सात दिवसांत ५३ मृत्यूमुखी

0
289

>> राज्यात कोरोनाचे मृत्युकांड सुरूच

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच असून पहिल्या सात दिवसांत तब्बल ५३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गोवा राज्य कोविड चाचण्यांमध्ये देशात आघाडीवर आहे. परंतु, सरकारला राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र रोखण्यात अद्याप यश प्राप्त झालेले नाही. कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवनवीन आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे जाहीर केले जात आहे. तरीही, गंभीर आजारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रकार सुरूच आहेत.

आणखी ९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ९ रुग्णांचा बळी गेला असून कोरोना बळींची संख्या २४५ झाली आहे. आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाने गंभीर आजारी असलेले रुग्ण शेवटच्या टप्प्यावर उपचारासाठी येत असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न चालला आहे.

फोंडा येथील एका ४९ वर्षाच्या कोरोना रुग्णाला ६ सप्टेंबरला संध्याकाळी ३.३० च्या सुमारास बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णांचा केवळ तासाभरात मृत्यू झाला. नावेली येथील ५५ वर्षीय महिला रुग्ण, शिरदोन येथील ८३ वर्षांचा पुरुष रुग्ण, चिंबल येथील ६८ वर्षाचा पुरुष रुग्ण, मेरशी येथील ६६ वर्षाचा पुरुष रुग्ण, खांडोळा येथील ५४ वर्षांचा पुरुष रुग्ण, बेतकी येथील ५२ वर्षांचा पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ८३ वर्षांचा पुरुष रुग्ण आणि आसगाव येथील ४६ वर्षांचा पुरुष रुग्ण या नऊ जणांचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना काल दिवसभरात निधन झाले आहे. गोमेकॉकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची माहिती देणारे वेगळे बुलेटिन जारी केले जात आहे.