सरकारी इस्पितळांतील कोविड विभागात प्राणवायूची कमतरता

0
134

>> गोमेकॉच्या डीनना निवासी डॉक्टरांचे निवेदन

निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सरकारी इस्पितळात कोविड विभागात काम करणार्‍या निवासी डॉक्टरांना भेडसावणार्‍या समस्यांचे एक निवेदन गोमेकॉच्या डीनना सादर केल्याने खळबळ उडाली आहे. सरकारी इस्पितळातील कोविड विभागात पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी निवासी डॉक्टरांच्या संघटनेची तातडीची बैठक घेऊन समस्यांवर प्राधान्यक्रमाने तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.
कोविड विभागात काम करणार्‍या डॉक्टरांना प्राणवायू पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मध्यरात्रीच्या वेळी प्राणवायूचा संपलेला सिलिंडर बदलण्यासाठी २ ते ३ तासांचा अवधी लागलो. गोमेकॉबरोबरच दक्षिण गोवा इस्पितळातसुद्धा याच परिस्थिला तोंड द्यावे लागत आहे. तथापि, वरिष्ठांकडून इस्पितळात खाटा, प्राणवायूची कमतरता नसल्याची माहिती वृत्तपत्रांना दिली जाते. त्यामुळे इस्पितळात येणारे रुग्णांचे नातेवाईक इस्पितळातील कोविड विभागातील डॉक्टरांना आपल्या रुग्णाला स्ट्रेचर, व्हिलचेअर, जमिनीवर का ठेवला, असा प्रश्‍न विचारून भंडावून सोडतात. निवासी डॉक्टराला रुग्णांच्या नातेवाइकांची बोलणी सहन करावी लागते. विभागात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असल्याने सर्वांवर नियंत्रण ठेवणे एका डॉक्टराला शक्य होत नाही. नवीन डॉक्टरांची नियुकी न करता नवीन इस्पितळ सुरू करण्याची घोषणा केली जात आहे. इस्पितळातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या बिकट काळातसुध्दा गोमेकॉमध्ये व्हीआयपी कल्चर कायम आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन आरोग्य यंत्रणा तणावाखाली आलेली असताना व्हीआयपी रूग्णांना प्राधान्यक्रम देण्याची सूचना केली जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

तोडग्याचे प्रयत्न ः राणे
सरकारकडून सरकारी इस्पितळातील डॉक्टरांची कमतरता आणि प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून तातडीने उपाय योजना हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

कंपन्यांना प्राणवायू पुरवठ्याची सूचना ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात सरकारी इस्पितळांना प्राणवायूच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने सरकारी इस्पितळांना प्राणवायूचा पुरवठा करणार्‍या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारी इस्पितळांना सुरळीत प्राणवायूचा पुरवठा करण्याची सूचना काल संबंधितांना केली.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मडगाव येथील ईएसआय इस्पितळाला भेट देऊन तेथील प्राणवायूचा पुरवठा व गरजेबाबत माहिती जाणून घेतली. इस्पितळातील डॉक्टरांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.