सरत्या २०१६ सालास निरोप देताना…

0
761

– रमेश सावईकर

सकारात्मक विचार करण्याची सवय लागून तो आपला स्वभाव कसा बनेल यासाठी प्रयत्नांची गरज आहे. नवीन वर्षी आपण सशक्त व सकारात्मक विचारसरणी अंगिकारण्याचा संकल्प सोडूया! आपला विचार सकारात्मक असला की आपले भविष्यात कोणीच वाईट चिंतणार नाही असा आत्मविश्‍वास निर्माण होऊन तो वाढत जातो.

माणसाच्या आयुष्यात दिवस, महिने, वर्षे कशी झटकन निघून जातात ते कळतच नाही. हातांतून एखादी वस्तू नकळत निसटून जावी तशी! गतीशील कालचक्र हे पुढे पुढे सरकत असतं. जुन्याला इच्छा नसतानाही निरोप देत नव्याचं स्वागत करावं लागतं. दरवर्षी अखेरीस सरत्याला निरोप देत असताना त्या वर्षी आपण काय कमावलं अन् काय गमावलं याचा लेखा-जोखा आपण मनात घेत असतो.
आयुष्यातलं एक वर्ष सरलं, गमावलं याची संवेदना मन जड करतं तर दुसरीकडे जे नवं येईल ते निश्‍चितच चांगलं असेल, भलं असेल असे म्हणत ‘चांगभलं’ चिंतीत आपण प्रसन्न मनानं, नव्या ऊर्मी-उत्साह-आनंदाने त्याचं स्वागत करायला सज्ज होतो. सरत्या वर्षांत जी मौजमजा केली ती आगामी नववर्षांत करायला मिळेलच याची शाश्‍वती नाही असे आपण गृहीत धरून पुन्हा’ अशी मनात दृढ भावना ठेवून सरत्या वर्षाला मस्तीत-धुंदीत-बेहोषीत आनंद नि उत्साहात आपण निरोप देतो.
सरत्या वर्षाचा लेखा-जोखा मांडत असताना ज्या चुका झाल्या त्या पुन्हा करायच्या नाहीत असा निर्धार करतो. नवीन संकल्प करतो. नवी स्वप्ने रंगवतो. नव्या ध्येयाची मनात आखणी करतो. जुन्या कटू आठवणींना कायमची तिलांजली द्यायचा पक्का निश्‍चय करतो. पण प्रत्यक्षात काय घडते?
नूतन वर्षाचे संकल्प तडीस जातातच असे नाही. काही माणसांचे नवे संकल्प तर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रंगणार्‍या धुंद-बेहोषी मस्तीत – कैफात कुठल्या कुठे विरून जातात. अन् नववर्षारंभ झाला की पुनश्‍च हरिओम.. तसे त्याच जुन्या मार्गावरून त्यांची जीवनगाडी धावू लागते.
परंतु काहींचे संकल्प फक्त नावापुरते सोडण्यासाठी नसतात. त्यांचे संकल्प काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे असतात. असे जिद्दी लोक आपण सोडलेले संकल्प कृतीत आणतात. वर्षानुवर्षे हे संकल्प ते पाळतात. अशा महान तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, संकल्पनिष्ठ व्यक्तींचा आदर्श घेण्याचा, त्याच्यातून प्रेरणा घेण्याचा नवसंकल्प सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही सोडू या! स्वतःचे जीवन समृद्ध व्हावे, आपल्या प्रियजनांचे व इतरांचे जीवन आनंदी, समृद्ध आणि अर्थपूर्ण व्हावे म्हणून त्यादृष्टीने कार्यरत राहण्याचा नवसंकल्प सोडूया.
धावत्या जगासोबत नुसतं धावत राहणं म्हणजे खरं जीवन जगणं नव्हे. या धावत्या जगासोबत धावत असताना जीवनप्रवासात आपणाला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारतो. त्यांच्या काही गोष्टींच्या आपण इतकं आहारी जातो की त्याचाच उलटा आपल्याला मनस्ताप होतो. असा मनस्ताप टाळण्यासाठी माणसांची नीट पारख करून हवे तेवढेच त्यांच्याशी संबंध ठेवून परस्परांचे नाते संयमी व अतूट कसे राहील याची दक्षता बाळगावी लागेल. याची जाणीव ठेवून नव्या वर्षी वागण्याचा संकल्प तडीस नेऊया.
बर्‍याचवेळा आपण चांगल्या गोष्टींचाही उलटा अर्थ काढून विनाकारण त्या गोष्टीचा बाऊ करतो. विनाकारण विचार करण्याची ही संवय आपला स्वभाव बनून जातो. त्याचा आपल्या शरीर-मनावर प्रतिकूल परिणाम होतो. याचे मूळ कारण असते आपली नकारात्मक विचारसरणी. ती बदलायला हवी. सकारात्मक विचार करण्याची सवय लागून तो आपला स्वभाव कसा बनेल यासाठी प्रयत्नांची गरज आहे. नवीन वर्षी आपण सशक्त व सकारात्मक विचारसरणी अंगिकारण्याचा संकल्प सोडूया! आपला विचार सकारात्मक असला की आपले भविष्यात कोणीच वाईट चिंतणार नाही असा आत्मविश्‍वास निर्माण होऊन तो वाढत जातो. कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत सकारात्मक विचारातून मिळते.
आपण गरजेपेक्षा जास्त परावलंबी बनता कामा नये. स्वतःची कामे स्वतः करायची सवय ठेवली तर एक शिस्त लागते, ज्याचा आपल्याला फायदाच होतो. ‘जो दुसर्‍यावरी विसंबला… त्याचा कार्यभाग बुडाला!’ असं म्हटलं जातं. त्याचा अनुभव आपल्याला बरेचदा येतो. म्हणून आळस झटकून देऊन स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न नूतन वर्षी करूया.
सरत्या वर्षातल्या चुका, वाईट सवयी, वाईट विचार-आचार इत्यादींना फाटा देऊया. दिवास्वप्नांच्या मागे न लागता जी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तीच स्वप्ने पाहूया. नवी ध्येये साध्य होण्यासाठी योग्य आखणी करून त्या मार्गाने प्रयत्न, परिश्रम यांची शिकस्त करण्याचा दृढ निर्धार नववर्षारंभी करूया.
आपण कुणीतरी मोठे आहोत अशा घमेंडी वृत्तीत वावरण्याचा मूर्खपणा सोडून देऊया. आपण कुणीतरी असण्यापेक्षा आपण कुणाचेतरी असण्याचा निर्भेळ आनंद असतो तो आनंद अनुभवण्याचा संकल्प नववर्षाचे स्वागत करताना सोडूया.
सरत्या साली म्हणजे २०१६ मध्ये देशात, जगात विविध क्षेत्रात अनेक अप्रिय घटना घडल्या. नैसर्गिक आपत्ती कोसळल्या. मानवी जीवन दिवसेंदिवस अधिक सुसह्य बनण्यापेक्षा ते असह्य बनत चालले आहे. राजकारण, शिक्षण, समाज, संस्कृती, अर्थ, व्यापार, विज्ञान-तंत्रज्ञान आदी क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. होणारे बदल माणसाच्या भल्यासाठी, हितासाठी कसे उपयुक्त ठरतील याचा विचार सर्वांना करण्याची सुबुद्धी नववर्षी लाभो!
नवी उमेद, नव्या आशा-आकांक्षा घेऊन येणार्‍या या २०१७ नववर्षाचं स्वागत नाविन्याची कास धरत आपण करूया. सार्‍यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होवोत, माणसांच्या कर्तृत्वाने सर्व दिशा झळकून जावोत, मनाच्या अंतरंगात नवी पालवी फुटून माणसाचे जीवन बहरून येवो. निर्भेळ आनंद नि आशावादाची प्रेरणा मूर्त रूपात येऊ दे! माणसाच्या अंतरीचा ज्ञानदिवा तेजोमय होऊ दे! प्रज्ञानाच्या अभ्यंग स्नानाने अमंगल, वाईट, दुष्ट, दुराचार असे सारे अप्रिय दूर होऊन २०१७ हे वर्ष सोन्याचे दिवस घेऊन उजाडू दे! हीच नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने अपेक्षा नि सदिच्छा!!