संचारबंदी एक आठवड्याने वाढवली

0
107

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, नियमांत शिथिलता नाही

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत गोवा सरकारने आठवडाभराने वाढ केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सदर माहिती दिली. संचारबंदीत वाढ करण्यात आलेली असली तरी नियमांत कोणतीही शिथिलता करण्यात आलेली नाही. सरकारने सलग दुसर्‍यांदा तेच नियम कायम ठेवत संचारबंदीचा कालावधी आठवडाभराने वाढवला आहे.

परराज्यातून येणार्‍या प्रवाशांना सरकारने यावेळीही कोणताच दिलासा दिलेला नाही. पूर्वीप्रमाणेच त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ७२ तासांपूर्वीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्यात सर्वप्रथम ९ ते २३ मे २०२१ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. नंतर त्यामध्ये ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली होती. तद्नंतर जून महिन्यात प्रत्येक आठवड्याला संचारबंदीत वाढ करण्यात आली होती. आता जुलै महिन्यांतही चौथ्यांदा संचारबंदीमध्ये आठवडाभराची वाढ करण्यात आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश जारी

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने राज्यातील संचारबंदीत वाढ करणारा आदेश काल जारी केला. राज्यातील २६ जुलै सकाळी ७ ते २ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपयर्र्ंत वाढ करण्यात आली आहे. जे व्यवसाय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे ते सर्व व्यवसाय कायम राहतील, असे आदेशात म्हटले आहे.