समतोलाचा प्रयास

0
28

भारतीय जनता पक्षाच्या काल जाहीर झालेल्या उमेदवारी यादीमध्ये आयात आणि निष्ठावंत यांचा समतोल साधण्याची धडपड स्पष्ट दिसते. ही यादी जाहीर करताना कसकशा तडजोडी नेत्यांना कराव्या लागल्या आहेत त्याचेही लख्ख प्रतिबिंब त्यामध्ये पडले आहे. तीन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना सर्वसाधारण मतदारसंघांत आम्ही उमेदवारी दिली आहे, अकरा ओबीसींना तिकीट दिले आहे असे सांगत भाजप हा आज पूर्वीप्रमाणे शेटजी आणि भटजींचा पक्ष राहिलेला नाही असे ठसवण्याचा जोरदार प्रयासही यावेळी नेत्यांनी केला आहे.
या उमेदवारी यादीबाबत सर्वाधिक उत्सुकता होती ती भाजप आगामी विधानसभेत जोड्याने बसू इच्छिणार्‍या दांपत्यांना उमेदवारी देतो का त्याची. मायकल लोबोंच्या पत्नीला तिकीट देण्यास स्पष्ट नकार देऊन आणि बाबू कवळेकरांच्या पत्नीला तिकीट नाकारून भाजपने ताठ भूमिका स्वीकारली खरी, परंतु बाबूश मोन्सेर्रातबरोबरच विश्वजित राणेंपुढे मुकाट मान तुकवून आपली हतबलताच व्यक्त केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याला ‘ऑक्युपेशनल हझर्ड’ म्हणजे व्यावसायिक अडथळा संबोधले त्यातच ही केविलवाणी हतबलता दिसून आली.
उमेदवारी देताना सर्वांना समान न्याय लावण्यास पक्ष असमर्थ ठरला आहे. लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्या मिलिंद नाईक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, मात्र, नोकरभरतीत लाचखोरीचा आरोप असलेल्या दीपक पाऊसकरांना तिकीट नाकारले आहे. त्यांच्याजागी गणेश गावकरांना पुन्हा संधी दिली गेली आहे. एकीकडे रोहन खंवटे, जयेश साळगावकर, गोविंद गावडे, रवी नाईक, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, दाजी साळकर आदी आयात उमेदवारांना उमेदवारी बहाल करताना दुसरीकडे दयानंद मांद्रेकर, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर, दामू नाईक आदी निष्ठावंतांना राजकीय पुनर्वसनाची संधी पक्षाने दिली आहे. निष्ठेलाही पक्षात अजून स्थान आहे हे दाखवून देण्यासाठी हा ताळमेळ साधणे गरजेचेच होते. उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे तिकीट कापले गेले. उत्पलना डिचोलीतून उभे राहण्याची गळ पक्षाने घातली आहे, कारण राजेश पाटणेकरांनी यावेळी निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. उत्पल यांना खरोखर पित्याचा वारसा जपण्यासाठी राजकारणात यायचे असेल तर ते पित्याच्या मतदारसंघाऐवजी पक्षाला उमेदवारच सापडत नसलेली डिचोलीची जागा स्वीकारू शकत नाहीत. बाबू आजगावकरांनी मात्र पेडण्यातून हकालपट्टी झाली तरी मडगावची जागा निमूट स्वीकारली आहे.
बहुतेक ख्रिस्ती उमेदवारांनाही गेल्यावेळेप्रमाणेच यावेळीही यादीत स्थान दिले गेले आहे. मावीन, काब्राल सारख्या कार्यक्षम मंत्र्यांना फेरउमेदवारी देताना फिलीप नेरींची गच्छंती झाली आहे. जोशुआ, ग्लेन, जेनिफर, सिल्वेरा, क्लाफासियो यांना पक्षाने पुन्हा रिंगणात उतरवले आहे. अकार्यक्षम आमदारांना पुन्हा तिकीट नाही म्हणावे तर असे काही अकार्यक्षम आमदार पुन्हा रिंगणात दिसत आहेत. वेळ्ळीत सावियो रॉड्रिग्सच्या रूपाने नवा चेहरा यावेळी उतरवला गेला आहे. आम आदमी पक्षासारख्या पक्षाने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उतरवले असल्याने बाणावली, नावेली, नुवे, मडकई आदी जागांवर नवखे उमेदवार उभे करून केवळ सर्व जागा लढविण्याएवढे आपलेही बळ आहे असे भासवण्याची धडपड भाजपने केली आहे. काल ३४ जागांचे उमेदवार जाहीर झाले. अजून सहा जागा उरल्या आहेत. कळंगुटमधून मायकल लोबो आणि कुठ्ठाळीतून एलिना साल्ढाणा चालत्या झाल्याने त्या जागा रिकाम्या आहेत. डिचोलीत राजेश पाटणेकरांनी पाठ फिरवल्याने पक्षाला उमेदवारच मिळेनासा झाला आहे. सांताक्रुझ, कुंभारजुवे, कुडतरीच्याही मोकळ्या जागा भरायच्या आहेत.
उमेदवारी यादी जाहीर करताना फडणवीसांनी कॉंग्रेस आणि आपचा समाचार घेतला, परंतु मगोबाबत पक्षनेते जपून बोलताना दिसत आहेत. निवडणुकोत्तर घडामोडींत गरज भासली तर कोणाला जवळ करायचे त्याचे आडाखेही पक्षाने नक्कीच बांधले आहेत. तृणमूलपासून दुरावून मगो भाजपापाशी पुन्हा येईल या आशेत भाजप नेते अजूनही दिसत आहेत. पक्षाच्या निवडणूक प्रचाराची दिशा एव्हाना स्पष्ट झालेली आहे. स्थैर्य आणि विकास या दोनच मुद्दयांवर भाजपा भर देतो आहे. त्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या पाच पट साह्याकडे बोट दाखवतो आहे. राज्यातील साधनसुविधा विकासाला अधोरेखित करतो आहे. केवळ सत्तेसाठी केेलेल्या अनैतिक तडजोडी, घडविलेली आमदार आणि उमेदवारांची घाऊक पक्षांतरे, कोविडकाळातील गलथान कारभार याकडे जनतेने दुर्लक्ष करावे अशी पक्षाची अपेक्षा आहे.