साई प्रणिथने रचला इतिहास

0
115

प्रकाश पदुकोण यांनी १९८३ साली पदक जिंकल्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी भारताच्या बी. साई प्रणिथने इतिहास रचताना विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताला पदक मिळवून देणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या प्रणिथने चौथ्या स्थानावरील इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी याचा २४-२२, २१-१४ असा पराभव केला. तत्पूर्वी महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूने तैवानच्या द्वितीय मानांकित ताय त्झू यिंग या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला १२-२१, २३-२१, २१-९ असे पराजित करत विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील आपले पाचवे पदक पक्के केले. प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड होऊन आठवडा लोटलेला असताना प्रणिथने आपल्या अद्वितीय कामगिरीने उपांत्य फेरीत प्रवेश करत देशवासियांना अनोखी भेट दिली. उपांत्य फेरीत त्याचा सामना जपानच्या केंटो मोमोटो याच्याशी होणार आहे. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावतानाच संयम राखत प्रणिथने पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेममध्ये ७-१ अशी मोठी आघाडी घेतल्यानंतर प्रणिथने मागे वळून पाहिले नाही. सिंधू व ताय यांच्यात झालेल्या सामन्यातील पहिला गेम तायने एकतर्फी जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र सिंधूने तायची पुरती दमछाक केली. यामुळे तिसर्‍या व निर्णायक गेममध्ये तायचा खेळ खुलला नाही. दुसरा गेम जिंकून सामना खिशात घालण्याचा तायचा प्रयत्न होता. परंतु, तसेच घडले नाही. २०१३ व २०१४ साली कांस्यपदक जिंकलेल्या सिंधूने २०१७ व २०१८ साली या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले असून कालच्या विजयासह तिने किमान कांस्यपदक नक्की केले आहे.