सातपुड्याची राणी पंचमढी

0
614

– सौ. पौर्णिमा केरकर

(पायाला भिंगरी)
(भाग-५)

मेमहिन्याच्या उन्हाळ्यात दरवर्षी एखाद्या तरी थंड प्रदेशाच्या ठिकाणी प्रवास करावा व तेथील निसर्गसंपन्न वातावरणामधून तनामनाला एक वेगळी ऊर्जा मिळवावी ही जणू काही मनाला आता सवयच जडलेली आहे.
‘शिमला, आबू, पंचमढी, महाबळेश्‍वर जान
उटकमण्ड अरू नीलगिरी, नैनीताल बखान’
असे एका कवीने आपल्या कवितेतून वैशिष्ट्यपूर्ण थंड हवेच्या ठिकाणांचे वर्णन केलेले आहे. त्यांतीलच मध्य प्रदेशात स्थित असलेल्या ‘पंचमढी’ या ठिकाणी जाण्याचा विचार पक्का झाला. भारताच्या मध्यभागी वसलेला हा प्रदेश चंबळ नदीपासून गोदावरीपर्यंतच्या भागात विस्तीर्णपणे पसरलेला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आंध्र, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या सात महत्त्वपूर्ण राज्यांनी घेरलेला हा प्रदेश राजकीयदृष्ट्या स्वतःचे वेगळेपण दर्शविणारा तर आहेच, परंतु त्याचबरोबर नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचे फार मोठे संचित या प्रदेशाला लाभलेले आहे. चंबळ, बेतवा, सोम, नर्मदा, तापी, महानदी व इंद्रावती या पाच प्रमुख नद्या या प्रदेशाच्या जीवनदायिनी आहेत. नर्मदा तर हा प्रदेश फिरताना सातत्याने सोबतीला राहिली. शिवाय नर्मदेशी मध्य प्रदेशाच्या असंख्य कडू-गोड प्रसंगांची गुंतवळ असल्याने तिच्याविषयीचे एक वेगळेच आकर्षण मनात होतेच. नर्मदेचे दर्शन घेतघेतच इथला प्रवास झाला.
गोवा ते मुंबई व पुढे मुंबई ते इंदौर हा विमान प्रवास व त्यानंतर पुढचा प्रवास हा बसचा. इंदौर ते पंचमढीला जातानाच्या प्रवासात भोपाळ-उज्जैन ही मोठी शहरे व असंख्य लहान गावांचे मनोहारी दर्शन होते. ग्रामीण आदिवासी जीवनाचे वेगळेपण या प्रदेशाला लाभलेले असल्याने तेथील लोकसंचिताच्या वेगळेपणाचे दर्शनही एकाच टप्प्यात घडले. शेतात चाललेली भाताची कापणी, मातीची छोटी छोटी घरे, मध्ये मध्ये भिंग चमकावे तशी लहान-लहान तळी जागोजागी दिसत होती. कष्टकरी हातांची खुण नर्मदेच्या किनार्‍यावरील सकस आणि सुपीक जमिनीमुळे अनुभवता येत होती. लहान लहान गावांतून पुढे गेलो की बरेली गाव लागतो. तेथूनच पंचमढीचा प्रवास अधिकृतरीत्या सुरू होतो. ‘झुमका गीरा रे बरेली के बाजार में’ हे गीत गावचे नाव वाचताक्षणीच आठवते.
मध्य प्रदेशाच्या प्रवासात जास्त चढ-उतार नव्हते. सरळसोट प्रवास. अवतीभोवती विस्तीर्ण पसरलेली शेतजमीन, छोटी-छोटी कौलारू घरे, आजूबाजूला शेतात चरणारी गुरेवासरे हे सारेच दृश्य लोकसंस्कृतीची आठवण करून देणारे होते. प्रखर उन्हाळा डोक्यावर घेऊनच सतत कष्ट करायचे ही जणू सवयच इथल्या लोकमानसाला जडलेली आहे. इथले लोकमन वर्षानुवर्षे हा ग्रीष्माचा दाह सहन करीतच जीवनाची वाटचाल करतात. एखाद्या प्रदेशाची भौगोलिक रचना, तेथील वातावरण हे सारेच अंगवळणी पडते. लोकमनाची ती जीवनसरणीच बनते. आम्ही मात्र धावत्या एअरकंण्डिशन बसमधून उष्म्याच्या गोष्टी करीत पंचमढी या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास तत्पर होतो.
मध्यभारतातील बहुतांश प्रदेशाला थंड हवेचे ठिकाण म्हणून गेल्या शतकभरापासून पंचमढी उपयुक्त ठरलेले आहे. मध्य प्रदेश आणि परिसरातील जनतेला ग्रीष्म ऋतू सुरू झाला की उन्हाचा वारेमाप त्रास सोसावा लागतो. मध्यभारतातील उष्म्याच्या लाटा जेव्हा असह्य होतात तेव्हा इथल्या लोकांना पंचमढीची आठवण येते. मध्य प्रदेश हा इतिहासपूर्व कालखंडापासून आदिमानवाच्या वास्तव्यासाठी, त्यांच्या संचारासाठी नावारूपास आलेला आहे. आज आदिवासी जमातीचे प्रामुख्याने वास्तव्य याच प्रदेशात असून पंचमढीसारख्या ठिकाणावरती आदिमकाळातल्या आदिमानवाच्या कालखंडापासून आदिवासी संस्कृतीच्या वैविध्यपूर्ण पैलूंचे दर्शन घडते. पंचमढी ही मध्यभारताची ब्रिटिश अमदानीत राजधानीच्या लौकिकास पात्र ठरली होती. १८५७ मध्ये ब्रिटिश सैन्याचा अधिकारी जेम्स फोरसीथ सैन्याचा चमू घेऊन झासीला जात होता तेव्हा तो पंचमढीला आला. तिथली सातपुडा पर्वतरांगांतील आकाशाला गवसणी घालणारी शिखरे, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे जलस्रोत, हिरव्यागार वृक्षवेलींनी समृद्ध असलेला परिसर पाहून तो पंचमढीच्या प्रेमातच पडला. त्यानंतर अल्पावधीतच आदिवासी प्रमुखाच्या सत्तेखाली असलेल्या पंचमढीचा कायापालटच झाला.
पंचमढी आणि परिसरात हिंदी भाषेचे प्राबल्य आहे. इथल्या पारंपरिक लोकसंकेतानुसार ‘पंचमढी’ या शब्दाचा अर्थ होतो ‘पाच गुंफा.’ महाभारतात धर्मराजासह पांडव आपल्या वनवासाच्या कालखंडात पंचमढीला आले होते आणि त्यांनीच अज्ञातवासात राहण्यासाठी या गुंफा खोदल्या होत्या अशी लोकश्रद्धा प्रचलित आहे. या गुंफा पांडवांनी खरोखरच खोदल्या की नाहीत याचे पुरावे काही सापडलेले नाहीत. परंतु असे असले तरी भारतातील अन्य प्रांतांप्रमाणे या गुंफा पांडवांशी संबंधित झालेल्या आहेत. पंचमढीचा एकूण परिसर ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वैभवाच्या पैलूंनी पूर्वापार श्रीमंत आहे. येथे निसर्गाने आपल्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्ते केलेली आहे, त्यामुळेच ‘कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणिंद्रमाथा मुकूट झळाळी’ अशा स्वरूपात उल्लेख होणारा शिवशंभो इथे वास्तव्याला आहे. पंचमढीमध्ये बारमाही आल्हाददायक हवामान असल्याने या ठिकाणी पर्यटकांबरोबर रुग्णही हवापालट करण्यासाठी येतात. युद्धाच्या वेळी एखाद्या सैनिकाला प्रदीर्घकाळ उपचार आणि विश्रांती घेण्याची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला पंचमढी येथील सैनिक इस्पितळात पाठवले जायचे. इथल्या हवेत आजारी आणि जीवनातला उत्साह हरवलेल्या रुग्णाला चैतन्यप्राप्ती होते असे मानले जाते. विसाव्या शतकाच्या आरंभी मंचमढीमध्ये खूप कमी लोकसंख्या होती, परंतु आज हे चित्र पालटलेले आहे. भारतातील अन्य प्रांतांतील थंड हवेच्या ठिकाणांची जी परिस्थिती झालेली आहे तशीच वाटचाल पंचमढी करताना दिसत आहे. भारतात बर्फाने आच्छादलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा जशा पूर्वेला आणि उत्तरेला पसरलेल्या आहेत, हिरव्यागार वृक्षवेली आणि जैविक संपदेने समृद्ध पश्‍चिमघाट दक्षिणेला आहे, त्याचप्रमाणे मध्यभारतात सातपुड्याच्या पर्वतरांगा आपल्या नैसर्गिक वैभवाने इथल्या लोकमानसाबरोबर वन्यजिवांनाही जगण्यासाठी आधार ठरलेल्या आहेत. पंचमढीचे जंगल पट्टेरी वाघ, बिबटे आदी प्राण्यांसाठी जसे ख्यात आहे, तसेच वनौषधींचा खजिनाही त्याला लाभलेला आहे. ज्या परिसरात वृक्षवेलींनी व्यापलेली जंगले, पर्वतरांगा आहेत, त्याच परिसरात जलस्रोतांच्या लावण्यमयी दर्शनाने मानवी मनाला मोहीत केलेले आहे.
मध्य प्रदेशातील होशांगबाद जिल्ह्यात पंचमढी येत असून धुपगड या शिखराची उंची १३५० मीटर एवढी आहे. गोंड राजा भावुतसिंग यांच्या ताब्यात पंचमढीचा प्रांत होता. परंतु कॅप्टन जेम्स फोरसिथ याने सुभेदार मेजर नाथू रामजी पोवार यांच्या साहाय्याने पंचमढीला नावारूपास आणले. आदिमानवाच्या कालखंडात पंचमढीचे जंगल आणि त्यातल्या गुंफा गजबजलेल्या होत्या याची प्रचिती इथल्या कित्येक गुंफांत आढळलेल्या आदिमानवाच्या चित्रकलेतून येते. इथल्या गुंफेतील चित्रे जवळपास दहा हजार वर्षांचा इतिहास सांगतात. शंकर हा भारतीय धर्मसंस्कृतीत पर्वतांचा राजा म्हणून ओळखला जातो. यासाठी पंचमढीला बडामहादेव, गुप्तमहादेव, शौरागड, जटाशंकर आदी रूपांत तो अनुभवता येतो. इथल्या पर्वतरांगांची एकूण रचना अनुभवताना गुंफांचे अनोखे नैसर्गिक विश्‍व अचंबित करते. पन्नासपेक्षासुद्धा जास्त पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर अतिशय गार पाण्यात स्थित शिवलिंग आणि त्याच्यासोबतच असलेली शेषशायी नागाची दगडातील कोरीव प्रतिमा लक्ष वेधून घेते. जटाशंकर आज ज्या गुंफेत पुजला जातो ती खरे तर एक नैसर्गिक गुंफा. या गुंफेत चुनखडीचे दगड असून स्टलगामाईटमुळे या ठिकाणी नैसर्गिकरीत्या लिंगाची रचना आहे. त्यामुळे नैसर्गिक वैभवाने नटलेली ही गुंफा धार्मिक संचितासाठी ख्यात आहे. जटाशंकराचे स्थळ हा खरेतर निसर्गाचा चमत्कार असून त्याच्याभोवती धर्माचे वलय निर्माण झाल्याने आज धर्माचे केंद्र म्हणून या गुंफा नावारूपास आलेल्या आहेत. झरे, तलाव आणि नैसर्गिक गुंफा यांमुळेच जटाशंकराचे दर्शन लोकमानसाला दिव्यत्वाची प्रचिती देते. गुंफेत गेल्यावर अतिशय थंड वाटते. वर नजर करून बघितल्यावर गगनाला गवसणी घालणारे उभेच्या उभे महाकाय पाषाण दिव्यात्वाचा साक्षात्कार घडवतात. ‘गुप्तमहादेवाची गुंफा’ हासुद्धा असाच एक नैसर्गिक चमत्कार आहे. एका वेळेला एकच व्यक्ती, तीसुद्धा एका बाजूनेच जाऊ शकते एवढी निमुळती वाट आहे. इथेही धार्मिक भावनेने आलेल्या पर्यटकांची रांगही भलीमोठी. त्यामुळे धूप-अगरबत्ती जाळणे हे प्रकार आलेच. जवळजवळ चाळीस फूट लांब असलेल्या या गुंफेत एका वेळी एक-एक करून आठच व्यक्ती प्रवेश करू शकतात. त्यांचे झाले की मग दुसर्‍यांनी जायचे. त्यामुळे ही गुंफा बघण्यासाठी लांबच लांब रांग करावी लागते. प्रवेशद्वारावरच हनुमानाची भलीमोठी प्रतिमा व त्याच्या सभोवताली वावरणारी वनारांची जिवंत फौज पर्यटकांचे आकर्षण ठरते. गुंफेतील शिवलिंग आणि गणेशदर्शन घेण्याच्या मनोवृत्तीतून येणारे पर्यटक खरेतर या नितांतसुंदर प्रदेशातील शांतताच भंग करीत असतात. वानरांचे खाद्यच इथे नष्ट झालेले आहे. ठिकठिकाणी ‘वानरांना तुमच्याकडील कसल्याही तर्‍हेचे खाद्य घालू नका’ अशा तर्‍हेच्या वारंवार सूचना देऊन, सूचना फलक वाचूनही गुंफेत जाण्यासाठी प्रतीक्षेत असलेला समूह वानरांना खिजविण्यासाठी, त्यांच्याकडून स्वतःचे मनोरंजन करून घेण्यासाठी त्यांना आपल्याकडील खाऊ घालतात. वानरांची एक मोठी फौजच इथे वावरते. माणसाच्या अशा आततायीपणाच्या वागण्यातून कधीमधी छोटेमोठे अपघातही घडल्याचे ऐकू येते. इतिहाससंशोधक, संस्कृतीप्रेमी यांच्यासाठी गुंफांचा परिसर असलेली पंचमढी हे एक आव्हानात्मक अभ्यासाचे ठिकाण आहे. कधीकाळी घडलेल्या जलप्रपातांमुळे या गुंफांना एक वेगळेपण आले असे मानतात. भगवान शंकराने आपल्या जटांचा त्याग इथे केला होता त्यामुळे या परिसराला ‘जटाशंकर’ हे नाव देण्यात आले अशी आख्यायिका आहे. पांडवगुंफा, गुप्तमहादेव, बडे महादेव, जटाशंकर या नैसर्गिक सौंदर्याने युक्त असलेल्या जागा म्हणजे निसर्गाचा चमत्कारच वाटतो. त्याशिवाय इथल्या परिसरात असलेली प्रेक्षणीय स्थळे म्हणजे- ‘बी फॉल’, प्रियदर्शनी पॉईंट, माडादेव रॉक पेंटिंग- इथे तर नैसर्गिक लाल व पांढर्‍या रंगातील योद्याची चित्रे दरवाजावरती रंगवलेली आढळतात. प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक चर्च म्हणजे एक वास्तुकलेचा वेगळा नमुना अनुभवता आला. आतील लाकडी कोरीवकाम डोळे दीपावणारेच आहे. पांडवांच्या पाच गुंफा बघितल्यानंतर ‘हांडी खो’ बघण्याचा आनंद लुटला. येथे इंग्रजीतील ‘व्ही’ आकाराने झाडाझुडपांची रचना केलेली दिसते. इंग्रज ऑफिसरने म्हणे तीनशे फूट खोल दरीत आत्महत्या केली होती. त्याचे नाव ‘हांडी’; त्यामुळे या जागेचे ‘हांडी खो’ असे नाव प्रचलित झाले. पंचमढीला फिरताना ठिकठिकाणी इंग्रजी राजवटीच्या खाणाखुणा आजही इतक्या वर्षांनी ठळकपणाने जाणवत राहिल्या.
‘पर्यटन’ हाच पंचमढीसाठी व्यवसाय ठरलेला आहे. पर्यटन व्यवसायाला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे लोक इथे आकर्षित होतातच, परंतु त्याचबरोबर वैविध्यपूर्ण गुंफांनी गुंफलेल्या या परिसराला भगवान शंकराचे अधिष्ठान लाभल्याने लाखो पर्यटक धार्मिक श्रद्धेने इथपर्यंत येतात. इतर धार्मिक तीर्थस्थळांवर दिसत असलेली बेशिस्त वृत्ती या स्थळावर जरी दिसत नसली तरी गुंफेतील पिंडीवर फुले वाहणे, धूप-दीप जाळणे यामुळे वातावरण अस्वच्छ होते. एवढे सारे पर्यटक इथे येत असतात. बंदोबस्त चोख असल्याने शिस्त आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी इथे अनुभवता आल्या. एकटेपणातील निराशा टाकून एकांतातील सर्जकतेच्या शोधात जर आपण असाल तर गोवा ते भोपाळ व त्यापुढे होशंगाबाद पिपरिया-पंचमढी असा बसमधून सहजसाधा प्रवास करत, अवतीभोवतीचा परिसर पाहत समुद्रसपाटीपासून ३५५५ फूट उंचीवर असलेल्या सातपुडा पर्वतरांगांत विसावलेल्या विलोभनीय ‘पंचमढी’चे सौंदर्य लुटा आणि आपले मन तृप्त करा.