दीष्ट आहे. म्हणुनच तर येत्या रविवार दि. ४ रोजी सकाळी ६.०० वा. ते दुपारी २.०० वा. पर्यंत केरी फोंडा येथील विजयदूर्ग मंदिराच्या कल्याण मंडपात संपन्न होणार्या या सूर्यनमस्कारांच्या विश्वविक्रमाकडे समस्थ गोमंतकियांचे लक्ष लागून राहिले आहे.