‘साबांखा’मध्ये पुन्हा नोकरभरती; पण खात्यामार्फतच

0
5

>> कर्मचारी निवड आयोगामार्फत भरतीची मागणी फेटाळली; 386 पदांच्या भरतीसाठी फेरपरीक्षा घेणार : नीलेश काब्राल

सार्वजनिक बांधकाम खात्यातील पदांसाठी नव्याने होणारी नोकरभरतीची प्रक्रिया गोवा लोकसेवा आयोग किंवा कर्मचारी निवड आयोगामार्फत व्हावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली; मात्र ही नोकरभरती सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फतच पारदर्शकपणे आणि उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार केली जाईल, असे साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

काल प्रश्नोत्तराच्या तासाला विजय सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नीलेश काब्राल यांनी सदर माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम खात्यात ज्या 386 उमेदवारांनी कनिष्ठ अभियंते व तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज केले होते, त्या उमेदवारांची आता फेरपरीक्षा घेऊन सार्वजनिक बांधकाम खाते ही पदे भरणार आहे, असे काब्राल यांनी सांगितले. ही फेरपरीक्षा घेताना कोणताही गैरप्रकार होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल. सर्व उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल, असेही काब्राल म्हणाले.
2021 वर्षाच्या डिसेंबर महिन्यात हा घोटाळा झाला होता व त्यावेळी तत्कालीन सरकारमधीलच आमदार बाबूश मोन्सेरात यांनी हा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या नोकरभरतीत घोटाळा झाल्याचे सरकार मान्य करीत आहे का? असा सवाल विजय सरदेसाई यांनी केला.

या नोकरभरतीच्यावेळी अभियंता पदासाठी उमेदवारांकडून 30 ते 35 लाख रुपये एवढी लाच घेण्यात आली होती, असा आरोप होता. हा घोटाळा तब्बल 70 कोटी रुपयांचा असल्याचा आरोपही काही लोकांनी केला होता, असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना हा घोटाळा होता की नाही, त्याचे उत्तर चौकशीनंतरच मिळणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
त्यावर विजय सरदेसाई यांनी याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा घोटाळा होता की नाही याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली; मात्र याविषयी मंत्री काब्राल यांनी सर्व काही स्पष्ट केले आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

यावेळी सरदेसाई यांनी साबांखातील नव्याने होणारी भरती प्रक्रिया गोवा लोकसेवा आयोग अथवा कर्मचारी निवड आयोगातर्फे केली जावी, अशी मागणी केली आणि तसे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी केली; मात्र, त्यावर, ही प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेच पारदर्शकपणे होईल व सर्व उमेदवारांची निवड ही गुणवत्तेनुसार केली जाईल, असे काब्राल यांनी सांगितले.
यावेळी युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा आदींनीही या घोटाळ्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे सरकार व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सभागृह समिती स्थापन केली जावी, अशी मागणी देखील विरोधकांनी केली; मात्र सरकारने ती फेटाळून लावली.

चौकशी अहवाल पटलावर ठेवा
दक्षता खात्याने या घोटाळा प्रकरणी केलेल्या चौकशीचा अहवाल सरकारने विधानसभेच्या पटलावर ठेवावा, अशी मागणी यावेळी सरदेसाई यांनी केली. मात्र, त्यावर उत्तर देताना चौकशी अजुन पूर्ण झालेली नसून ती पूर्ण झाल्यावर अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे आश्वासन काब्राल यांनी दिले.

दक्षता खात्याकडून भरतीस मान्यता
मागच्या वेळी घेतलेल्या परीक्षेच्यावेळी झालेल्या गैरप्रकाराची चौकशी दक्षता खाते करीत आहे. साबांखामध्ये अभियंत्यांची उणीव भासत असून, कामावर परिणाम होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही दक्षता खात्याकडे ही पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने आता नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती नीलेश काब्राल यांनी दिली.