सण आला परीक्षेचा!

0
141

– दिलीप वसंत बेतकेकर

‘माझा अभ्यास’ मला कोणी सांगण्याची, आठवण करून देण्याची, टोचण्याची गरज नाही. तो ‘माझा’ आहे अशी ‘मानसिकता’ व्हायला हवी. तुम्ही दुसर्‍यासाठी, दुसरा कोणी सांगतो म्हणून अभ्यास करत असाल तर दिवसाचे अगदी अठरा तासही ‘तसा’ अभ्यास करून काहीही उपयोग नाही. मित्रांनो, हा केवळ उपदेश नाही; हे आहे वैज्ञानिक सत्य, भरपूर संशोधनावर आधारलेले!

आपल्या देशात वर्षभर आपण अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि धूमधडाक्याने साजरे करीत असतो. गणेशचतुर्थी, दिवाळीची किती आतुरतेने वाट पाहतो आपण! विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपण होळीच्या निमित्ताने रंग उधळत त्या रंगांनी न्हाऊन घेतले. अजूनही चेहर्‍यावर त्या रंगांच्या खुणा असतील… आणि आता लगेच एक सण-उत्सव येणार आहे, फार दिवस नाहीत त्याला!
ओळखला का तो सण-उत्सव? बुचकळ्यात पडलात ना? रामनवमी आणि हनुमान जयंती तर आहेच, पण आपल्याला आता तयार व्हायचं आहे आणखी एका सणाला. फार ताणली जातेय का आपली उत्कंठा?
मित्रांनो, या सणाची आपण वर्षभर भरपूर तयारी केलेलीच आहे.
तो सण आहे ‘परीक्षा’!
खरंच सांगतोय दोस्तांनो, परीक्षा हा येणारा सण आपल्याला अगदी झोकात साजरा करायचा आहे. हा सण कसा साजरा करायचा ते आपण पाहू.

१. उद्यापासून सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात बसूनच स्वतःशी थोडं बोलायचं. याला ‘स्वगत’ किंवा स्वयंसूचना (ऑटो सजेशन) म्हणतात. तर बोलायचं काय? प्रथम परमेश्‍वराचे मनापासून स्मरण करून आभार मानायचे. उपकार आठवायचे. त्याने दिलेल्या मनुष्य शरीराबद्दल आभार. बुद्धीचे वैभव दिल्याबद्दल कृतज्ञता. ‘मी येणार्‍या सणासाठी (परीक्षेसाठी) अगदी तयार आहे. आनंदाने वाट बघतोय त्या सणाची, त्या क्षणाची. वर्षभर मी भरपूर अभ्यास केला आहे, मेहनत केली आहे. आता मला छानपैकी प्रस्तुती करायचीय, आणि मी नक्कीच करू शकतो.’ आपले स्वगत सकारात्मक, प्रथम पुुरुषी, एकवचनी (म्हणजे मी, मला- असे) आणि वर्तमानकाळातलं हवं. मी आनंदात आहे, प्रसन्न आहे असं म्हणायला विसरू नका बरं!

२. अंथरुणातून बाहेर पडल्याबरोबर एक ग्लासभर गरम पाणी प्या. थोडं मध आणि लिंबू घालता आलं तर फारच छान. दिवसभर सात ते आठ ग्लास पाणी प्या (आता मध, लिंबूची गरज नाही). आपला मेंदू म्हणजे ७८ टक्के पाणीच, हे माहीत असेलच.

३. परीक्षा माझा शत्रू नाही. परीक्षा मला नाऊमेद करूच शकत नाही. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी परीक्षेपेक्षा आपल्याकडे अधिक सामर्थ्य, शक्ती, युक्ती, बुद्धी आहे हे विसरू नका.

४. ‘माझा अभ्यास झाला नाही, उत्तरं आठवत नाहीत, तयारी झाली नाही’ असं समजण्याची, भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. ही चिंता, काळजी अनाठायी आहे. कारण आपण तयारी केलेलीच आहे. आणि प्रश्‍नाचं उत्तर आता जरी आठवत नाही असं वाटत असलं तरी प्रत्यक्ष प्रश्‍नपत्रिका हातात आल्यावर, प्रश्‍न वाचल्यावर ते उत्तर मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात, कोपर्‍यात असतं ते उसळी मारून वर येतं आणि पेपरवर उतरतं. त्यामुळे ‘अभ्यास झाला नाही, उत्तर आठवत नाही’ हे पालूपद मनातून हद्दपार करा. आता आठवलं नाही तरी वेळ आली की आपोआप आठवेल यावर पक्का विश्‍वास ठेवा. शंभर टक्के खरं आहे हे!

५. आता उजळणी हवी परत परत. उजळणीसाठी इंग्रजी शब्द आहे- ‘रिव्हिजन.’ काय बरं या शब्दाचा अर्थ? त्यात दोन शब्द आहेत. ‘रि’ आणि ‘व्हिजन.’ ‘रि’ म्हणजे परत परत, ‘व्हिजन’ म्हणजे बघणं, दिसणं. परत परत फक्त वाचाच नाही, तर लिहा, आठवा, घरातल्यांना, मित्रांना सांगा.

६. अंथरुणात पडून, आडवे होऊन, झोपून अभ्यास नका करू. एका जागी पाऊणतास बसा. नंतर पंधरा मिनिटे वही-पुस्तक बंद करून घरात, अंगणात, बागेत फेरफटका मारत स्मरण, मनन, चिंतन करा. आकृत्या, चित्रं डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करा. वाचलेलं कुणाला तरी सांगा. वही-पुस्तक बंद ठेवून कोर्‍या कागदावर जे-जे आठवेल ते लिहा. क्रमबद्ध लिहिता आलं तर उत्तमच. तसं होत नसेल तर जे आठवतील ते शब्द, चित्रं, आकृत्या काढा आणि का, कोण, कसे असे प्रश्‍न विचारत ते एकमेकांशी ‘लिंक’ करण्याचा प्रयत्न करा. परत अभ्यासाला बसा, पाऊण किंवा एक तासानंतर छोटासा ‘ब्रेक’, ‘चर्वण’ करण्यासाठी.

७. प्रत्येक तासानंतर खालीलपैकी कोणती तरी एक गोष्ट आलटून-पालटून करा.
अ. उभं राहून शरीराला सर्व बाजूंनी ताण द्या.
ब. थंड पाणी ओंजळीत घेऊन चेहर्‍यावर चार-पाच वेळा फवारा मारून सावकाश चेहरा पुसा.

क. डोळे बंद ठेवून हातांचे तळवे एकमेकांवर घासा. उष्णता निर्माण होईल. तळव्यांची पोकळी करून दोन्ही डोळ्यांवर ठेवा. आपल्या हातांचा उष्ण स्पर्श होईल, त्याचा अनुभव घ्या. आणि चेहर्‍यावर हळुवार मसाज करून सावकाश किलकिले करून डोळे उघडा. दोन मिनिटांत तुम्ही एकदम फ्रेश!
ड. बागेमध्ये छोटासा ‘ब्रेक’ घेत फेरफटका मारा. बाग नसेल तर कोणत्याही झाडाकडे, वनस्पतीकडे, फुलांकडे निर्भेळ आनंद घेत काही क्षण बघा. हिरव्या हिरव्या झाडांच्या पानांमध्ये असते आपल्याला ‘फ्रेश’, ताजंतवानं करण्याची किमया. फक्त आनंदाने, प्रसन्न मनाने बघायला मात्र हवं.
इ. आवडणारं एखादं गाणं गुणगुणा, ऐका. संगीतामध्ये एकाग्रता वाढवण्याची विलक्षण ताकद असते. मेंदूमध्ये पोषक हालचाली सुरू होतात. अभ्यासाला पूरक रसायनं तयार होतात.
८. कंटाळत, सक्तीने अभ्यास करायला बसला तर (कितीही वेळ) अपेक्षित अभ्यास होणारच नाही. उलट आनंदाने, उत्साहाने, सकारात्मक दृष्टी ठेवून अभ्यासाला बसलात तर मेंदूमध्ये डोपामाईन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसीन यांसारख्या रसायनांचा स्राव सुरू होतो. आणि हा स्राव सुरू झाला की मेंदू ताजातवाना होऊन उत्तम प्रतिसाद देतो. मग अभ्यास कंटाळवाणा होत नाही, वाटत नाही.

९. सर्वात महत्त्वाची गोष्ट. स्वतःलाच एक प्रश्‍न विचारा. मी अभ्यास का करतो? पालकांच्या सक्तीमुळे, मार्क आणि नोकरीच्या आसक्तीमुळे की स्वतःसाठी, माझ्या आनंद व समाधानासाठी? ‘माझा अभ्यास’ मला कोणी सांगण्याची, आठवण करून देण्याची, टोचण्याची गरज नाही. तो ‘माझा’ आहे अशी ‘मानसिकता’ व्हायला हवी. तुम्ही दुसर्‍यासाठी, दुसरा कोणी सांगतो म्हणून अभ्यास करत असाल तर दिवसाचे अगदी अठरा तासही ‘तसा’ अभ्यास करून काहीही उपयोग नाही. मित्रांनो, हा केवळ उपदेश नाही; हे आहे वैज्ञानिक सत्य, भरपूर संशोधनावर आधारलेले!
आपण सर्वजण एक खेळ खेळला असाल… निदान बघितला तरी असाल. रस्सीखेच (टग ऑफ वॉर). दोरी दोन्ही बाजूचे खेळाडू ओढत असतात. हा केवळ मैदानावरचा सामान्य खेळ नाही मित्रांनो! हा खेळ आपल्या जीवनात हरघडी, पावलोपावली चाललेला असतो. आयुष्यभर रस्सीखेच सुरूच असते. एका बाजूला मनःस्थिती तर दुसर्‍या बाजूला परिस्थिती खेचत असते. जेव्हा मनःस्थिती सकारात्मक, विजयी आणि कृतज्ञतेने काठोकाठ भरलेली असते त्याचवेळी यश आपल्या गळ्यात माळ घालते.

मला अभ्यास का करायचाय? केवळ भरपूर गुण मिळवून, मोठ्या पगाराची नोकरी खेचून पोट भरण्यासाठीच का? हा एक छोटासा हेतू असू दे; पण त्याहीपेक्षा उदात्त, विशाल उद्दिष्ट असेल तर यशही भरघोस मिळतंच! मग हे उद्दिष्ट, हेतू काय?
परमेश्‍वराने विश्‍वासाने जे जे मला भरपूर आणि सुंदर दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करायची, त्याचे उपकार कसे आठवायचे, आभार कसे मानायचे? जे जे त्याने मला दिले आहे ते मुळीच वाया न घालवता (वेळ, बुद्धी, शक्ती इ.) त्याचा पुरेपूर उपयोग करून ते परत त्याच्याच चरणी वाहायचे असा विशुद्ध भाव असेल तर मिळालेल्या यशाचे सौंदर्य, मूल्य अद्भुत, अद्वितीय! ही दृष्टी ठेवून अभ्यास केला, परीक्षेला सामोरे गेलो तर परीक्षा ‘किस झाड की पत्ती’ बनेल.
दोन विद्यार्थी परीक्षेपूर्वी देवळात जाऊन प्रार्थना करत होते. पहिला म्हणत होता, ‘ईश्‍वरा, पेपर कितीही कठीण असू दे, मी तयारी केली आहे, मला त्याची भीती नाही. फक्त परीक्षेला सामोरे जाण्यासाठी माझ्या प्रयत्नांना तुझ्या प्रेरणेची जोड दे.’
दुसरा प्रार्थना करत होता, ‘देवा, पेपर एकदम सोपा येऊ दे. सुपरवायझर मवाळ, बावळट असू दे आणि पेपर तपासणारा दयाळू असू दे. बस, आणखी काही नको.’
मित्रांनो, तुमची प्रार्थना कशी असावी तुम्हीच ठरवा.

आचार्य विनोबाजी प्रार्थनेसंबंधी म्हणतात, ‘आपल्याकडे असलेली सर्व शक्ती वापरून देवाकडे मागणे म्हणजे प्रार्थना.’
प्रार्थना आपली परिस्थिती बदलत नाही, तर आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मनःस्थिती बदलते. देव आमच्यासाठी काम करत नसतो, तो आमच्याबरोबर काम करतो हे नीट लक्षात ठेवू.

कृष्णकन्हैयाचं एक चित्र डोळ्यांसमोर आणा. कालियामर्दनाचं. कालियाला जेरीस आणून, एका हातात त्याची शेपटी पकडून त्याच्या डोक्यावर पाय ठेवलेला विजयी आणि आनंदी मुद्रेतला तो कृष्ण आठवा. किती सुंदर, मनोहर, पराक्रमी… आता असंच एक चित्र डोळ्यांसमोर आणा. कृष्णाच्या जागी तुम्ही विजयी आणि आनंदी मुद्रेने परीक्षेच्या डोक्यावर पाय ठेवून उभे आहात. हातात प्रश्‍नपत्रिका आली की हे चित्र डोळ्यांसमोर आणा आणि पाडा फडशा पेपरचा. विजय आपलाच आहे. विजयी भव! यशस्वी भव! साजरा करा हा सण!
ढीू र्ूेीी लशीीं, ॠेव ुळश्रश्र वे ींहश ीशीीं!