संयमशक्तीचा विजय

0
23

(योगसाधना- ५७४, अंतरंगयोग- १५९)

  • – डॉ. सीताकांत घाणेकर

बहुतेकांची इंद्रिये अनियंत्रितच असतात. त्यामुळे समाजात विविध तर्‍हेची भांडणे, लढाया व रोग होत असतात. कुठलीही समस्या आली तर लगेच प्रत्युत्तर न देता आधी इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, नंतर थोडा विचार करून मग प्रतिक्रिया दिली तर अनेकवेळा वातावरण बिघडत नाही.

भारतात आषाढ, श्रावण, भाद्रपद व आश्‍विन हे चार महिने चातुर्मासाचे आहेत. आषाढ, शुद्ध एकादशी म्हणजे ‘देवशयनी’ एकादशी. त्या दिवशी चातुर्मास सुरू होतो व कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे ‘देवउठी’ एकादशी या दिवशी संपतो. म्हणजे देवशयनी एकादशी ते देवउठी एकादशी या चार महिन्यांत भगवंत झोपतो.
सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल की, हे चार महिने सृष्टीसाठी अत्यंत आवश्यक व प्रमुख आहेत. कारण त्या चार महिन्यांत पाऊस येतो. वर्षभरासाठी जलाची व्यवस्था होते. विविध तर्‍हेची पिकं येतात… आणि यावेळी देव झोपला तर कसं चालेल? कारण आपण मानतो की सर्व सृष्टिचक्र तोच चालवतो आहे.
आपल्या ऋषिमहर्षींनी सांगितलेल्या या विषयावर ज्ञानी, सुज्ञ व्यक्तींनी विचार, अभ्यास व चिंतन करून त्याचा खरा अर्थ सांगणे अत्यंत आवश्यक आहे. तत्त्वज्ञानामध्ये विषय सोपा करून सांगण्यासाठी अशी अनेक रूपकं आहेत.

शास्त्रकार म्हणतात की, देव कर्मयोगी आहे. कर्मयोगी फक्त कर्म करतो; त्याला फळाची अपेक्षा नसते. वरील महिन्यांत आपल्या कृषिप्रधान देशात शेतकर्‍याला पुष्कळ कामं असतात. ती म्हणजे- शेत नांगरणे, बीज पेरणे, रोपे कशी वाढतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे, मूबलक पाणी मिळते की नाही हे बघणे, कीटक-जंतू पिकांचा नाश करत नाही ना? गुरे खात नाहीत ना? आपले पीक कुणी चोरी करीत नसेल ना? अशा या अनेक कामांत शेतकरी व्यस्त असतो.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पीक येते तेव्हा त्याला भगवंताची व त्याच्या कृपेची आठवण होते. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मग शेतकरी पहिले पीक घेऊन मंदिरात जाऊन देवाला अर्पण करतो. तो म्हणतो- ‘भगवंता, मी शेतातील सर्व कामे केलीत, पण शेवटी हे सर्व पीक मिळाले ते तुझ्या विश्‍वावरील प्रेमामुळे, कृपेमुळे!’
भगवंत तर कर्मयोगी आहे. तसेच त्याला त्याच्या लाडक्या मुलाला- मानवाला- उत्साह द्यायचा असतो म्हणून तो म्हणतो, ‘अरे बाळा, मी चातुर्मासात झोपलो होतो. हे सर्व फळ तुझ्याच कष्टाचे आहे!’
भगवंत आणि भक्त यांचा हा संवाद खरेच हृदयंगम आहे. तत्त्ववेत्ते असे सांगतात की, आपण ज्यावेळी हे ज्ञान मिळवतो त्यावेळी एक बोध घ्यायचा असतो, तो म्हणजे आपणही असेच कर्मयोगी बनायला हवे. बहुतेकवेळा बहुतेकजण यशाचे श्रेय स्वतःकडे घेतात; पण अपयशाचे खापर मात्र दुसर्‍यांवर फोडतात.
चातुर्मासातील सर्व उत्सवांचा आपण विचार करीत आहोत. त्यात हल्लीच झालेली नवरात्री आपण बघितली. यावेळी आपण शक्तीची उपासना करतो. विश्‍वात जर व्यवस्थित सुखा-समाधानात, आनंदात जगायचे असेल तर सर्व तर्‍हेच्या शक्ती प्रत्येकाला आवश्यक आहेत.

महर्षी व्यास त्यासाठी महान तत्त्वज्ञान सांगतात-
लभ्या धरित्री तव विक्रमेण ज्यायांश्‍च वीर्यास्त्रबलैर्विपक्षः|
अतःप्रकर्षाय विधिर्विधेयः प्रकर्षतन्त्रा हि रणे जयश्रीः॥
(किरातार्जुनीयम्)

  • ‘तुम्हाला सामर्थ्याने, पराक्रमाने पृथ्वी जिंकायची आहे. शत्रुपक्ष सामर्थ्याने व शस्त्रास्त्राने तुमच्यापेक्षा अधिक बलवान आहे. तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनायचे आहे. कारण जो अधिक सामर्थ्यशील व अधिक साधनसंपन्न असतो त्यालाच युद्धात विजय मिळतो.

विश्‍वाकडे व आपल्या जीवनाकडे- वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन- जर चौफेर नजर फिरवली तर लगेच लक्षात येईल की, प्रत्येकाला अनेक शत्रूंचा सामना करायचा आहे. यात आपले शेजारील तसेच इतर दूरचे देश आहेतच; त्याशिवाय कुटुंबातील व आसपासच्या समाजातील व्यक्ती, तसेच आपल्या मनात व विचारांतदेखील शत्रू आहेत. या सर्वांचा सामना करायचा आहे.
विविध संस्था व तत्त्ववेत्ते यासंदर्भात आपापले विचार असे मांडतात-
माऊंट अबू प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या विचारानुसार नवरात्रातील देवीला आपण अष्टभूजा म्हणजे आठ हात असलेली मानतो. चार हातांत विविध वस्तू दाखवतात. त्यांच्या मताप्रमाणे ही विविध शक्तीची सर्व प्रतीके आहेत. प्रत्येक शक्तीची देवतादेखील कुठली आहे याबद्दल ते ज्ञान देतात.

विस्तार संकीर्ण करण्याची शक्ती- पार्वतीदेवी
माघार घेणे ः ही सुरुवातीची प्रथम शक्ती आहे. याचे उदाहरण म्हणजे कासव. त्याचे मस्तक व चार पाय बाहेर असतात तेव्हा त्याला कुठे जायचे असते अथवा खायचे असते. पण समोर काही समस्या आली- उदा. कोल्ह्यासारखा प्राणी आला- तर तो लगेच आपली इंद्रिये आत कवचात घेतो आणि त्यामुळे सुरक्षित राहतो. त्याच्यावरून हत्ती जरी चालून गेला तरी तो मरत नाही.
योगसाधनेतील राजयोगामध्ये बहिरंगयोगांचे पाचवे अंग आहे- प्रत्याहार. म्हणजे सर्व इंद्रियांवर- पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये- मनाचे संपूर्ण नियंत्रण. प्राणायाम या चौथ्या अंगामध्ये जी षण्मुखी मुद्रा करतात तीदेखील या प्रत्याहाराचेच प्रतीक आहे.

आजच्या परिस्थितीत हे नियंत्रण अत्यंत जरूरीचे आहे. कारण बहुतेकांची इंद्रिये अनियंत्रितच असतात. त्यामुळे समाजात विविध तर्‍हेची भांडणे, लढाया व रोग होत असतात. मात्र प्रत्यक्ष जीवनात या शक्तीचा उपयोग होऊ शकतो. कुठलीही समस्या आली तर लगेच प्रत्युत्तर न देता आधी इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, नंतर थोडा विचार करून मग प्रतिक्रिया दिली तर अनेकवेळा वातावरण बिघडत नाही. नाहीतर उगाच बाचाबाची होऊन भांडणे होतात.
महापुरुष या सर्व शक्तींचा व्यवस्थित वापर करतात. एक उदाहरण म्हणजे, भगवान बुद्धाचे. एक दिवस ते आपल्या शिष्यांबरोबर गावात गेले होते. त्यावेळी काही माणसे त्यांना शिव्या देऊ लागली. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू लागली. पण बुद्ध शांत राहिले. त्यांच्याकडे त्यांनी ढुंकूनही बघितलेदेखील नाही. नंतर ते आश्रमात आले. त्यावेळी शिष्यांनी त्यांना विचारले की ते लोक आपल्याला शिव्या देत होते, मग आपण त्यांना प्रत्युत्तर का दिले नाही?
भगवान बुद्ध म्हणाले, ‘ते माझ्याबद्दल बोलत होते असे तुम्ही म्हणता, पण त्यांतील मी कुणीही नाही. मग मी उत्तर का देऊ?’
अनेकवेळा माघार घेणे आवश्यक असते. लढाईतदेखील गरज पडेल तेव्हा माघार घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील काहीवेळा यशस्वी माघार घेतली होती. याउलट पानीपतच्या लढाईत विश्‍वासरावांनी माघार घेतली नाही, त्यामुळे ते व इतर अनेक सैनिक नाहक मृत्युमुखी पडले!

आपल्या कुटुंबात व समाजात अशा अनेक घटना घडतात. त्यावेळी राग व अहंकारामुळे प्रत्युत्तर दिले जाते व परिस्थिती बिघडते.
या शक्तीची देवी पार्वती आहे. ती जशी शांत आहे तसेच आपणदेखील राहणे ही अपेक्षा आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, माघार घेणे म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे. योग्यवेळी प्रत्युत्तर देणे, प्रतिकार करणे आवश्यकही ठरतं. नाहीतर इतर व्यक्ती आपला फायदाच घेणार. समाजात आज असेदेखील चित्र दिसते की चूक व पाप करणारी व्यक्ती सुधारत नाही, कारण यशस्वी प्रतिकार होत नाही. आम्ही शक्तीहीन झालोत.
नवरात्राच्या दिवशी या सर्व अष्टशक्ती देवीकडून आम्हाला मिळवायच्या आहेत व सामर्थ्यवान व्हायचे आहे!
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्माकुमारी, माऊंट अबू- यांचे साहित्य)