सप्टेंबरपासून आयोगामार्फत नोकरभरती

0
1

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या वेबसाईटचे उद्घाटन

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त असून, 1 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत सप्टेंबर 2023 पासून भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या वेबसाईटचे उद्घाटन केल्यानंतर काल पत्रकारांशी बोलताना दिली.

गोवा लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी पदे वगळून इतर सर्व सरकारी पदे गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील. या आयोगाचे नियम अधिसूचित करण्यात आल्याने विविध सरकारी कार्यालयांना आवश्यक नोकरभरतीबाबत माहिती येत्या 1 ऑगस्टपर्यत द्यावी लागणार आहे. त्यानंतर आयोगाकडून नोकरभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आयआरबी पोलीस, पीडब्लूडी यासह यापूर्वी जाहिरात दिलेल्या पदांसाठीची भरती 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारकडून गोवा कर्मचारी निवड आयोगाचे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. आताच्या घडीला येत्या 60 दिवसांत खात्यांना रिक्त पदांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर दरवर्षी 31 जानेवारीपर्यंत रिक्त पदांची यादी देण्याची मुभा देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

येत्या 60 दिवसांत रिक्त पदांचा तपशील द्यावा लागणार
सर्व विभागांना सध्याच्या रिक्त पदांचा तपशील आणि नजीकच्या भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांचा तपशील पुढील 60 दिवसांत म्हणजे 31 जुलै 2023 पर्यंत कर्मचारी भरती आयोगाकडे देण्यास सांगितले आहे. गोवा शिपयार्ड, उच्च न्यायालय, गोवा विद्यापीठ आणि इतर संस्था देखील त्यांची आवश्यकता कर्मचारी भरती आयोगाकडे पाठवू शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आयोगाची वेबसाईट तीन भाषांमध्ये
आयोगाची सीील.सेर.र्सेीं.ळप वेबसाइट इंग्रजी, कोकणी आणि मराठी भाषेत तयार करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक आहे. आयोगामार्फत होणाऱ्या भरतीमुळे गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाणार असून कुणावरही अन्याय होणार नाही, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.

सप्टेंबरपासून भरतीसाठी परीक्षा
सप्टेंबरमध्ये छोट्या प्रमाणात, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरतीसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते. आयोगाकडून वर्षातून एकदा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आयोगाकडून संगणक आधारित परीक्षा घेतली जाऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.