सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

0
4

>> शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद; उद्या शपथविधी

कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र काल स्पष्ट झाले. काँग्रेसकडून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या यांची, तर उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांच्या नावाची घोषणा केली. तसेच, काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित करण्यात आला.

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काल या संदर्भात माहिती दिली. शनिवार दि. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले, तर 13 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले; परंतु सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकांनंतर हा प्रश्न काल निकाली निघाला.