सीएए विरोधक – समर्थकांत दिल्लीत संघर्ष : अलीगडमध्येही हिंसाचार

0
180

सीएए प्रश्‍नावरून काल दिल्लीसह उत्तर प्रदेशमधील अलीगड येथेही मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या. उभय ठिकाणी पोलीस व निमलष्करी दलांनी बळाचा वापर करून स्थितीवर नियंत्रण आणले. दिल्लीतील जाफ्राबाद मौजपूर येथे सीएए विरोधी व सीएए समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष उडाला. उभय बाजूंकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याने अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे मौजपूर येथे तणावपूर्ण वातावरण असल्याचे सांगण्यात आले.

शाहीनबाग येथे गेल्या सुमारे ७० दिवसांपासून सुरू असलेल्या सीएए विरोधी आंदोलनासाठी रस्ते अडविलेल्यांना तेथून हटवावे या मागणीसाठी काल सीएए समर्थक लोकांनी मौजपूर येथील रस्ते अडवून आंदोलन सुरू केले होते. मौजपूर हा भाग जाफ्राबाद या भागाजवळच असून तेथे सीएए विरोधी निदर्शने सुरू होती. दोन्ही ठिकाणच्या निदर्शकांच्या तुलनेत पोलिसांची संख्या तुटपुंजी होती. त्यामुळे दोन गटांत घोषणाबाजीमुळे संघर्ष उडून परिस्थिती चिघळली व नंतर दगडफेक सुरू झाली.

दरम्यान दु. ३ वा. भाजपचे वादग्रस्त नेते कपिल मिश्रा व अन्य काहीजण सीएएविरोधी आंदोलक असलेल्या जाफ्राबाद मेट्रो स्टेशनजवळ पोचले व त्यांनी तेथील निदर्शकांना हटविण्याची मागणी केली. त्यामुळे संघर्ष निर्माण झाल्याचे सुत्रांनी सांगितले. संध्या. ४ वा. जोरदार दगडफेक सुरू झाली. पोलिसांची संख्या खूपच कमी असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. मात्र थोड्या वेळात सीआरपीएफचे जवान आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करून नियंत्रण आणले.
सुरक्षेच्या कारणावरून मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्थानकाच्या एंट्री-क्लाक्झिट गेटस् बंद केल्या होत्या.

दिल्ली पोलिसांना
कपिल शर्मांचा इशारा
भाजप नेते कपिल शर्मा यांनी सीएए समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले. यावेळी बोलताना कपिल शर्मा यांनी जाफ्राबाद, चांद बाग रस्ते ३ दिवसात मोकळे करा अन्यथा रस्त्यावर येण्याचा इशारा पोलिसांना काल दिला. जाफ्राबाद येथे सीएएविरोधी आंदोलक रस्ते अडवून आहेत. याबाबत आम्हाला कोणी समजावण्याचा प्रयत्न करू नये असेही शर्मा म्हणाले. जाफ्राबाद येथे महिलांसह सुमारे ५०० जण शनिवारी रात्रीपासून आंदोलन करीत आहेत.