संध्याकाळी ७ नंतर समुद्रात स्नानासाठी उतरण्यावर बंदी

0
118

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत गोव्यात येणार्‍या पर्यटकांना संध्याकाळी ७ नंतर समुद्रात स्नानासाठी उतरू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समुद्र किनार्‍यांवरील सुरक्षेसाठी पर्यटन खात्याने एका समितीचीही स्थापना केली.

बाबू केणी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून गोव्यातील किनारे सुरक्षित, स्वच्छ व अपघात मुक्त रहावेत त्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्याची सूचना ह्या समितीला करण्यात आली असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी काल सांगितले.
दारू पिऊन समुद्रात
उतरता येणार नाही
पर्यटकांना रात्री ७ नंतर जसे समुद्रात उतरता येणार नाही तसेच त्यांना दारू पिऊनही समुद्रात स्नानासाठी जाता येणार नाही. मात्र, जे कोण ह्या नियमाचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आजगांवकर यानी स्पष्ट केले. पोलिसांना तशी सूचना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
वरील समितीवर एक पोलीस अधिक्षक, एक जीवरक्षक, एक शॅकमालक असे मिळून एकूण पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीला किनार्‍यांवर कुठे कुठे अमली पदार्थांचा व्यवहार अथवा वापर होत आहे ते पाहण्यास, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अन्य कोण कोणती पावले उचलण्याची गरज आहे त्याचा अभ्यास करण्याची सूचना करण्यात आली आहे.
काचेच्या दारु बाटल्यांवर बंदी
शॅक्ससह किनार्‍यांवर कुठेही काचेच्या दारू बाटल्यांवर बंदी घालण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलेला असून त्यामुळे काचेच्या दारू बाटल्यांवर किनार्‍यांवर बंदी राहील. काचेच्या बटल्या किनार्‍यावर फोडून टाकण्याचे प्रकार घडत असून वाळूत पडणार्‍या काचा किनार्‍यांवरून फिरणार्‍यांसाठी धोक्याच्या ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आजगांवकर यांनी सांगितले.
अभ्यास दौर्‍यांवर येणार्‍यांवर
विशेष लक्ष ठेवणार
काही महाविद्यालयांचे विद्यार्थी अभ्यास दौर्‍यानिमित्त गोव्यात काही महाविद्यालयांचे विद्यार्थी अभ्यास दौर्‍यानिमित्त गोव्यात येत असतात. हे विद्यार्थी किनार्‍यावर आल्यानंतर अतिसाहस करायला जातात आणि जीव गमावून बसतात. कधी कधी त्यांच्या बसेस् मध्यरात्री गोव्यात पोचतात आणि हे विद्यार्थी मध्यरात्रीच येऊन समुद्रात उतरतात. अशा विद्यार्थ्यांवर खास लक्ष ठेवण्याची सूचना बैठकीत करण्यात आल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
किनार्‍यावर उघड्यावर
स्वयंपाक करण्यावर बंदी
काही देशी पर्यटक किनार्‍यावर आल्यानंतर तेथे चूल मांडून स्वयंपाक करीत असतात. अशा प्रकारामुळे किनारे अस्वच्छ होऊ लागले आहेत. त्यामुळे किनार्‍यावर उघड्यावर स्वयंपाक करण्यावर बंदी घालण्याचा तसेच किनार्‍यांवर हातगाडे आणण्यावर तसेच विक्रीचा धंदा करण्यावर बंदी घालण्याचाही निर्णय घेण्यात आला. ज्यांच्याकडे परवाने असतील अशाच लोकांना किनार्‍यावर भेलपुरी, शहाळी, अथवा अन्य खाद्य पदार्थांची विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले. किनार्‍यावर कचरा टाकणार्‍यांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.