सावईवेरे, केरी परिसरातील विद्यालयांना माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या त्या महिला स्वयंसाहाय्य गटाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. शालेय मुलांना नित्कृष्ट दर्जाचा माध्यान्ह आहार पुरविणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काल दिला.
राज्यातील विद्यालयातील मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहाराच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. माध्यान्ह आहार पुरविण्यासाठी चांगला दर दिला जात आहे. त्यामुळे मुलांना निकृष्ट माध्यान्ह आहार देण्याचे प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील स्वयंसाहाय्य गटांना काम देण्यासाठी माध्यान्ह आहार योजना चालविली जात नाही. त्यामुळे माध्यान्ह आहार पुरविणाऱ्यांनी आहार तयार करताना योग्य सावधगिरी बाळगून दर्जेदार आहार बनविला पाहिजे. राज्यातील विद्यालयांना माध्यान्ह आहाराचा पुरवठा करणाऱ्या स्वयंसाहाय्य गटाकडील आहार पुरविण्याचा काम बंद केले जाणार नाही. तथापि, नित्कृष्ट दर्जाच्या आहार पुरविणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारने काही विद्यालयातील मुलांना माध्यान्ह आहार पुरविण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेची निवड केलेली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
माध्यान्ह आहारात अळ्या असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आल्याने त्या महिला स्वयंसाहाय्य गटाचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एफडीएच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी सांगितले.