सावधान! गोव्यात गुन्हेगारी वाढतेय…

0
59
  • प्रमोद ठाकूर

गोव्यात चोर्‍या, खून, मुली-महिलांवरील अत्याचार, फसवणूक, घरफोड्या यांच्याबरोबरच अमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. अमलीपदार्थांच्या व्यवहारामध्ये पूर्वी विदेशातील नागरिक गुंतलेले असायचे. आता परप्रांतीय नागरिकांबरोबरच स्थानिक युवकसुद्धा गुंतलेले आढळून येत आहेत. अमलीपदार्थ प्रकरणामध्ये स्थानिकांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनत चालला आहे…

म्हापसा येथे चंदगड (महाराष्ट्र) येथील एका पर्यटक गटाला करण्यात आलेली मारहाण, दमदाटी करून करण्यात आलेल्या लुबाडणुकीच्या प्रकारामुळे गोव्याची देशपातळीवर बदनामी झाली आहे. तसेच, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील भावी डॉक्टरांपर्यंत पोहोचलेला अमलीपदार्थ हा मोठा चिंतेचा विषय आहे. किनारी भागात, रेव्ह पार्ट्यांमध्ये मिळणारे अमलीपदार्थ आता महाविद्यालयांपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस यंत्रणेचा धाक गुन्हेगारांना राहिलेला दिसून येत नाही. चोर्‍या, खून, मुली-महिलांवरील अत्याचार, फसवणूक, घरफोड्या यांच्याबरोबरच अमलीपदार्थांच्या फैलावामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांपर्यंतसुद्धा अमलीपदार्थ पोचविले जात असल्याचेही उघड झाले आहे.
गोवा राज्य देश-विदेशात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. या पर्यटन व्यवसायाचा गैरफायदा घेऊन पर्यटकांना लुबाडणार्‍या परप्रांतीयांच्या टोळ्या येथे सक्रिय झाल्या आहेत, असेच सध्याचे चित्र पाहता दिसून येते. गोवा पर्यटन खात्याकडून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी देश-विदेशात प्रसिद्धी केली जाते. तथापि, पर्यटकांची होणारी लुबाडणूक बंद करण्यासाठी पाऊल उचलले जात नाही. किनारी भागात पर्यटकांच्या विविध प्रकारच्या सामानाच्या चोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. पर्यटकांकडून या लहानसहान चोर्‍यांबाबत तक्रारी केल्या जात नसल्याने चोरट्यांचे आयतेच फावते आहे. पर्यटकांकडून चोरीबाबत सरकारच्या नावे बोटे मोडली जातात. पर्यटक गोव्यातून कटू अनुभव घेऊन परत जातात तेव्हा ते गोव्याविषयीचा वाईट अनुभव इतरत्र कथन करतात. त्यामुळे गोव्याची बदनामी होते.

चंदगड येथील पर्यटक गटाला करण्यात आलेली मारहाण व लुबाडणूकप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करून आतापर्यंत सहा जणांना अटक करून कारवाई सुरू केली आहे. पर्यटकांची लुबाडणूक आणि मारहाणप्रकरणी अटक केलेले सर्व सहाही संशयित आरोपी परप्रांतीय आहेत. त्यात तीन परप्रांतीय युवतींचा समावेश आहे. कळंगुट पोलिसांनी पर्यटकांच्या विविध प्रकारच्या सामानाची चोरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तिघेही संशयित परप्रांतीय आहेत. समुद्रकिनार्‍यावर नियुक्त केलेल्या पर्यटक पोलिसांकडून योग्य प्रकारे काम केले जात नाही. किनारी भागात पर्यटकांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.

परराज्यातून पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना भाड्याने कार, दुचाकी, हॉटेल, पर्यटक मार्गदर्शक आदी प्रकारची सेवा देण्यासाठी एजंटच्या हाताखाली परप्रांतीय मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. राज्यात प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शकांची संख्या कमी आहे. आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांपर्यंत पर्यटक पोहोचतही नाहीत, कारण एजंटच्या हाताखाली काम करणारे परप्रांतीय त्यांना हेरून आपल्या जाळ्यात अगोदरच ओढतात आणि मग त्यांना लुबाडण्याचे प्रकार घडतात. परप्रांतीय एजंट देशी पर्यटकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधतात. त्यामुळे देशी पर्यटक त्या एंजटाच्या विविध आमिषांना बळी पडतात. परप्रांतीयांकडून होणार्‍या पर्यटकांच्या लुबाडणुकीच्या प्रकारामुळे गोव्याची बदनामी देशपातळीवर होत आहे. म्हापशात झालेली पर्यटक गटाला मारहाण व लुबाडणूक हे एक उदाहरण आहे. राज्यात येणार्‍या कित्येक पर्यटकांची लुबाडणूक केली जाते. याबाबत पर्यटकांकडून तक्रार केली जात नाही.

पणजीमध्ये एका पर्यटकाचे अपहरण करून त्याला लुबाडण्याची घटना नुकतीच घडली आहे. त्या पर्यटकाला दुचाकीवर बसवून अज्ञान ठिकाणी नेऊन लुटण्यात आले. याबाबत पर्यटकाने पणजी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. पर्यटकांना कारगाडी, दुचाकी आदी वाहने भाडेपट्टीवर देण्यावरूनसुद्धा फसवणूक केली जाते. पणजीमध्ये जलसफारी, कॅसिनोंमध्ये स्वतःची वाहने घेऊन येणार्‍या देशी पर्यटकांना परप्रांतीय एजंटाकडून भर रस्त्यात दुचाकी आडव्या घालून अडवून आमिषे दाखविली जातात. या प्रकाराचा रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या वाहनांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पोलिसांकडून या प्रकाराची दखल घेतली जात नाही. पर्यटन खात्याने पर्यटकांची लुबाडण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, त्यांवर तातडीने कारवाई करून, येथील वातावरण सुधारण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. किनारी भागातील पर्यटन सेवा परप्रांतीयाच्या हातात गेलेली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी म्हापसा येथील पर्यटन गटाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर म्हापशाच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन मारहाणप्रकरणी चर्चा करून कडक कारवाईची सूचना केली आहे.

राज्यात चोर्‍या, घरफोड्या, खून, मुली-महिलांवरील अत्याचारांच्या प्रकारात वाढ झालेली आहे. सलग तीन दिवस दिवसाढवळ्या घरफोडीची नोंद झालेली आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज पळविला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोर्‍या एकाच पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. या तिन्ही चोर्‍या नियोजनबद्धरीत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पोलीस यंत्रणा याप्रकरणी तपास करीत आहे. अजूनपर्यंत चोरटे पोलिसांना सापडू शकले नाहीत. परराज्यांतून चोरट्यांच्या टोळ्या काही दिवस धुमाकूळ घालून परत जातात. रस्त्यावरून चालणार्‍या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून पळ काढणार्‍या टोळ्या अधूनमधून कार्यरत होतात. पर्यटकांना भाडेपट्टीवर मिळणार्‍या दुचाकी या चोरट्यंाकडून भाडेपट्टीवर घेऊन त्यांचा चोर्‍या करण्यासाठी वापर केला जात आहे.

गोवा या लहान राज्यात दरवर्षी नोंद होणार्‍या विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. दखलपात्र गुन्ह्यांची नोंदसुद्धा जास्त आहे. घरफोड्या, चोर्‍या, दरोडे यांचे प्रमाण जास्त आहे. राज्यात ऑनलाइन पद्धतीच्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या एका मित्रालासुद्धा ऑनलाइन पद्धतीने लाखो रुपयांना फसविण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा फसवणुकीचा प्रकार पत्रकारांशी बोलताना सांगितला आहे. तसेच फेसबुकच्या माध्यमातूनही फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. नागरिक कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करताना विचार करीत नाही. त्याच्या आमिषाला बळी पडून व्यक्ती सांगेल त्यानुसार वागतात. अखेर फसवणूक झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येते व तेव्हा पश्‍चात्ताप करण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत. गोवा पोलिसांच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार्‍या फसवणुकीबाबत अनेक प्रकरणे नोंद होत आहेत. नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना सतर्क राहण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणा आणखीन सक्षम करण्याची गरज आहे. पोलीस खात्याकडून गैरप्रकारांबाबत माहिती मिळविण्यासाठी खास पोलिसांची (एलआयबी) नियुक्ती केली जाते. या पोलीस पथकाकडून गैरकृत करणार्‍यांची माहिती संबंधित पोलिसांना द्यायची असते. ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करताना दिसत नाही.

राज्यात आयपीएल क्रिकेट सामन्याच्या वेळी जुगार चालविणार्‍यांची अनेक प्रकरणे उजेडात आणण्यात आली आहेत. परप्रांतीयाकडून हॉटेल किंवा खोली भाडेपट्टीवर घेऊन बेटिंगचा जुगार चालविला जातो. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी सट्टा बंद होत नाही. राज्यात जुगारसुद्धा काही ठिकाणी नियमितपणे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. काही वेळा पोलिसांकडून जुगार खेळणार्‍यांवर कारवाई केली जाते. पण जुगार बंद होण्याचे नाव काढत नाही. या जुगारामुळे अनेक कुटुंबांना झळ पोहोचलेली आहे. हे जुगार बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. बेकायदा व्यवसाय करणार्‍यांकडून संबंधितांना हप्ते दिले जातात, असा सर्रास आरोप केला जातो. यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

राज्यात गुन्ह्यांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे सुरू आहे. म्हापसा परिसरात २ जून रोजी एका टोळक्याने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या तिघांच्या टोळक्याने दारूच्या नशेत पोलीस असल्याचे भासवून बंदुकीचा धाक दाखवून एका व्यक्तीला मारहाण केली. राज्यात धर्मांतरप्रकरणी शिवोली येथील डॉमनिक डिसोझा व इतरांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. राज्यात धर्मांतर केले जात असल्याचा आरोप केला जात होता. या धर्मांतराबाबत दोन तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कृती केली आहे. राज्यात धर्मांतराला थारा दिला जाणार नाही, धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी गरज भासल्यास खास कायदा करण्याची तयारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

खून, घरफोड्या आदी प्रकरणांची चौकशी होऊन संबंधिताना गजाआड केले जाते; मात्र अमलीपदार्थ प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही. एका प्रकरणाची नोंद झाल्यानंतर त्या प्रकरणापुरतीच चौकशी केली जाते. अमलीपदार्थांच्या बेकायदा व्यवहारातील एजंट, पॅडरलपर्यंत चौकशी जात नाही. अमलीपदार्थांच्या व्यवहारामध्ये गुंतलेल्या पॅडरलपर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचत नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील अमलीपदार्थ प्रकरणाची सखोल चौकशीची गरज आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अमलीपदार्थांचा पुरवठा कोण करतो, याचा कसून शोध घेतला पाहिजे. या प्रकरणात सहभागींची पोलखोल झाली पाहिजे. अमलीपदार्थांना आळाबंद घालण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. महाविद्यालयापर्यंत अमलीपदार्थ पोचविणार्‍यांना उघडे पाडले पाहिजे. पोलीस यंत्रणेने हे आव्हान स्वीकारण्याची गरज आहे.

राज्यातील समुद्रकिनारे, नाइट क्लब पार्टीमध्ये आढळून येणारा अमलीपदार्थ आता शहर, ग्रामीण भागात पोहोचला आहे. पणजी शहरात अमलीपदार्थांच्या विक्रीप्रकरणी फुगे विकणार्‍यालासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. राज्यातील महाविद्यालयांपर्यंत अमलीपदार्थ पोचविणार्‍या पॅडलर, एंजटाची साखळी तोडण्याची गरज आहे; अन्यथा महाविद्यालयातील अमलीपदार्थांमुळे आजच्या युवा पिढीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात अमलीपदार्थ प्रकरणी वाढत्या प्रकरणांची नोंद होत आहे. कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले जात आहेत.
राज्यात अमलीपदाथाचा विषय गेल्या कित्येक वषार्र्ंपासून चर्चेत आहे. गोवा विधानसभेतसुद्धा राज्यात फोफावत असलेल्या अमलीपदार्थांच्या विषयावर चर्चा झालेली आहे. अमलीपदार्थांच्या विषयाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. गोव्याला उडता पंजाब बनवू नका, वेळीच कारवाई करून अमलीपदार्थांला आळाबंद घालण्याची सूचना येत असूनही अमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अमलीपदार्थांच्या व्यवहारामध्ये पूर्वी विदेशातील नागरिक गुंतलेले असायचे. आता परप्रांतीय नागरिकांबरोबरच स्थानिक युवकसुद्धा गुंतलेले आढळून येत आहेत. अमलीपदार्थ प्रकरणामध्ये स्थानिकांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनत चालला आहे. राज्याच्या काही भागात अमलीपदार्थांची लागवड करण्यात आल्याचेही आढळून आलेले आहे.

गोमेकॉमधील अमलीपदार्थप्रकरणी पाच विद्यार्थ्यांना रेस्टीकेट करण्यात आले आहे. गोमेकॉत यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून कडक कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील इतर महाविद्यालयांपर्यंतही पॅडलर पोहोचले आहेत. त्यांना आळाबंद घालण्याची वेळीच कृती होणे गरजेचे आहे. राज्याच्या मध्यवर्ती कारागृहातील एका सुरक्षारक्षकाला अमलीपदार्थासह रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

राज्य सरकारने गुन्ह्यांमधील परप्रांतीयांच्या सहभागाची दखल घेतली असून पोलीस यंत्रणेला भाडेकरूची पडताळणी करण्याची सूचना केली आहे. घरमालकांना भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस स्टेशनवर सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. भाडेकरूंची माहिती न देणार्‍या घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. परराज्यातील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले अनेक जण भाडेकरू म्हणून येथे राहत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूची सविस्तर माहिती घेऊन पोलिसांना सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेकडून घरमालकाने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते. भाडेकरूची माहिती न देणार्‍या घरमालकावर कडक कारवाई केल्यास इतर घरमालक खडबडून जागे होऊन अशा प्रकरणांना थोडाफार तरी आळाबंध बसेल.

  • प्रमोद ठाकूर