साखळी नगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव संमत

0
151

>> पालिकेत सगलानी गटाचा विजय

>> भाजपचे सहाही नगरसेवक गैरहजर

साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठरावावर चर्चा होऊन तो ठराव धर्मेश सगलानी गटाने ७ विरुद्ध ० मतांनी जिंकला. यावेळी भाजप गटाचे सहाही नगरसेवक बैठकीस गैरहजर राहिले. तर सगलानी गटाचे सातही नगरसेवक उपस्थित होते.

भाजप गटातर्फे सत्ता वाचवण्यासाठी विविध प्रयत्न झाले होते. मात्र दोन्ही प्रयत्नांत उच्च न्यायालयाकडून चपराक मिळाल्याने अखेर काल शुक्रवारी दुपारी अविश्‍वास ठरावावर विशेष बैठक झाली. पालिका कार्यालयात झालेल्या या बैठकीस नगरसेवक धर्मेश सगलानी, राया पार्सेकर, ज्योती ब्लेगन, राजेश सावळ, असिरा खान, राजेंद्र आमेशकर, कुंदा माडकर हे सात नगरसेवक उपस्थित होते. तर भाजप गटाचे यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, रश्मी देसाई, शुभदा सावईकर, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर हे सहा नगरसेवक गैरहजर राहिले. निर्वाचन अधिकारी म्हणून राजेश आजगावकर, दीपक वायंगणकर उपस्थित होते. यावेळी वायंगणकर यांनी सगलानी गटाने अविश्‍वास ठराव ७ विरुद्ध ० मतांनी जिंकला असल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वी प्रभाग नऊमधील दामू घाडी या नगरसेवकाचे निधन झाले होते. त्यानंतर पालिकेत दोन्ही गटांचे बलाबल सहा सहा असे झाले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सगलानी गटाचे उमेदवार राजेंद्र आमेशकर हे विजयी झाल्याने सगलानी गटाचे सात नगरसेवक झाले.दरम्यान, राजेश सावळ यांना अपात्र ठरवण्यासाठी नोटीस बजावली गेली. तिला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर गुरूवारी राया पार्सेकर यांनाही अपात्र ठरवण्याची नोटीस दिली व पोलीस तक्रारही नोंदवण्यात आली. त्या दोन्ही प्रयत्नांना न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला. त्यामुळे नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावावरील चर्चेचा मार्ग मोकळा झाला.

उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास
पाच भाजप नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष असिरा खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यावर दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, रश्मी देसाई, बह्मानंद देसाई, शुभदा सावईकर यांच्या सह्या आहेत.

न्यायदेवता शाबूत ः सगलानी
सत्ता टिकवण्यासाठी अनेक प्रयोग करून शेवटी सर्वच बाबतीत असफल ठरलेल्या भाजप गटाला पराभव स्वीकारावाच लागला. हुकूमशाही कायम चालू शकत नाही. न्यायदेवताही अजून शाबूत आहे, हे यावरून सिद्ध होत असल्याचे धर्मेश सगलानी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.