सीएनजीच्या दिशेने

0
171

येत्या ऑगस्टपासून गोव्यात प्रायोगिक तत्त्वावर काही सीएनजी बसगाड्या सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. काळाची पावले ओळखून त्या दिशेने चालणे आवश्यक असते. इतर राज्यांनी केव्हाच सीएनजी वाहनांचा मार्ग अवलंबिला. दिल्लीसारख्या ठिकाणी तर राष्ट्रीय हरित लवादाने दणका दिल्याने डिझेलऐवजी पर्यायी इंधनांच्या वापरावर भर देणे सरकारला भाग पडले. इतर राज्यांनीही केव्हाच सीएनजीवर चालणारी सार्वजनिक वाहतूक सुरू केलेली आहे. केरळने तर नुकतीच देशातील एलएनजीवर चालणारी पहिली बसही सुरू केली. डिझेलसारख्या प्रदूषणकारी इंधनाला पर्याय शोधून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अवलंबिण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. सीएनजीचा पर्यायही त्यापैकी एक. मात्र, सीएनजी वाहनांची देखभाल आणि त्यावरील खर्च जास्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गोव्यात सीएनजी वाहनांचा प्रयोग करून पाहत असताना या गोष्टींचाही विचार झाला पाहिजे. अनेक ठिकाणी सीएनजी वायूची पुरेशी उपलब्धता नसणे हीही एक समस्या बनून राहिली आहे. तेलंगणामध्ये २०१२ पासून सीएनजी बसगाड्या धावत आहेत, परंतु पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध नसल्याने आता अनेक सीएनजी गाड्या पुन्हा डिझेल वापरासाठी रूपांतरित कराव्या लागल्या आहेत. गोव्यातील सीएनजीवर धावणार्‍या प्रायोगिक बसगाड्यांना साळगावच्या कचरा प्रकल्पातून सीएनजी उपलब्ध केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. प्रत्यक्षात या कचरा प्रकल्पातून किती प्रमाणात सीएनजी उपलब्ध होईल व त्यावर किती वाहने चालू शकतील याबाबत स्पष्टता नाही. परंतु निदान प्रायोगिक तत्त्वावर काही वाहने जरी चालवता आली तरीही ती मोठी उपलब्धी ठरेल. साळगावचा कचरा प्रक्रिया प्रकल्प हा गोव्यासाठी एक मॉडेल प्रकल्प आहे. त्याच्या यशस्विततेवर अन्यत्र अशाच प्रकारचे कचरा प्रकल्प उभे राहणार आहेत. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करून गोव्यात आणल्या गेलेल्या या महत्त्वाकांक्षी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे जेवढे लाभ मिळतील, तेवढे ते भविष्यातील अशा प्रकारच्या प्रकल्पांना जनसहमती बनण्यासाठी उपयुक्त ठरतील. सीएनजी वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण टळते, परंतु तेवढाच या इंधनाचा ४६ टक्के जास्त वापर करावा लागतो असे सांगितले जाते. विदेशांमध्ये नव्वदच्या दशकापासूनच सीएनजीचा वापर होत आला आहे. बार्सेलोनासारखी अनेक शहरे ९५ सालापासून सीएनजीवर चालणारी सार्वजनिक वाहतूक वापरत आहेत. भारतातही अनेक शहरांनी सीएनजीवरील सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे उदाहरण दिले. गुजरातमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने अहमदाबादच्या पालिका वाहतूक महामंडळाला सीएनजीवर चालणारी वाहनेच चालविण्याचे आदेश दिले, त्याविरुद्ध ते महामंडळ गुजरात उच्च न्यायालयात गेले आहे. परंतु काळाची पावले विचारात घेता, सीएनजी काय, एलएनजी काय, इलेक्ट्रिक वा हायब्रीड काय, नव्या पर्यायांचा अवलंब करावाच लागणार आहे. प्रदूषणकारी डिझेलसारख्या इंधनाला पर्यायी जैवइंधने ही काळाची गरज आहे. गोव्यासारख्या पर्यटनप्रधान राज्यामध्ये येथील निसर्गसौंदर्याला बाधा पोहोचवायची नसेल तर अशा पर्यायी इंधनांच्या वापराला प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. टॅक्सींमध्येही अशा प्रकारच्या पर्यायी इंधनाच्या वापराचा आग्रह सरकारने धरावा लागेल. डिझेल आणि पेट्रोलची चैन फार काळ चालणार नाही. न्यायालयेही अशा प्रदूषणकारी इंधनाबाबत कठोर भूमिका घेणार आहेत. त्यामुळे काळाची पावले ओळखून नव्या पर्यायांचा शोध आणि नव्या तंत्रज्ञानाचा वेध घेत पुढे जायचे आहे. सीएनजीवर चालणार्‍या बसगाड्या ही या बदलांची सुरूवात ठरावी.