सत्तर वर्षांत काहीच झाले नाही असे कसे म्हणता?

0
147
  • प्रल्हाद भ. नायक (कुडचडे)

आपण दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याऐवजी, त्याविषयी बोलण्याऐवजी मोदी गेल्या ७० वर्षांत कॉंग्रेस पक्षाने देशाची कशी वाट लावली त्यावर बोलत राहिले. देशासमोर असलेले प्रश्‍न, बेकारी न सुटण्यास कॉंग्रेस पक्ष कसा जबाबदार व गेल्या ७० वर्षांत देशात काहीच घडलेले नाही हे ते सांगत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही शासन पद्धत स्वीकारली. लोकांनी, लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही, या संकल्पनेनुसार लोकशाही शासन व्यवस्था ही सर्वोत्तम शासन व्यवस्था आहे! ठराविक काळानंतर मुक्त वातावरणात गुप्त पद्धतीने मतदानाच्या माध्यमातून निवडणुका हा आपल्या लोकशाहीचा गाभा आहे! आपण आजपर्यंत लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेली अनेक सरकारे आणि पंतप्रधान बघितले.

पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्यापासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत अनेक नेते आम्ही पाहिले. प्रत्येक पंतप्रधानांची कार्यपद्धती वेगळी होती. सर्वांची आपसात तुलना होणे साहजिकच आहे. आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांमध्ये एकमेव महिला होत्या, श्रीमती इंदिरा गांधी, परंतु त्या सर्वाधिक प्रभावी होत्या हे विरोधक सुद्धा मान्य करतात. प्रत्येक पंतप्रधानाने आपापल्या परीने देशाच्या विकासास हातभार लावला आहे. एखाद्याच्या हातून काही चुका घडलेल्या असू शकतात. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदाची शपथ घेतल्यावर केलेल्या भाषणात आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व पंतप्रधानांचा ऋणनिर्देश केला होता.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीपूर्वीच्या प्रचारसभा अभूतपूर्व होत्या. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे सत्तेवर असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस युती सरकारच्या अतिशय भ्रष्ट, अकार्यक्षम, असंवेदनशील कारभाराला देशातील जनता कंटाळली होती. जनतेला बदल हवा होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे नाव निवडणूक प्रचारप्रमुख, पर्यायाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले गेले. पूर्वीपासूनच भाजपने नरेंद्र मोदी म्हणजे एक महान देशभक्त आहेत, अतिशय कार्यक्षम, बेडर, दूरदृष्टी लाभलेले स्वच्छ चारित्र्याचे विकास पुरुष आहेत असे चित्र उभे केले होते. गुजरातचा त्यांनी सर्वांगिण विकास केला आहे असे गुणगान गायले जायचे. माझ्या मते, पणजीचा विकसित भाग दाखवून गोवा असा आहे हे सांगणे जसे अयोग्य आहे, त्याचप्रमाणे काही विकसित शहरे दाखवून एखाद्या राज्याचे चित्र उभे करणेही अयोग्य आहे! जनतेला हवा असलेला बदल, कॉंग्रेस युती सरकारबद्दलची जनतेच्या मनातील चीड, प्रचारसभांतून नरेंद्र मोदींनी दिलेली मोठमोठी आश्‍वासने, जनतेला दाखवलेली मोठमोठी स्वप्ने यांचा परिणाम होऊन त्यांना मागील निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले.

माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजीव गांधींना सहानभूतीच्या लाटेचा फायदा मिळाला होता. त्यांना मिळालेल्या राक्षसी बहुमतानंतर नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले. बहुमत मिळवून सत्ता मिळाल्यानंतर मोदींनी सुरुवातीपासून आपण आणि आपले सरकार आजपर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांची सरकारे याहून वेगळे आहे हे भासविण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांमध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदीच वेगळे आहेत हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून आले. शपथविधीला शेजारील राष्ट्रप्रमुखांना बोलावून केलेला शपथविधीचा मोठा ‘इव्हेंट’ असो, संसदेच्या पायर्‍यांना माथा टेकवून संसदेत केलेला प्रवेश असो, पंतप्रधान म्हणून स्वतःजवळ एकाही खात्याचा ताबा न ठेवणे असो, महिन्यातील १९ दिवस बोलणे असो, एखाद्या पर्यटकासारखा विश्‍वसंचार करणे असो, परदेशातील भेटींचा मोठा इव्हेंट करणे असो, जाहिरातबाजीवर हजारो कोटी रुपये उधळणे असो, नेहरु – गांधी कुटुंबियांबद्दल आकसाने बोलणे असो, सदैव निवडणुकीच्या मूडमध्ये असणे अशा अनेक गोष्टी मोदी यांनी केल्या. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. मोदींच्या जन्मापूर्वी स्थापन झालेला आणि देशभर विस्तारलेला कॉंग्रेस पक्ष संपविण्याची घोषणा ही बालिशपणाची आहे हे सांगण्याचे धाडस भाजपमध्ये कुणापाशी नव्हते. मोदींनी निवडणूक प्रचारसभांमधून जनतेला ‘अच्छे दिन’ येतील, परदेशी बँकांतील भारतीयांचा काळा पैसा भारतात आणून प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करू, वार्षिक दोन कोटी नवीन नोकर्‍या निर्माण करू, शेतकर्‍यांच्या मालाला मूलभूत किंमत मिळवून देऊ, देशातील भ्रष्टाचार संपवू, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवू, काश्मीरमधील ३७० कलम रद्द करू अशी अनेक आश्‍वासने दिली होती. त्यांनी दिलेल्या त्या आश्‍वासनांमधील एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. आज त्यांचे प्रवक्ते मोदींनी तशी आश्‍वासने दिलीच नव्हती असे खोटे सांगतात. आपण दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याऐवजी, त्याविषयी बोलण्याऐवजी मोदी गेल्या ७० वर्षांत कॉंग्रेस पक्षाने देशाची कशी वाट लावली त्यावर बोलत राहिले. देशासमोर असलेले प्रश्‍न, बेकारी न सुटण्यास कॉंग्रेस पक्ष कसा जबाबदार व गेल्या ७० वर्षांत देशात काहीच घडलेले नाही हे ते सांगत आहेत. सत्तर वर्षांत काहीच घडले नाही असे म्हणताना त्यांना पाच वर्षे सत्तेवर असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीचे आणि काही वर्षे सत्तेवर असलेली मोरारजी देसाई, विश्‍वनाथ प्रतापसिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल आणि देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांची सरकारे सत्तेवर होती याचा विसर पडला.

एखाद्याने सत्तर वर्षांत देशात काहीच घडले नाही असे म्हणणे हे चुकीचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनंतर जन्मलेल्या नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्याच्या वेळी देशाची परिस्थिती कशी होती ही जरी बघितली नसली तरी एक सुजाण नागरिक म्हणून ते त्याची कल्पना करू शकतात. त्यावेळी देशासमोर निरक्षरता, दारिद्य्र, बेरोजगारी, शेजारील देशांबरोबरचे संबंध, लोकशाही विषयीची जनतेची अनभिज्ञता, लोकशाही टिकवण्याचे आव्हान असे अनेक प्रश्‍न होते. देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरुंनी कौशल्याने देशाचे नेतृत्व केले. त्यांनी देशाच्या विकासासाठी संमिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यांनी अलिप्ततावाद, पंचशील धोरणाचे प्रयोग केले. त्यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भरीव कार्य केले. पंचवार्षिक योजनांचे नियोजन करण्याचा निर्णय केला. संरक्षणाच्या दृष्टीने पाऊल टाकताना पं. नेहरुंनी अणुकेंद्र निर्मिती, पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, नियोजन आयोग, अणुसंशोधन केंद्र अशा कितीतरी संस्थांची बांधणी केली. त्यांनी शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय संस्था, आयआयटीसारख्या संस्थांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. शिक्षण, आरोग्याबरोबरच त्यांनी कला, संस्कृती, साहित्य क्षेत्र पुढे जावे संस्था उभारल्या. राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात काम करणार्‍या एनडीए, एनसीएल, डीआरडीओसारख्या संस्था स्थापन केल्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून पाकिस्तानला अद्दल घडविली होती. आजच्या राजकीय नेतृत्वाकडे पाकिस्तानचा एखादा गाव वेगळा करण्याची धमक आहे का? माजी पंतप्रधान राजीव गांधींनी संगणकांचे जाळे देशभर पसरवून देशाला आधुनिकतेकडे नेले. सत्तर वर्षांत काहीच प्रगती झाली नाही असे म्हणणे निव्वळ अज्ञान आहे नाही तर धूळफेक!