- डॉ. मनाली महेश पवार
पाऊस पडायला सुरुवात झाली की साथीचे रोग पसरायला सुरुवात होते. त्यात लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे कांजिण्या. हा एक संसर्गजन्य आजार आहे. ‘कांजिण्या’ म्हणजे ‘चिकनपॉक्स’ किंवा ‘व्हेरिसेला.’ या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. त्यामुळे मुलांनी सतर्क राहावे.
पाऊस पडायला सुरुवात झाली की साथीचे रोग पसरायला सुरुवात होते. त्यात लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे कांजिण्या. हा एक संसर्गजन्य आजार आहे. ‘कांजिण्या’ म्हणजे ‘चिकनपॉक्स’ किंवा ‘व्हेरिसेला’ या नावानेही ओळखले जाते. या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. परंतु मोठ्यांनाही याची लागण होऊ शकते.
कांजिण्या आजार हा व्हेरिसेला-झोस्टर व्हारसमुळे होतो. व्हॅरिसेला-झोस्टर व्हारसच्या इन्फेक्शनमुळे कांजिण्या आजाराचा संसर्ग होत असतो. याशिवाय कांजिण्या असलेल्या व्यक्तीकडून याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. अशा प्रकारे कांजिण्या आजार होत असतो.
कांजिण्याची लागण झालेल्या रुग्णाच्या खोकला, शिंका, लाळ, रुग्णाचे दूषित कपडे किंवा रुग्णाच्या अंगावरील फुटलेल्या फोडातील पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीमध्येही कांजिण्याची लागण होऊन हा आजार पसरतो.
कांजिण्याची लक्षणे
शरीरात व्हायरसची लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यासाठी साधारण 7 ते 21 दिवस लागू शकतात. अशावेळी ‘चिकनपॉक्स’मध्ये सुरुवातीला ताप येणे, सर्दी व खोकला होणे, डोकेदुखी, भूक मंदावणे अशी लक्षणे जाणवू शकतात. ही लक्षणे जाणवू लागल्यानंतर एक किंवा दोन दिवसांत अंगावर लाल किंवा गुलाबी रंगाचे पुरळ (फोड) येण्यास सुरुवात होते. अशावेळी ः
- पुरळ आलेल्या ठिकाणी खाज सुटते.
- त्यानंतर पुढील पाच ते सात दिवसांत त्या पुरळात पाणी व पू धरतो.
- पुढे ते फोड फुटतात व त्याठिकाणी काळसर डाग दिसू लागतात.
- त्यानंतर काही दिवसांत कांजिण्या आजार बरा होतो व त्वचेवर आलेले डागही काही दिवसांनी नाहीसे होतात.
कांजिण्यावर लक्षणानुसार उपचार केले जातात. ताप आणि खोकला कमी करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. पुरळावर जंतुनाशक क्रीम लावण्यासाठी दिली जाते. खाज कमी करण्यासाठी ‘अँटीहिस्टामाइन’ औषध दिले जाते. एक ते दोन आठवड्यात आजार बरा होतो. काही दिवस डाग मात्र राहू शकतात.
औषधोपचारांबरोबर रुग्णांनी योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
- औषधे वेळेवर घ्यावीत.
- त्वचेवरील फोड नखांनी फोडू नयेत.
- रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
- इतरांना याची लागण होऊ नये यासाठी काही दिवस कांजिण्या झालेल्या मुलास शाळेत पाठवू नका.
- मोठ्या व्यक्तींनीही कांजिण्या झाल्यास काही दिवस घरीच थांबावे.
- चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे वाटल्यास हॉस्पिटलमध्ये भरती होणे आवश्यक आहे.
पूर्वी कांजिण्या झाल्यास जेवणावर बरीच बंधने घातली जायची. ती योग्यही आहेत.
- वरण-भात, उसळ, डाळ, दुधाचे पदार्थ खावेत.
- पचायला हलका असा आहार घ्यावा. यात प्रामुख्याने पेज, मुगाचे कढण, भाज्यांचे सूप घेणे हितकारक ठरते.
- अंडे, चिकन, मासे, मटण अशा प्रकारचा पचण्यास जड असा आहार सेवन करू नका.
- लोह घटक असलेल्या पालक, मेथी, बीट, गाजरसारख्या भाज्या खाव्यात.
- पपई, सफरचंद, केळी, काळ्या मनुका, अंजीरसारखी फळे खावीत.
- तळलेले, झणझणीत, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
- डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ पिणेही आवश्यक असते. यासाठी पाणी, शहाळ्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट पावडरचे पाणी जरूर द्यावे.
- कांजिण्यामध्ये केवळ अंगावरच नव्हे तर तोंडाच्या आतसुद्धा फोड येऊ शकतात. अशावेळी जास्त तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, लसूणसारखे पदार्थ टाळावेत. त्यामुळे तोंडाला जास्त त्रास होऊ शकतो. तोंडात फोड आलेले असल्यास काही दिवस असे झणझणीत पदार्थ खाणे टाळले पाहिजे. तोंडात आतून तुपाचे लेपन करावे. त्यातही आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले तुपाचे लेपन करावे.
- याशिवाय द्राक्षे, अननस, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, लोणची, लसूण, जास्त खारट पदार्थ, कॉफी हे पदार्थ कांजिण्या झाल्यावर खाऊ नयेत.
कांजिण्या होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी
- लहान बालकांना आवश्यक त्या लसी वेळेवर द्याव्यात.
- कांजिण्या झालेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे.
- दूषित हातांचा स्पर्श आपले तोंड, डोळे यांना होणार नाही याची काळजी घ्यावी.
- कांजिण्या असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- जन्मल्यापासून वयाच्या पंधरा वर्षांपर्यंत कधीही कांजिण्या न झालेल्या व्यक्तींनी पुढे कांजिण्या आजार होऊ नये यासाठी कांजिण्याची लस घ्यावी. मोठेपणी होणारा कांजिण्या आजार हा जास्त त्रासदायक असतो.
कांजिण्या आजार झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये या आजाराची रोगक्षमता निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना पुढे सहसा कांजिण्या आजार होत नाही.
कांजिण्यावर काही आयुर्वेदिक उपचार
कांजिण्या रोगाचे आयुर्वेदिक उपचार पदवीधर वैद्याकडूनच करावेत. कांजिण्या रोगाचे आयुर्वेदिक उपचारात खालील उपक्रमांचा समावेश होतो-
- शमन चिकित्सा
- नैमित्तीक रसायन चिकित्सा
- पथ्यापथ्य
- शमन चिकित्सा ः ही औषधे वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत. कारण रुग्णाचे वय, वजन, प्रकृती, दोषप्राबल्य, बल, आजाराची अवस्था यानुसार औषधे व त्यांची मात्रा पूर्णपणे बदलतात.
- पंचतिक्तक कषाय 10 मिली रोज 3 वेळा सप्रमाणात पाण्याबरोबर घ्यावा.
- द्राक्षारिष्ट रोज तीन वेळा समप्रमाण पाण्यासोबत घ्यावा.
- मृत्युंजय रसाची 1 गोळी दिवसातून 3 वेळा आद्रक स्वरस व मधासोबत जेवणानंतर सेवन करावी.
- दशांग लेप तुपात कालवून त्याचा सर्वांगावर लेप करावा. यामुळे खाज व डाग कमी होण्यास मदत होते.
- नैमित्तिक रसायन ः कुमारकल्याण रस 1 गोळी रोज 2 वेळा घ्यावी. त्याचप्रमाणे कमदुधा, मुक्तावटी, मृत्युंजय रस, नारदेय लक्ष्मीविलास रस, संशमनी वटी, अमृतारिष्ट, कषाय इ. औषधे कांजिण्या आजारासाठी वापरतात.
- पथ्यापथ्य ः
- आहारात दूध, पचावसास हवले, ताजे अन्नपदार्थ, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा.
- ताक, डाळिंब, आवळे खावेत.
- किमान 7 दिवस तरी घराबाहेर जाऊ नये.
- अति तिखट, तेलकट, दही, बेकरी उत्पादने, मटण खाऊ नये.
- उन्हात, वाऱ्यात जाऊ नये, आराम करावा. कष्टाची कामे करू नयेत.
सध्या गोव्यात शाळकरी मुलांमध्ये कांजिण्या या आजाराचा प्रसार होत आहे, तेव्हा मुलांनी योग्य काळजी घ्यावी.