श्रवणच्या मृत्यू प्रकरणी घातपाताचा संशय गडद

0
10

शवचिकित्सा अहवालातून गळा आवळल्याने व श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट

नगरगाव-आंबेडे येथील 24 वर्षीय श्रवण बर्वे या तरुणाचा मृतदेह मंगळवारी घराच्या अंगणात संशयास्पद स्थितीत आढळला होता. पोलिसांना शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाला असून, घातपाताचा संशय अधिक वाढला आहे. गळा आवळल्याने आणि श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. या प्रकरणी अजून कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र पुढील काही दिवसांत काहींना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शवविच्छेदन अहवालात असे स्पष्ट झाले आहे की श्रावण देविदास बर्वे (24) यांचा मृत्यू जोरदार बळजबरीने मान दाबल्याने झालेल्या तीव्र श्वासोच्छवासामुळे झाला. जखमा ताज्या, शवविच्छेदनपूर्व आणि मृत्यूच्या वेळी प्राणघातक होत्या.
श्रवण बर्वे याचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी गोमेकॉमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. काल दुपारी त्याच्या मृतदेहाची चिकित्सा करण्यात आली. त्यानंतर या संदर्भाचा अहवाल संध्याकाळी प्राप्त झाला. त्या अहवालामध्ये श्रवण बर्वे याचा मृत्यू गळा आवळल्याने व श्वासोच्छ्वास कोंडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता मावळली असून, घातपाताची शक्यता अधिक बळावली आहे.

सोमवारी संध्याकाळी ते रात्री उशिरापर्यंत श्रवण बर्वे हा हनुमान मंदिरानजीक मित्रांसमवेत आयपीएलचा सामना पाहण्यासाठी बसला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सामना संपल्यानंतर तो घरी झोपण्यासाठी गेला होता. त्यामुळे रात्री 11 ते सकाळी 5 या दरम्यान सदर घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यानंतर मंगळवारी सकाळी श्रवणचा मृतदेह घराच्या समोर अंगणामध्ये पडलेला त्याच्या वडिलांना आढळून आला होता. यावेळी घराचा दरवाजा उघडा होता आणि त्याचा मोबाईल घरामध्ये होता, हेही तपासादरम्यान समोर आले होते. श्रवण बर्वे हा सोमवारी रात्री एकटाच घरामध्ये होता. त्याचे वडील, आई व भाऊ हे होंडा-नारायणनगर येथील घरामध्ये राहायला गेले होते. मंगळवारी सकाळी त्याचे वडील नगरगाव या ठिकाणी परतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला होता.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण बर्वे याचे कोणाशीही वैर नव्हते. असे असताना त्याचा घातपात कसा झाला, याबाबत त्याच्या मित्राकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ज्या दिवशी सदर घटना घडली, त्या दिवशी श्रवण बर्वे हा एकटाच घरात होता. वडिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे श्रवणशी फोनवरून बोलणे झाले होते.
बुधवारी दुपारी श्रवणचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्रपरिवार व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात
उपस्थिती होती.