संसदेचे आजपासून अधिवेशन

0
12

पहिल्याच दिवशी 280 खासदार घेणार शपथ

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज सोमवार 24 जूनपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून सर्वप्रथम शपथ घेणार आहेत.

अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कामकाज आज 24 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शहा आणि नितीन गडकरी शपथ घेणार आहेत. त्यानंतर मंत्री परिषदेचे इतर सदस्य खासदार म्हणून शपथ घेतील. बुधवार 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असून 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सातवेळा खासदार बनलेले भर्तृहरी महताब यांची संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे हंगामी अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) म्हणून नियुक्ती केल्यामुळे अधिवेशनादरम्यान लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये 58 लोकसभेचे सदस्य आहेत. केंद्रीय मंत्रिपरिषदेचे 13 सदस्य राज्यसभेचे खासदार आहेत आणि एक मंत्री, रवनीत सिंग बिट्टू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनंतर राज्यनिहाय खासदारांना शपथ दिली जाईल. संसदेच्या या अधिवेशनात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास असणार नाही.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी, लोकसभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक, ओडिशा येथील भाजप खासदार भर्त्रीहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. अध्यक्षांनी सुरेश कोडीकुन्नील, थलिकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांना अध्यक्ष निवडीपर्यंत प्रो टेम स्पीकरला मदत करण्यासाठी नियुक्त केले असल्याची माहिती दिली.

दरम्यान, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत भाजपला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे, तर उपसभापतीपद एनडीएच्या मित्रपक्षांपैकी एकाला दिले जाऊ शकते. इंडिया आघाडीने उपसभापती पदाची मागणी केली आहे, मात्र, 17 व्या लोकसभेत उपसभापती नव्हते.