सुपर स्पेशालिटी इस्पितळे सप्टेंबरपर्यंत पूर्ण ः राणे

0
88

बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी इस्पितळ, मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, कुडचडे येथील इस्पितळ तसेच कासावली, चिखली व तुये इस्पितळ या सर्व इस्पितळांचे चालू असलेले काम जून ते सप्टेंबर २०२१ या दरम्यान पूर्ण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हृदयरोग विभागासह गोमेकॉत आहेत, त्या प्रकारच्या सर्व सोयी-सुविधा व विभाग असतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

..तर कडक पावले उचलू
शेजारच्या महाराष्ट्र राज्यात जर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढला तर आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुढील चार-पाच दिवस आमचे येथील परिस्थितीवर बारीक लक्ष असेल असे सांगून नंतर कोणती पावले उचलावीत ते ठरवण्यात येईल, असे राणे यांनी स्पष्ट केले. मात्र, आम्हाला कडक पावले उचलावी लागतील एवढे नक्की असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.