साहित्यिक व दलित नेते दादू मांद्रेकर यांचे निधन

0
271

गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक आणि दलित समाजातील अग्रणी नेते दादू मांद्रेकर (६३) यांचे काल गुरूवार दि. २६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते आजीवन भारताच्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत राहिले. योगायोगाने भारताच्या संविधान स्थापना दिनी त्यांचे निधन झाले. मांद्रे येथे स्थानिक दफनभूमीत त्यांच्यावर बुद्धाची प्रार्थना करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, सुभाष केरकर तसेच साहित्यिक, सरपंच, पंच, पत्रकार आदी उपस्थित होते.

दादू मांद्रेकर हे दलित समाजाचे आधारस्तंभ होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित चळवळीला समर्पित केले. दादू यांनी आपल्या साहित्य आणि वृत्तपत्रातील लिखाणातून दलितांच्या समस्यांवर नेहमी प्रकाशझोत टाकला होता.

दादू मांद्रेकर यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावर त्यांनी मात केली होती. दादू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि महात्म्य हे पुस्तक लिहिले आहे. त्यांना छायाचित्राचा छंद होता. त्यांनी पणजीत बियॉन्ड द पेन ऍण्ड प्लेझर या शीर्षकाखाली आपल्या छायाचित्राचे प्रदर्शन भरविले होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना श्री. पार्सेकर यांनी, दादू मांद्रेकर हे छोटेखानी घरात राहात होते. मात्र त्यांचे कार्य मोठे होते. तत्त्वनिष्ठ व्यक्ती आणि साहित्यिक असलेल्या दादूंच्या जाण्यामुळे साहित्यात आणि दलित समाजात पोकळी निर्माण झाली आहे असे म्हटले आहे.
रमाकांत खलप यांनी, मांद्रे गावचे ज्येष्ठ नागरीक, आंबेडकरी चळवळीतले खंदे कार्यकर्ते, साहित्यिक, छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक पैलूंमुळे समाजमान्य झालेले आमचे मित्र दादू मांद्रेकर यांच्या निधनाबद्दल आपल्याला दुःख झाले असल्याचे म्हटले आहे.
विरोधी पक्षनेेते दिगंबर कामत, प्रा. सुभाष वेलिंगकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व इतरांनी दुःख व्यक्त केले आहे.