सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मुसळधार कायम

0
4

काल सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने गोव्याला झोडपून काढल्याने राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने मालमत्तेचे नुकसान व वाहतुकीची कोंडी यासारख्या घटना घडल्या. तसेच सडा-वास्को आणि रावणफोंड-मडगाव येथे भूस्खलनाची घटना घडली.

काल पावसामुळे अनेक गावांत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली. रस्त्यांसह ठिकठिकाणी कोसळलेली झाडे काढून टाकण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना मदतकार्य हाती घ्यावे लागले. राज्यातील नगरपालिका व पंचायतींनी मान्सूपूर्व कामे करण्याकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसात मंगळवारी राजधानी पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा, वास्को, पेडणे, डिचोली या शहरांसह तसेच ग्रामीण भागांतील रस्तेही पाण्याखाली आले होते. त्यात काल पुन्हा जोरदार पाऊस कोसळल्याने सर्वत्र पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. काल दिवसभरात विविध केंद्रांवर कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. केपे 90 मिमी., मुरगाव 80 मिमी., धारबांदोडा 77 मिमी., काणकोण 72 मिमी., सांगे 53 मिमी., वाळपई 47 मिमी., म्हापसा मिमी., फोंडा मिमी. आणि पेडण्यात 22 मिमी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावसाचा वाढता जोर व वादळी वारे यामुळे नागरिक व पर्यटकांनी धबधबे तसेच धोकादायक ठिकाणी जाऊ नये आवाहन वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

कुठे काय घडले ?
जोरदार पावसामुळे पणजीतील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एक आंब्याचे भले मोठे झाड कोसळून पडले. त्यामुळे तेथे पार्क करून ठेवलेल्या 10 दुचाकी गाड्यांची मोडतोड झाली.

काणकोण-पैंगीण येथील म्हालवाडा येथे राहणाऱ्या निराधार महिलेच्या घारावर फणसाचे झाड कोसळून पडल्याने तिचे घर जमीनदोस्त झाले.
सडा, वास्को येथे उड्डाण पुलाजवळ सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होण्याची दुर्घटना घडली. त्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.
कासारवर्णे-पेडणे येथे पहाटे 4 च्या सुमारास एक मोठे वडाचे झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. वड कोसळल्याने एका दुचाकीचीही मोडतोड झाली.
कदंब महामंडळाने राजधानी पणजीसह, मडगाव तसेच अन्य ठिकाणच्या बसस्थानकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असल्याने बसस्थानक परिसरात गुढघाभर पाणी तुंबून राहण्याच्या घटना घडल्या.

रावणफोंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ भूस्खलन झाल्याने पुलावरून जाणारी वाहतूक बंद करून रेल्वे स्थानक मार्गे वळवण्यात आली.
पावसामुळे कोनशे-निरंकाल येथे मुख्य रस्त्याचा भाग कोसळला, तर खडपाबांध- फोंडा येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले.
फोंडा वरचा बाजार भागात आंब्याचे झाड कोसळून 17 दुचाकींचे नुकसान झाले.