सरकार पाडण्याचे धाडस कोणातही नाही ः मुख्यमंत्री

0
125

भ्रष्टाचार म्हणजे काय आणि भ्रष्टाचार कुणी केला आहे, हे २३ तारखेनंतर दाखवून दिले जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या पणजी मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काल केले. भाजप आघाडी सरकार तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. विरोधकांच्या अपप्रचारावर कुणी विश्वास ठेवू नये. कुणाकडेही भाजप आघाडी सरकार पाडण्याचे धाडस नाही, असा दावा डॉ. सावंत यांनी केला.

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर याचा विजय निश्‍चित असून विरोधक सैरभैर झाल्याने बिनबुडाचे आरोप करू लागले आहेत. भ्रष्टाचार करणार्‍यांना केवळ भ्रष्टाचार दिसतो, असा टोमणा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना मारला.

स्मार्ट सिटीचे काम
३ वर्षांनंतर दिसणार
पणजी स्मार्ट सिटीचे काम आत्ता दिसणार नाही. स्मार्ट सिटीचे काम सुरू असून तीन वर्षांनंतर स्मार्ट सिटीचे काम दिसून येणार आहे. स्मार्ट सिटीच्या प्रश्‍नावर विरोधकांकडून चुकीचा माहिती दिली जात आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.

मतदारांनी निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची पडताळणी करावी. भाजपने स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिलेला आहे. पणजी मतदारसंघातील काही विकासकामे प्रलंबित आहेत. ही प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजपला संधी द्यावी. भाजप सरकार मनुष्याच्या विकासाला प्राधान्य देणार आहे. आगामी तीन वर्षात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून चाळीस ते पन्नास हजार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पणजी मतदारसंघात निवडणूक अधिकार्‍यावर हल्ल्याचा प्रयत्न निंदनीय आहे. ही दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
भाजपचे उमेदवार कुंकळ्येकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री मावीन गुदिन्हो, मंत्री मिलिंद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर व इतरांची उपस्थिती होती.