समर्थ रामदास आणि आपलं जीवन

0
822

– प्रा. रमेश सप्रे

दासबोधात समर्थांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केलाय. आजचा काळ त्यावेळच्या मानानं खूप खूप बदललेला असला तरी समर्थांचं मार्गदर्शन आजही कालसंगत वाटतं. ‘स्वगुणपरीक्षा’ नावाचे चार समास त्यांनी लिहिले आहेत. त्यात जन्मपूर्व गर्भवासापासून जीवनातील सर्व अवस्थांचं प्रत्ययकारी वर्णन आहे. त्यावेळेसारखी परिस्थिती समाजात जरी बदललेली वाटली तरी कुटुंब – त्यातील व्यक्ती व त्यांची मनोवृत्ती यात विशेष बदल झाला नाही

एक प्रसंग कल्पनेनं डोळ्यासमोर उभा करुया. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा. एक धष्टपुष्ट रामदासी एका घरासमोर उभा राहून भिक्षा मागतोय, त्याचं ते पिळदार शरीर नि काखेतली झोळी पाहून घरातल्या माणसांना थोडासा रागही आलाय. काहीतरी जीवनोपयोगी काम करायचं सोडून हा भिक्षा काय मागतोय?- असा विचारही त्यांच्या मनात आला. रामदासी व्यक्तीनं श्‍लोक म्हणायला आरंभ केला –
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे |
ही पहिलीच ओळ ऐकून हा काय अशुभ, अभद्र म्हणतोय असं वाटून घराचं दार बंद करत असतानाच दुसरी ओळ कानावर पडली –
अकस्मात तोहि पुढे जात आहे |
दार उघडून घरातली व्यक्ती विचारतेय – ‘काय म्हणालात? पुन्हा म्हणा ना!’ आणि मग चमत्कारच झाला. भरपूर भिक्षा तर मिळालीच. पण काहीतरी नवं अन् अत्यंत जीवनाभिमुख म्हणजे जीवनाला प्रत्यक्ष भिडणारं, मनात घुसून चिंतन करायला भाग पाडणारं ऐकल्याचा अनुभव लोकांना येऊ लागला. घरोघरी दारोदारी हेच घडू लागलं. ही किमया होती समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्‍लोक’ या रचनेची.‘समर्थ रामदास स्वामी’ म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांच्या जीवनाचं हेच रहस्य होतं. रामाचे दास म्हणजे सेवक आणि भक्त बनल्यामुळे एका बाजूनं ‘समर्थ’ नि दुसर्‍या बाजूनं ‘स्वामी’ झाले. माघ वद्य नवमीला दासनवमी म्हणतात जशी ‘श्रीरामाच्या जन्मदिनाला (जयंतीला) म्हणतात रामनवमी. आपलं उपास्य नि आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांच्याशी पूर्णपणे एकरूप झाले होते समर्थ.
या देव अन् भक्तांचा जन्म एकाच तिथीला नि एकाच वेळी. चैत्र शुद्ध नवमी दुपारी बारा वाजता. सूर्य ज्यावेळी मध्यावर किंवा माथ्यावर येतो त्यावेळी जसा सूर्यवंशाचा सूर्य राम जन्मला तसाच सूर्याजीपंत नि त्यांची तेजस्वी पत्नी ‘राणूबाई’ यांच्या पोटी नारायण जन्मला जो लवकरच जगासमोर ‘रामदास’ म्हणून प्रकट होणार होता.समर्थांचं जीवन तपाच्या मापानं मोजता येतं. म्हणून ते खरे तपस्वी होते. पहिलं तप म्हणजे जीवनाची पहिली बारा वर्षं ते घरी होते. नंतर ती क्रांतिकारक घटना त्यांच्या नि पुढे समाजाच्या दृष्टीनं घडली. वृद्ध आईच्या आग्रहास्तव बोहल्यावर विवाहासाठी उभा असलेला नारायण बोहल्यावरून पळून गेला. पण हे पलायन हा जीवनातील जबाबदारीपासून, कर्तव्यांपासून दूर पळणारा पलायनवाद नव्हता, तर स्वतःचा स्वार्थी, संकुचित संसार स्थापण्यापेक्षा विशाल समाजाचा – राष्ट्राचा – प्रपंच चालवण्यासाठी केलेला प्रयत्न होता.
भटजी ‘सावधान’ प्रत्येक विवाहप्रसंगी म्हणतात. ‘शुभ मुहूर्त सावधाऽन’ तसंच ‘शुभ मंगल सावधाऽऽन’ हे उच्च स्वरात म्हटलेले महत्त्वाचे शब्द आपण सावधपणे ऐकतो का? की आपण या महत्त्वाच्या क्षणी जास्त बेसावध असतो?कवी मोरोपंतांची या संदर्भातली आर्या फार गोड आहे.
द्विज ‘सावधान’ ऐसे सर्वत्र विवाहमंगली म्हणती |ते एक रामदासे आइकिले (ऐकले) त्या सदा असो प्रणती (प्रणाम) ॥
विवाहसमारंभातून पळालेला अवघ्या बारा वर्षांचा नारायण मजल दरमजल करत नाशिकच्या रामासमोर येऊन उभा ठाकला. अंगावर फक्त कौपीन म्हणजे लंगोटी. त्याही वयात मोठ्या विचारी व्यक्तीसारखा तो रामाला म्हणतो कसा – ‘रामा, मी फक्त माझं प्राक्तन (प्रारब्ध) घेऊन तुझ्याकडे आलोय. आता माझं (माझ्या जीवनाचं) काय करायचं ते तूच ठरव.’ ही नारायणाची (रामदासांची) अंतःप्रेरणा होती जिला श्रीरामाचे आशीर्वाद मिळणार होते.
नंतरचं तप (सन १६२० ते १६३२) समर्थांनी नाशिकजवळील टाकळी येथे गोदावरी नि गौतमी या नद्यांच्या संगमस्थळी तेज-ज्ञान-सामर्थ्य मिळवण्यासाठी साधना केली. लोकांच्या लक्षात समर्थांचं सामर्थ्य येऊन त्यांनी जयजयकार सुरू करण्यापूर्वी समर्थ ते स्थान सोडून निघाले तीर्थाटनाला. सारा देश त्यांनी पायाखाली घातला. बारा वर्षं समर्थ नुसते भ्रमण करत होते. सर्वत्र यावनी सत्तेचा सुलतानी अंमल असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांचे हे जळजळीत उद्गार त्याकाळच्या परिस्थितीचं वर्णन करतात – ‘पदार्थ तितुका अवघा नेला (लुटला) | नुसता देशचि उरला |’शेवटी हिमालयात पोहोचेपर्यंत ते खूप उदास-निराश-हताश झाले होते. इतके की तेथील गौरीकुंडात आत्मसमर्पण करण्याची त्यांनी तयारी केली. उडी मारणार इतक्यात त्यांना आसमंतातून तसंच अंतःकरणातून स्पष्ट शब्द ऐकू आले-
‘तुमची तनू ती आमुची तनू पाहे |देशकार्यार्थ तुम्हांसि जगणे आहे |दक्षिणेकडे जाणे आहे ॥
– अंतर्यामीच्या रामानं जो समर्थांचा सद्गुरुही होता दिलेला हा आदेशच होता ज्याच्यानुसार समर्थांचं उरलेलं आयुष्य जाणार होतं. जीवनाची तीन तपं पूर्ण झाल्यावर समर्थांचं जीवनकार्य सुरू झालं ते तीन तपं चाललं. जीवनाच्या अखेरपर्यंत! या काळात समर्थांनी मुख्य कार्य केलं ते समाज जागरण, समाज संघटन नि समाज प्रबोधन हेच. यासाठी त्यांनी आपली वाणी – लेखणी उदंड वापरली- ग्रंथराज दासबोध, मनोबोध (मनाचे श्‍लोक) आणि आत्माराम हे त्यांच्या विपुल वाङ्‌मयसागरातील दीपस्तंभ. इतर संतमंडळींपेक्षा समर्थांची काही वैशिष्ट्य आहेत. समाज हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता त्याचप्रमाणे व्यक्ती आणि कुटुंब यांचं कल्याण याविषयीही अतिशय उपयुक्त मार्गदर्शन समर्थ प्रत्यक्षपणे करतात.समर्थ रामदासांचा प्रमुख प्रयत्न प्रपंच आणि परमार्थ यांचा संगम घडवण्याकडे होता. यासंबंधी त्यांनी ठिकठिकाणी मार्गदर्शक सूत्रं सांगितलीयत.
प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थविवेका |
नुसता नेटानं संसार करणं हे मानवाचं जीवनध्येय असावं हे समर्थांना मान्य नाही. संसार करता करता संसाराच्या कटकटीत गुरफटून न जाता संसारातील कर्तव्यकर्मं करताना त्यात फळीची आसक्ती, अपेक्षा न ठेवता त्यातून सुटायचं कसं, अलिप्त (डिटॅच्ड) कसं राहायचं यावर त्यांच्या शिकवणीचा भर आहे.यासाठी त्यांचा सर्वाधिक भर विवेकावर – विवेकशक्तीवर आहे. म्हणूनच ते सांगतात की संसार कराच पण नंतर शांतपणे परमार्थाचा म्हणजे आत्मकल्याणाचा प्रयत्न करा. असा विवेक कराल तर संसार फिका होत जाईल. याचा अर्थ तो निस्तेज-निरस होईल असा नाही. तर त्याचं अतिरेकी आकर्षण लोपून मुक्तीचा आनंद उपभोगता येईल.आणखी एक एसाच संदेश आहे – प्रपंची असावे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण |
सुवर्ण म्हणजे सोनं म्हणजेच पैसा, अन्य साधनं यांची उपयुक्तता आपल्याला पदोपदी जाणवते. पण केवळ पिंडपोषण करणं म्हणजे शरीराचे भोग-उपभोग पुरवणं हेच आपलं उद्दिष्ट नसावं. याबरोबरच परमार्थाविषयी तत्त्वचिंतन, प्रपंचाच्या मागचं तत्त्वज्ञान याचा अतिशय सोप्या पद्धतीनं आणि सोप्या शब्दात विचार करणार्‍या संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हल्ली नाहीतरी वयाच्या चाळीशी-पन्नाशीनंतर डॉक्टरच रुग्णांना काहीतरी आध्यात्मिक उपासना, वाचन करण्याचा सल्ला देतात. समर्थ यालाच म्हणतात ‘परमार्थी पंचीकरण’.* ‘कुटुंबकल्याण’ हा शब्द पूर्वी परिवार नियोजनासाठी (फॅमिली प्लॅनिंग) मुख्यतः वापरला जायचा. कल्याण शब्दाचा अर्थ मोठा व्यापक आहे. समर्थ ही वस्तुस्थिती फार परिणामकारक रीतीनं वर्णन करतात –
लेकुरें उदंड जालीं | तों ते लक्ष्मी निघोन गेली |बापडीं भिकेसी लागली | कांहीं खावया मिळेना ॥
दासबोधात समर्थांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केलाय. आजचा काळ त्यावेळच्या मानानं खूप खूप बदललेला असला तरी समर्थांचं मार्गदर्शन आजही कालसंगत वाटतं. ‘स्वगुणपरीक्षा’ नावाचे चार समास (अध्याय) त्यांनी लिहिले आहेत. त्यात जन्मपूर्व गर्भवासापासून जीवनातील सर्व अवस्थांचं प्रत्ययकारी वर्णन आहे. त्यावेळेसारखी परिस्थिती समाजात जरी बदललेली वाटली तरी कुटुंब- त्यातील व्यक्ती व त्यांची मनोवृत्ती यात विशेष बदल झाला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र एकूण कुटुंबसंस्थाच धोक्यात आल्यासारखी वाटतेय.
जन्म दुःखाचा अंकुर | जन्म शोकाचा सागर |जन्म भयाचा डोंगर | चळेना ऐसा ॥
समर्थांना जन्म म्हणजे जीवन असं म्हणायचंय. आजही परिस्थिती ‘भय इथले संपत नाही |’ अशीच नाही का? मनावरचा वाढत जाणारा ताण, जीवघेणी स्पर्धा, भ्रष्टाचाराचा नंगानाच, आतंक-हिंसाचार-अपराध नि अपघात यांची एकूणच वावटळीसारखी वाढत वाढत वर चढणारी पातळी हे सारं म्हटलं तर भयानकच आहे.समर्थ यावर उपायही सुचवतात- प्रथम नरदेहाचं स्तवन (स्तुती) करतात.
धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |जो जो कीजे परमार्थ लाहो | तो तो पावे सिद्धीतें ॥
हे सांगितल्यावर ते महत्त्वाची गोष्ट सांगतात की हा देह काही माणसाला फक्त स्वतःसाठी सुखांचा उपभोग घेण्यासाठी मिळालेला नाही. ज्याप्रमाणे घर हे आत राहणार्‍या मुंग्या, पाली, झुरळं, वाळवी इ. सार्‍या कीटकांचं असतं. निसर्गातील पाणी-अग्नी-वारा अशा शक्तींचीही मालकी पृथ्वीवरील घरांवर असते. तसाच आपला देहही जंतू कृमी यांनी पोखरलेला असतो. त्यांचाही आपल्या देहावर अधिकार असतो. राजा (सरकार), चोर, मित्र, अतिथी आदींचाही आपल्या घरात वाटा असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. देह इतरांच्या सेवेसाठी, समाजकारणासाठी वापरला पाहिजे. पण याऐवजी आपण देहाला फक्त आपल्या मालकीचा समजतो.
समस्त म्हणती घर माझे | हें मूर्खही म्हणे माझें माझें |
‘हे मूर्ख’ म्हणजे प्रत्येकजण म्हणजेच आपण सारेजण. म्हणून समर्थांनी मूर्खांची लक्षणं सांगणारा अख्खा समासच लिहिला-
जन्मला जयांचें उदरीं | तयांसी जो विरोध करी |सखी मानिली अंतुरी | तो येक मूर्ख ॥
म्हणजे पत्नी घरात आल्यावर तिला जवळची (अंतुरी) मानून जन्मदात्या आईवडलांना जो विरोध, प्रसंगी घरातून बाहेरही काढतो तो एक मूर्ख समजावा. एवढंच नव्हे तर योग्य काय हे कळत असूनही त्याच्याविरुद्ध अयोग्य असं जो वागतो त्याला समर्थ ‘पढतमूर्ख’ म्हणतात.आता ऐका, शहाणे | असोनि मूर्ख | तया नाव पढतमूर्ख | – असं म्हणून अशा शहाण्या मूर्खांची लक्षणंही सांगतात. शेवटी म्हणतात-
लक्षणे अपार असती | परी काहीयेक यथामती |त्यागार्थ बोलिले श्रोतीं | क्षमा केले पाहिजे ॥
अशाप्रकारे समर्थांचं सारं सांगणं हे आपलं कुटुंबजीवन, समाजजीवन धन्य संपन्न कसं बनवता येईल यासाठीच असायचं. जन्मगाव मराठवाड्यातील जांब, साधना क्षेत्र नाशिकजवळचं टाकळी, कार्यक्षेत्र चाफळ, दासबोधाचं जन्मस्थळ महाडजवळची शिवथर घळ अन् अखेरचं वास्तव्यस्थान सज्जनगड ही समर्थचरित्रातली पवित्र पंचस्थळी आहे.शेवटचा रामनवमी उत्सव (सन १६८१) साजरा करण्यासाठी समर्थ चाफळला गेले होते. हजारों भक्तभाविक जमले होते. उत्सावनंतर पंधरा दिवसांनी चैत्र वद्य नवमी या दिवशी समर्थ चाफळ येथील श्रीरामाच्या अखेरच्या दर्शनाला गेले. जड अंतःकरणानं प्रभू रामचंद्रांचा निरोप घेतला. बाहेर येऊन जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणाले-
माघ वद्य नवमी | जाणे आहे परंधामी |केला निश्चय अंतर्यामी | ऐसा असे ॥
आपल्या महानिर्वाणाची अचूक तिथी दहा महिने आधी सांगणारा असा संत विरळाच. अखेरचा दिवस जवळ येत चालल्यावर जवळचे शिष्य-शिष्या रडू लागलेले पाहून समर्थ आश्‍वासनपूर्वक म्हणाले – माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंतःकरणीं|परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ॥
पुढे असंही उद्गारले –
आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वतः सिद्ध |असता, न करावा खेद | भक्तजनी ॥
खरंच संतांचं वाङ्‌मय हे चिन्मय असतं. आनंदमय असतं. ब्रह्ममय असतं. हे वाङ्‌मय म्हणजे ग्रंथ नव्हेत. तर त्यांच्या ग्रंथात ग्रथित झालेलं (व्यक्त झालेलं) ज्ञान. ते जीवनात उतरवलं पाहिजे. जेव्हा या ग्रंथांना स्पर्श करू तेव्हा साक्षात् संतसद्गुरुंना आपण स्पर्श करत असतो. हे ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा आपली वाणी बनते दिव्य संतवाणी. म्हणूनच ते अगदी प्रेमानं, आत्मियतेनं आपल्याला सांगत असतात-
करूं नका खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |तेणें सायुज्यमुक्तीची वाट | गवसेल की ॥
…. अन् सायुज्यमुक्ती हीच खरी चिरंतन मुक्ती. त्यासाठी संतांचं वाङ्‌मय वाचून त्याचं मनन-चिंतन नि मुख्य म्हणजे जीवनात अनुसरण केलं पाहिजे. केलंच पाहिजे. हीच खरी समर्थ रामदासांना त्यांच्या पुण्यदिनी दिलेली कृतार्थ श्रद्धांजली असेल.॥ जय जय रघुवीर समर्थ ॥