सक्रिय कोरोना रुग्ण १० हजारांच्या खाली

0
52

>> राज्याला किंचित दिलासा; बळींसह नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

राज्यात जवळपास दीड महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या बळींच्या संख्येत घट झाली असून, गेल्या चोवीस तासांत १७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात १६९५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या खाली आली आहे. राज्यात सध्या ९ हजार ७०० एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, नवे ५७२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या एकूण बळींच्या संख्येने २७०० चा टप्पा ओलांडला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या दिलासा देणारी आहे. असे असले तरी कोविड स्वॅबची चाचणी ३ हजारांच्या आसपास केली जात आहे हे लक्षात घ्यावे लागेल. राज्यातील कोरोना बळींच्या संख्येवर अजूनपर्यंत नियंत्रण आलेले नाही. चोवीस तासांत इस्पितळांमधून ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार ८४७ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत १७ बळी
राज्यात मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळींचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी १७ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये १० रुग्णांचा, दक्षिण गोवा इस्पितळात २ रुग्णांचा, ईएसआय इस्पितळात १ रुग्णांचा, तर उत्तर गोव्यातील दोन खासगी इस्पितळात २ रुग्णांचा बळी गेला आहे. दक्षिण गोव्यातील दोन खासगी इस्पितळात २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाने बळी घेतलेल्या एका रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. दरम्यान, राज्यातील एकूण बळींची संख्या २७१० एवढी झाली आहे.

नव्या ५७२ रुग्णांची नोंद
राज्यात चोवीस तासांत नवे ५७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या ३३३१ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील १७.१७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील प्रमुख भागातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८०३ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४८४, तर चिंबलमधील रुग्णसंख्या ३८२ एवढी आहे. कांदोळी, फोंडा, पर्वरी, कासावली, कुठ्ठाळी या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. फोंडा येथे ७१५ रुग्ण, कांदोळी येथे ३७६ रुग्ण, कुठ्ठाळी येथे ३७८ रुग्ण, कासावली येथे ३३६ रुग्ण, वास्को येथे ३३० रुग्ण, पर्वरी येथे ३९५ रुग्ण, पेडणे येथे ३९६ रुग्ण, कुडचडे येथे ३८६ रुग्ण, खोर्ली येथे २६४ रुग्ण, म्हापसा येथे २७६ रुग्ण आहेत.

२४ तासांत ९० रुग्ण इस्पितळांत दाखल
गेल्या चोवीस तासांत नव्या ९० रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे. राज्यात इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येचेही प्रमाण बरेच कमी झाले आहे. आत्तापर्यंत २६ हजार ८२७ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागले.

१६९५ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल आणखी १६९५ रुग्ण काल बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार ४३७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१४ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ४८२ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.

पहिल्या दिवशी १,३८५ नागरिकांचे लसीकरण

१८-४४ दरम्यानच्या विशेष गटाचे लसीकरण सुरू

राज्यातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील स्तनदा माता, ५ वर्षांखालील मुलांचे पालक, दिव्यांग या विशेष गटातील नागरिकांच्या लसीकरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला असून, पहिल्या दिवशी १ हजार ३८५ जणांना लस देण्यात आली.
राज्यात दिवसभरात सुमारे ४ हजार ६६३ नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला. इस्पितळांतून २०३५, ११ पंचायत क्षेत्रातील लस महोत्सवातून १ हजार २४३ जणांना लसीचा डोस देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत ५ लाख ३० हजार ७७६ लसीचे डोस देण्यात आले आहेत, तर ९६ हजार ५०१ जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील अन्य आजारांनी ग्रस्त असलेले नागरिक, टॅक्सी, रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट आणि खलाशांना दि. ७ ते दि. १५ जून या कालावधीत लस दिली जाणार आहे.

५ वर्षांखालील मुलांच्या पालकांना लसीकरणात प्राधान्य
राज्यातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील विशेष गटांसाठी कालपासून लसीकरण सुरू झाले असून, त्यात दोन वर्षांखालील मुलांच्या पालकांना प्राधान्य दिले जात होते. आता ही मर्यादा वाढवली असून, ५ वर्षांखालील मुलांच्या पालकांना लसीकरणात प्राधान्य दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून होणार आहे.