श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट स्थापन

0
130

>> पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असे पंतप्रधान म्हणाले. हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.

अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्तमान आणि भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या आणि त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले. अयोध्या कायद्यांतर्गत अधिग्रहण केलेली सर्व ६७ एकर जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थश्रेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते पुढे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एका स्वायत्त ट्रस्ट असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची स्थापन करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिर उभारणीच्या कामाबाबत निर्णय घेण्यास स्वायत्त असेल, असे पंतप्रधान म्हणाले. सखोल विचार करून, तसेच चर्चेअंती ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याची विनंतीही उत्तर प्रदेश सरकारला करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली.

ट्रस्टच्या विश्‍वस्तपदी
विमलेंद्र मोहनप्रताप मिश्र
दरम्यान, ट्रस्टच्या विश्वस्तपदी विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. इतर सदस्यांच्या नावाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. ट्रस्टबाबतची गॅजेट अधिसूचना जारी करण्यात आली.

ट्रस्टला कार्यालय श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाने आर-२०, ग्रेटर कैलाश पार्ट-१, नवी दिल्ली येथे देण्यात आले आहे. त्यानंतर ट्रस्टशी संबंधित कागदपत्रे विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांनी स्वीकारल्याने त्यांची धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नियुक्ती केली आहे. या ट्रस्टमध्ये एका दलित व्यक्तीसह एकूण १५ सदस्य असणार आहेत.