समविचारी पक्षांसोबत युतीस कॉंग्रेस तयार

0
38

>> गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याकडून स्पष्ट

>> आवेर्तान फुर्तादो यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

कॉंग्रेस पक्ष येत्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत युती करण्यास तयार असल्याचे काल कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पक्षातून फुटून भाजपमध्ये गेलेल्या १० आमदारांसाठी पक्षाची दारे कायमची बंद करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

समविचारी पक्षांबरोबर युती करण्यासंबंधी आपले मौन काल राव यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सोडले. विरोधी पक्षांशी युतीबाबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. यंदाच्या निवडणुकीत आम्ही विश्‍वासार्ह व जनतेशी बांधीलकी असलेल्या नेत्यांनाच उमेदवारी देणार असल्याचे यावेळी राव यांनी स्पष्ट केले.
पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठीच्या नेत्याची निवड अद्याप केली नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाने ज्या चुका केल्या होत्या तशा चुका पक्ष यंदाच्या निवडणुकीत करणार नसल्याचेही राव यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुरेंद्र फुर्तादोंची भेट
लुईझिन फालेरो यांनी पक्षाला रामराम ठोकल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल राव यांनी पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. फुर्तादो यांनी हल्लीच पक्षातील काही नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर फुर्तादो हे फालेरो यांच्यापाठोपाठ पक्ष सोडतील अशा भीतीने काल राव यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
राव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फुर्तादो यांनी आपण कॉंग्रेसशी एकनिष्ठ असून कॉंग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

आवेर्तान फुर्तादो यांचा
कॉंग्रेसमध्ये प्रवेश

नावेलीचे माजी आमदार व माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी काल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांच्या हजेरीत काल कॉंग्रेस हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आवेर्तान फुर्तादो यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे म्हणाले की फालेरो यांनी कॉंग्रेसचा त्याग केल्याने नावेली मतदारसंघ मुक्त झाला असून आता कॉंग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छिणार्‍या नव्या पिढीतील युवक-युवतींना कॉंग्रेसची दारे खुली झाली आहेत. याच पार्श्‍वभूमीवर नावेलीचे माजी आमदार व माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे ते म्हणाले. खरे म्हणजे फुर्तादो हे बर्‍याचपूर्वी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक होते. मात्र, फालेरो यांच्यामुळे पक्षात प्रवेश करण्यास ते मागे-पुढे करीत होते. आणि त्यातच कित्येक वर्षे निघून गेले. आता फालेरो यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केल्याने फुर्तादो यांचा कॉंग्रेस पक्ष प्रवेश सुकर झाल्याचे ते म्हणाले.
श्री. कामत यांनी, आवेर्तान फुर्तादो हे पक्षात प्रवेश करीत आहेत ही पक्षासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍या नेत्यांची संख्या वाढू लागली असून पक्षासाठी हा शुभ शकून असल्याचे मत व्यक्त केले.

श्री. राव यांनी, आवेर्तान फुर्तादो यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्यास पक्ष बळकट होण्यास त्याची मदत होणार आहे. फुर्तादो यांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आपले कुटुंब हे सदैव कॉंग्रेस पक्षाच्या पाठिशी राहिल्याने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काल बोलताना आवेर्तान फुर्तादो यांनी सांगितले.

लुईझिन फालेरो आज तृणमूलमध्ये
प्रवेश करण्याची शक्यता

>> कार्यकर्त्यांसह कोलकाता येथे दाखल

कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते लुईझिन फोलेरो आज दुपारी कोलकाता येथे जाण्यास दाबोळी विमानतळावरून रवाना झाले. आज बुधवारी होणार्‍या समारंभात ते रीतसर तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

मगोचे माजी आमदार लवू मामलेदार हेही तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास रवाना झाले. तसेच कॉंग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व भाजपचे ग्रामीण विकासमंत्री दिल्लीला गेले. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे.

तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाचे नेतृत्व करणार का? असे विचारले असता फालेरो यांनी, मी अजून काहीच ठरविलेले नाही. माझा लढा भाजपविरोधी असल्याचे स्पष्ट केले.
आणखी काही गोव्यातील नेते तृणमूल कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत का असे विचारले असता ते म्हणाले, त्याबाबत मला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

लुईझिन फालेरो यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षाचे माजी सरचिटणीस डॉ. यतीश नाईक, विजय पै, आनंद नाईक, मारिया पिंटो आदी नेते तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी आमदार लवू मामलेदार हेसुद्धा तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर मडकईमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून तेही काल कोलकात्यात दाखल झाले.