सदानंद रेगे यांची ‘अक्षरवेल’

0
458
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

प्रा. सदानंद रेगे यांची ‘अक्षरवेल’ ही कविता त्यांच्या कवितेविषयीच्या धारणा व्यक्त करणारी आहे. कविता ही आत्मनिष्ठ मनाची अभिव्यक्ती. तिच्यातून कवीच बोलत असतो. ही कविता आत्मसंवादाची सीमारेषा ओलांडून जनसंवाद साधते.

प्रा. सदानंद रेगे हे कवी, कथाकार आणि अनुवादक म्हणून मराठी साहित्यविश्‍वात ओळखले जातात. त्यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी राजापूर येथे आजोळी झाला. १९४० मध्ये मुंबईतील छबिलदास हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. चित्रकलेच्या शिक्षणासाठी ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. पण खडतर परिस्थितीमुळे त्यांच्या या शिक्षणात खंड पडला. सुरुवातीला त्यांनी किरकोळ नोकर्‍या केल्या. पश्‍चिम रेल्वेमध्ये तेेेेे १८ वर्षे कार्यरत होते. मॅट्रिकनंतर १८ वर्षांनी त्यांनी बी.ए.ची आणि नंतर एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी २१ वर्षे इंग्रजीचे अध्यापन केले.

सदानंद रेगे यांनी आपल्या लेखनाची सुरुवात कवितेपासून केली. त्यांची पहिली कविता १९४८ मध्ये ‘अभिरूची’ या वाङ्‌मयीन नियतकालिकात प्रसिद्ध झाली. नवकवितेच्या परंपरेतील कवी म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा १९५० मध्ये ‘अक्षरवेल’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे ‘गंधर्व’ (१९६०), ‘देवापुढचा दिवा’ (१९६५), ‘ब्रॉंकुशीचा पक्षी’ (१९८०) आणि ‘वेड्या कविता’ (१९८०) हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. प्रा. सदानंद रेगे यांनी सातत्याने लक्षणीय स्वरूपाचे कथालेखन केले. त्यांत त्यांनी अनेक प्रयोग केले. विश्‍वसाहित्यातील उत्तमोत्तम नाटकांचा आणि कवितासंग्रहांचा अनुवाद केला. बालसाहित्यात त्यांनी लक्षणीय स्वरूपाची भर घातली. आपला अपुरा राहिलेला चित्रकलेचा छंद त्यांनी पुढेही जोपासला.

प्रा. सदानंद रेगे यांची ‘अक्षरवेल’ ही कविता त्यांच्या कवितेविषयीच्या धारणा व्यक्त करणारी आहे. कविता ही आत्मनिष्ठ मनाची अभिव्यक्ती. तिच्यातून कवीच बोलत असतो. ‘तुका म्हणे होय मनासी संवाद| आपुलाचि वाद आपणांसी’ या उक्तीप्रमाणे तिचे मूलप्रेरणास्थान असते हे खरे. पण ते तेवढ्यापुरते मर्यादित राहत नाही. आत्मसंवादाची सीमारेषा ओलांडून ती जनसंवाद साधते. इतरांच्या अनुभूतींचा समवाय तिच्यात असल्यामुळे ती त्यांनाही आपली वाटते. पण प्रत्येकाच्या अक्षरवेलीचा आत्मा निराळा असतोच. कारण आयुष्याचा मर्मबंध तिच्यातून कवीने जोपासलेला असतो. नेमकी हीच कोवळीक सदानंद रेगे यांच्या ‘अक्षरवेल’मध्ये आढळते.
ही अक्षरवेल निसर्गानुभूतीच्या साहचर्याने बहरत गेली आहे. कवी उदगारतो ः माझ्या अक्षरवेलीला नभाचा आधार आहे. तिच्या प्रत्येक फांदीवर गीतांचा झुबका डुलत आहे. काव्य आणि गीत एकात्म असतात. या स्वरलयीतून कवीचे स्पंदन प्रकट होते असे त्याला सुचवायचे आहे.

चांदण्याची नितांत रमणीयता आणि सागरलाटांचे नर्तन एकत्रित आले तर त्यावेळची भावावस्था अनोखी असते. काव्यनिर्मितीच्या वेळी कवी ही संपृक्तावस्था अनुभवत असतो. तिला शब्दरूप देताना कवी उद्गारतो ः
माझ्या अक्षरवेलींचे
मन चांदण्यावरती,
तिला लाटा सागराच्या
खुणावती… बोलावती
माझ्या अक्षरवेलीला पोपटपंखांची पाने आहेत. तिला चंद्र, सूर्य आणि अन्य आकाशगोलांची फळेफुले लगडलेली आहेत असे कवी म्हणतो. ‘पोपटपंखांची पाने’ या प्रतिमेतून त्याला या पोपटी लालस पालवीमधून कवितेचे उन्मेषशाली स्वरूप सुचवायचे आहे. चंद्र, सूर्य आणि आकाशगोलांच्या स्पर्शामुळे तिला अपार्थिवता प्राप्त झाली आहे असे त्याला वाटते.
माझ्या अक्षरवेलीला क्षितिजाच्या रेषेची नित्य भुलावण असते. इथेही पार्थिवता आणि अपार्थिवता यांची सीमारेषा कवीला अभिप्रेत आहे. तिच्या मनात रंगविभ्रमांची राधा गवळण झुरत असते असे तो म्हणतो.
माझ्या अक्षरवेलीला छंदांचे वेड आहे. तिला नाद, गंध, रूप, रस, स्पर्शादी संवेदनांचे वेड आहे. पागोळ्यांचे थेंब तिला हुरहुर लावतात.
माझ्या अक्षरवेलीला पक्षी उखाणा घालतात. निळ्या जलपृष्ठावर तरंगांचे गाणे लवत असते.

माझ्या अक्षरवेलीच्या सावळ्या छायेत स्वप्ने घिरट्या घालत असतात. तिच्या निळ्या किमयेमुळे मदनदेखील दिवाणा होतो.
माझ्या अक्षरवेलीच्या अग्निशिखांसाठी बुद्ध पद्मासनी बसतो. क्रूसावरून येऊन येशूदेखील तिला पाणी घालतो. बुद्ध आणि येशू यांच्या करुणेचा स्पर्श आपल्या अक्षरवेलीला झालेला आहे असे कविला या ठिकाणी सांगायचे आहे.
माझी अक्षरवेल ही अधांतरी निर्माण झालेली नाही. मराठी कवितेची दीर्घ परंपरा तिला आहे. तिच्या तळाशी अभंगाची नम्र वात तेवत आहे. मराठीला समृद्ध करणारी योगीराज ज्ञानदेवाची ओवी तिला फुलवीत आहे.
कवी शेवटी सांगतो ः
माझ्या अक्षरवेलीला शब्द पालवी बनून येतात. तिची झूल होऊन पालवितात. तिच्या कुशीत अबोलीचे फूल फुलते.