समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचे निधन

0
7

>> ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

समाजवादी पक्षाचे संस्थापक तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे काल निधन झाले. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. काल सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ आणि ‘धरतीपुत्र’ या नावाने प्रसिद्ध होते. मुलायमसिंग यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायमसिंग यादव यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते जीवनरक्षक औषधांवर होते. अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांच्या मोठ्या पथकाद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात होते. त्यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली होती. त्यानंतर काल सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलायमसिंग यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ती देवी आणि सुघर सिंह यांच्या शेतकरी कुटुंबात झाला.

मुलायमसिंग यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक होते. ४ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. गेल्या काही वर्षांत देशात जेव्हा जेव्हा तिसर्‍या आघाडीची चर्चा झाली, तेव्हा मुलायमसिंग यादव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते.

तीनवेळा भूषवले मुख्यमंत्रिपद
१९९२ मध्ये मुलायमसिंग यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ ते २४ जानेवारी १९९१, ५ डिसेंबर १९९३ ते ३ जून १९९६ आणि २९ ऑगस्ट २००३ ते ११ मे २००७ या कालावधीत ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. याशिवाय केंद्र सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्रीपदही भूषवले.

मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेशच्या आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आणीबाणीच्या कालावधीमध्ये ते लोकशाहीसाठी लढणारे महत्त्वाच्या नेतृत्वांपैकी एक होते. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी सक्षम भारत घडवण्यासाठी काम केले.

  • नरेंद्र मोदी, पंतप्रधान.