सावईवेरच्या मदनंत स्पोर्ट्‌स क्लबला जेतेपद

0
119

पंकज तारीच्या नाबाद ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर सावईवेरेच्या मदनंत स्पोर्ट्‌स क्लबने अंतिम सामन्यात ताळगावच्या सिद्धेश टायगर्स संघाचा ४ गड्यांनी पराभव करीत चिंबलच्या एसए क्रिकेटर्सने आयोजित केलेल्या २र्‍या अखिल गोवा टी-१० लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश टायगर्स संघाला ७ गडी गमावत ८० अशी धावसंख्या उभारता आली. शिशिर दिवकरने नाबाद २० तर निखिल दिवजीकरने २८ धावा जोडल्या. मदनंततर्फे रविकांत नाईकने ९ धावांत २, कृपेश पालकरने २१ धावांत २ तर पुण्या पालकरने २१ धावांत १ बळी मिळविला.

प्रत्युत्तरात खेळताना मदनंत स्पोर्ट्‌स क्लबने विजयी लक्ष्य ६ गड्यांच्या मोबदल्यात ८१ धावा करीत गाठले. पंकज तारीने नाबाद ३८, विकास देसाईने ११ तर अंबर नाईकने १० धावांचे योगदान दिले. सिद्धेश टायगर्सतर्फे मुक्तार काद्रीने १३ धावांत २, बसुराज मदारने १२ धावांत १ तर टेक बहादुरने १८ धावांत १ बळी मिळविला.
विजेत्या मदनंत स्पोर्ट्‌स क्लबला रु. १ लाख व आकर्षक चषक, उपविजेत्या सिद्धेश टायगर्सला रु. ५०,००० व चषक, तृतीय स्थानावरील राम बॉईज म्हापसाला रु. १५,००० तर चौथ्या स्थानावरील पीर्णच्या मराठा वॉरियर्स संघाला रु. ७,७७७ रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. अंतिम सामन्याचा सामनावीर – पंकज तारी (मदनंत), मालिकावीर – मुक्तार काद्री (सिद्धेश टायगर्स), उत्कृष्ट फलंदाज – शिशिर दिवकर (सिद्धेश टायगर्स), उत्कृष्ट गोलंदाज – अमिर खेडेकर (मदनंत), उत्कृष्ट यष्टिरक्षक – चेतन नाईक (मदनंत), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – आनंद बद्री (सिद्धेश टायगर्स) यांना बैयक्तिक बक्षिसे मिळाली. बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश नाईक यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.