संवाद

0
475
  •  सौ. माधवी भडंग

 

अंहकार, विभक्त कुटुंबपध्दती, पिढीचा मानसन्मान कमी, सर्वात महत्त्वाचं कारण टेक्नॉलॉजीचा अती वापर, त्यामुळे सहजता गेली, संवाद हरवला, नात्यात कृत्रिमता आली. जग जवळ आलं पण मनं दुरावलीत.

दोन महिन्यांपूर्वी शाळेत मुलांशी चर्चा करायला गेले असता लक्षात आलं की, मुलं संवादात कमी पडत आहेत. यापूर्वी याच विषयावर वाचलेली एक गोष्ट आठवली. गोष्टीचा आशय असा- मुलं आजी-आजोबांकडे आईवडिलांसह दोन दिवस राहायला जातात. आजी-आजोबा आनंदाने त्यांच्या स्वागताची तयारी करतात. मनात साठवलेलं नातवांशी आणि मुला-सुनेशी खूप बोलायचं ठरवतात. पण प्रत्यक्षात मात्र ‘हो’ ‘नाही’ या दोन शब्दांपलीकडे कुणीच काही बोलत नाही. लगेच स्वतःच्या खोलीत निघून जातात. याचा अर्थ संवादाचं प्रमाण हरवत चाललंय की काय?
मी एका आठ-दहा वर्षांच्या मुलाला विचारलं, ‘‘तू तुझ्या आई-बाबांशी रोज काय बोलतोस, काय सांगतोस?’’ त्यावर तो उत्तरला, ‘‘बाबांची शिफ्ट ड्युटी असल्यानं ते रोज भेटत नाहीत. आई फक्त अभ्यासाचं बोलते. इतर वेळी तिची कामं आणि फोनवर बोलणं चालू असतं. तिला माझ्याशी बोलायला वेळच नसतो. बाबा जेव्हा घरी असतात तेव्हा ते लॅपटॉप, टी.व्ही.मध्ये बिझी असतात. पण आम्हाला बाहेर घेऊन जातात.’’ लक्षात येतं, हल्ली संवादाचं प्रमाण कमी होत चाललंय. अनेकवेेळा आपण बघतो, आजूबाजूला बसलेल्या दोन व्यक्ती एकमेकांशी न बोलता मोबाईलवर चॅट करत असतात, एकमेकांची उडवत असतात.

साधारण ३५-४० वर्षांपूर्वी रोज संध्याकाळी लहान मुलं देवाजवळ बसून शुभंकरोती, पाढे म्हणत. आई-वडील आवर्जून शाळेचा हालहवाल विचारत. मुलंदेखील दिलखुलास सांगत. समजा पालकांना वेळ मिळत नसेल तर आजी-आजोबांशी मुलं शाळेच्या गोष्टी शेअर करत. अनेकवेळा मुलांना या शेअरिंगमधून तोडगा मिळत असे. जसं- अमोलला स्वतःची वस्तू त्याच्या मित्राला द्यायची नव्हती. त्यासाठी त्यानं मित्राशी अबोला धरला होता. आजोबांच्या ते लक्षात आलं. त्यांनी वस्तू वाटण्यात किती आनंद असतो, मनाचा मोठेपणा काय असतो हे नातवाला गोष्टीमार्फत पटवून दिलं. दोन मित्रांमध्ये समेट घडवून आणली. हे संवादामुळेच शक्य झालं ना! आजोबांनी दोघांचीही चूक दाखवली. योग्य काय ते समजावून सांगितले. कारण पूर्वी शेजारचं मूल हे आपलंच असतं अशी ठाम समजूत होती.

हल्ली ही समजूतच कमी झालेली दिसते. शेजार्‍यांशी संवादाचं प्रमाणच कमी झालं आहे. मध्यंतरी टी.व्ही.वर ‘मधली सुट्टी’ नावाचा डॉ. सलील कुलकर्णीचा कार्यक्रम बघताना मन भूतकाळात गेलं होतं. त्या कार्यक्रमातून ते मुलांशी संवाद साधत होते. त्यांच्या त्या दिलखुलास गप्पांमधून मुलंदेखील मोकळ्या मनानं बोलताना पाहून आपलं लहानपण आठवू लागलं होतं. थोडक्यात, संवाद महत्त्वाचा! तो मुलांशी असो वा आजी-आजोबा, पालक किंवा इतर नातेवाईक यांच्याशी. तो साधताना मन हलकं होतं. हो, ज्याचा त्याचा तोच अनुभवत असतो. कारण संवाद हा नात्यांचा आत्मा आहे. एकमेकांमध्ये संवादाच नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ नसतो. संवाद म्हणजे काय, तर एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारणं, व्यक्त होणं. अनेकवेळा या संवादातून आपल्या समस्यांचं आकलन होतं. मनातली कटूता निघून जाते. नात्यातले गैरसमज दूर होतात. संवादाचा परिणाम आपल्या बुद्धीवर, मनावर आणि नात्यावर होतो. जसं- शाल्मली बर्‍याच दिवसांनी स्वतःच्या बहिणीशी फोनवर बोलत होती. बोलताना तिच्या लक्षात आलं की, बहिणीच्या मनात तिच्याबद्दल कटूता आहे, गैरसमज आहे. हळूहळू तिनं तो जाणून घेतला आणि स्वतःची समस्या सांगितली. तिचा गैरसमज दूर केला. एखादेवेळी आपल्या आवडत्या मित्र/मैत्रिणीचा फोन झाला की मन अगदी उल्हासित होतं. संवादामुळेच हे घडत ना!

संवाद म्हणजे संवेदनशील होणं. संवेदना आली की संवाद सुदृढ होतो. संवाद म्हणजे दोन व्यक्तींमधला सेतू. वाद-विवाद करणं, कुणाचा पाणउतारा करणं म्हणजे संवाद नव्हे. पण हल्ली जिकडेतिकडे हेच ऐकण्यात येतं आणि माणूस एकमेकांपासून दूर जातो. तरुण पिढीत त्यामुळेच घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. हे केवळ संवाद हरवल्याचं लक्षण नाही का? दोन व्यक्ती सोबत राहू लागल्या की मतभेद होणार, भांड्याला भांडं लागणारच. पूर्वीही होतंच. पण संवादातून हे प्रश्‍न सुटत होते. परंतु आता दोन टोकंच गाठली जातात. जसं- वसुधा आणि तिचा नवरा लहानसहान कारणावरून वाद घालत. दोघांनी सोबत न राहण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी अनेकदा वादाचे कारण शुल्लक आहे, परत विचार करून निर्णय घ्या असा सल्ला दिला. तिची आई म्हणाली, ‘‘यापेक्षाही जास्त मोठ्या कारणांवरून घरात वाद झालेत; पण घटस्फोटाचा विचार मनात आला नाही.’’ याचा अर्थ, मतभेद दुरुस्त करता येतात, मनात असावी लागते ती भावना. भावना असली की संवाद तयार होतो. संवादामुळे दुरावे विरतात.

अनेक घरांमध्ये एकत्र कुटुंब असतं. घरात सुसंवाद असल्याकारणानं घराची जोडणी मजबूत असते. काही ठिकाणी सासू-सासरे अणि मुलगा यांचं नाममात्र एकत्र राहणं असतं. संवाद हरवल्यागत असतो, फक्त व्यवहार तेवढा शिल्लक असतो. नात्यात, कर्तव्यात कृत्रिमता येते. तिथे भावनेपेक्षा दिखाऊपणालाच महत्त्व जास्त असतं. जणू गिफ्टपेक्षा रॅपरला महत्त्व जास्त. संवादाचे अनेक पैलू आपण समाजात बघतोच, त्यातला अजून एक पैलू असतो तो ‘स्टेटस्’. आपल्याच बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तीशी बोलणं. आपल्यापेक्षा बौद्धिक पातळीनं कमी असणार्‍या व्यक्तीशी बोलणं म्हणजे समाजात स्वतःची पातळी खाली घसरल्याचं लक्षण समजतात. म्हणजे अधिकारी व्यक्तीनं शिपाई किंवा कारकूनाशी कामाव्यतिरिक्त बोलणं.
अनेकवेळा विचार येतो, आपण पाश्‍चिमात्त्य संस्कृतीनुसार ‘डेज’ साजरे करू लागलोत. कदाचित ‘संवाद डे’ तर तयार होणार नाही ना ‘थॅक्स गिव्हींग डे’सारखा? खरं म्हणजे आपले सर्व सण संवादाशी निगडीत आहेत. जसं- रक्षाबंधन, भाऊबीज- बहीण भावांचा संवाद, संक्रांत- दसरा समाजाशी संवाद. ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ ही टॅगलाईन आपण संक्रांतीत इतरांशी बोलताना वापरतो. दसर्‍याला आपट्याची पानं देऊन सामाजिक बांधिलकी आणतो. इतकंच नव्हे तर काही सण मुक्या प्राण्यांशी संवाद साधून करतो.

इतर राष्ट्रांत माणसांना आपल्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलेले आपण बघतो. तरीही ती समाजप्रिय नाहीत. एकलकोंडी स्वभावाची आढळतात. तिथे मनोरुग्ण जास्त आढळतात. खरं म्हणजे मूल लवकर स्वतंत्र होतं. पालकांशी भावनिकता नातं नाही, त्यामुळे ती आत्मकेंद्री बनतात. जणू मूळ नसलेल्या प्लास्टिकच्या रोपट्यासारखी भासतात. म्हणजे दिसायला आकर्षक. संवाद नसल्यामुळेच घडतयं ना हे!
अंहकार, विभक्त कुटुंबपध्दती, पिढीचा मानसन्मान कमी, सर्वात महत्त्वाचं कारण टेक्नॉलॉजीचा अती वापर, त्यामुळे सहजता गेली, संवाद हरवला, नात्यात कृत्रिमता आली. जग जवळ आलं पण मनं दुरावलीत. मूळ गाभाच कमी होत चालला की काय? संवादामुळेच नात्यातली ओढ वाढते, कुटुंब सुदृढ बनत. मनात चाललेलं द्वंद्व संवादातून मिटतं. कुटुंब सुदृढ तर समाज सुदृढ, नंतर देश सुदृढ बनतो. संवादातून मिळणारी ताकद आणि आत्मविश्‍वास कायम राहावा.
समर्थ रामदासस्वामी मनाच्या श्‍लोकात सांगतात ः
तुटे वाद, संवाद त्यातें म्हणावे|
विवके अहंभाव याते जिणावे॥
अहंता गुणे वाद नाना विकारी|
तुटे वाद, संवाद तोे हीतकारी॥