शोधनोपक्रमात ः एरंड स्नेह

0
85
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

आपले पूर्वज पूर्वीच्या काळात महिन्यातून एकदा किंवा वर्षातून दोनदा एरंड तेल घेऊन कोठा साफ करायचे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मनुष्याला निरोगी राहण्यासाठी त्याचा कोठा साफ असणे महत्त्वाचे आहे. आपले आजी-आजोबा अजूनही एरंड तेल घेतात.

सध्याच्या दिवसात पित्ताच्या विकृतीच्या तक्रारी घेऊन रुग्ण क्लिनिकमध्ये येत आहेत. सर्वांगाला खाज येणे, त्वचा विकृती, ऍसिडिटीचा त्रास, झोप पूर्ण न होणे, डोके जड वाटणे, संडासला साफ न होणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुमच्यापैकी कुणाला जाणवतात का? हो… मग हे नैसर्गिक आहे. ऋतू बदललेला आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतोच ना, म्हणून तर या काळात विरेचन हा शोधनोपक्रम सांगितलेला आहे.

आपले पूर्वज पूर्वीच्या काळात महिन्यातून एकदा किंवा वर्षातून दोनदा एरंड तेल घेऊन कोठा साफ करायचे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मनुष्याला निरोगी राहण्यासाठी त्याचा कोठा साफ असणे महत्त्वाचे आहे. आपले आजी-आजोबा अजूनही एरंड तेल घेतात. पण आत्ताची पिढी तेल सेवन करायला कंटाळतात. त्याचा गिळगिळीतपणा नकोसा वाटतो. पण महत्त्वाचे म्हणजे हे तेल कसे घ्यायचे? कधी घ्यायचे? कोणी घ्यायचे… याबद्दल व्यवस्थित जाण नसल्याचे समजते.
एरंड तेल कधी घ्यावे?…
शोधनोपक्रम म्हणून जेव्हा आपण एरंड तेल सेवन करतो, तेव्हा आपला कोठा साफ होणे अपेक्षित असते. म्हणजेच आतड्यातही चिकटलेला मल बाहेर निघणे अपेक्षित असते. फक्त मलबद्धता आहे व पोट साफ होणे अपेक्षित असेल तर अशावेळी तेलाची मात्रा व काळही बदलतो. पण स्वस्थ मनुष्याला जेव्हा आपले स्वास्थ्य कायम ठेवायचे असते, अशा व्यक्तींनी शरद किंवा वसंत ऋतूत दोनवेळा एरंड तेल सेवन करावे.
शोधनोपक्रमासाठी एरंड तेल कधी घ्यावे?
शोधनोपक्रम म्हणून एरंड तेल घेताना, ज्या दिवशी तेल घ्यायचे असेल त्याच्या आदल्या दिवशी रात्रीचे जेवण हे हलके असावे. म्हणजे साधी मुगाची खिचडी किंवा मुगाचे कढण; त्यात तूप मात्र चांगले चार चमचे घालावे.

  • रात्रीचे जेवण शक्यतो सूर्यास्तापूर्वीच करावे.
  • जेवल्यानंतर काहीच खाऊ नये.
  • तूप घेतल्याने आभ्यंतरातही चांगले स्नेहन होते.
  • ज्या दिवशी हा एरंड स्नेह घ्यायचा असेल त्या दिवशी सकाळी चांगले संपूर्ण शरीराला तेलाने मालीश करावी व नंतर साधारण अर्ध्या तासाने चांगली गरम पाण्याने आंघोळ करावी म्हणजे शरीराचे स्वेदन होते व स्त्रोतसे मोकळी होण्यास मदत होते.
  • त्यानंतर उपाशीपोटी स्नेह सेवन करावा.
  • घरच्याघरी हा शोधनोपक्रम करायचा असल्यास वैद्याच्या सल्ल्याने आपल्या कोष्ठाचा प्रकार जाणून एरंड स्नेहाची मात्रा जाणून घ्यावी व नंतरच एरंड स्नेह घ्यावा. नाहीतर अतियोग होऊन दुष्परिणामही होऊ शकतात.
  • एरंड स्नेह शक्यतो गरम पाण्याबरोबर किंवा लिंबू पाण्याबरोबर घ्यावे. पहिले स्नेह पिऊन वर गरम पाणी किंवा लिंबू पाणी घ्यावे.
    एरंड स्नेह कधी घ्यावा?…
  • आपली झोप चांगली पूर्ण झाल्यावर, पहाटे सुमारे चार वाजता घ्यावा. हा वाताचा काळ असतो म्हणजे मलनिःसारण चांगले होते.
  • हा स्नेह शोधन म्हणून घेताना शक्यतो रात्री घेऊ नये.
    एरंड स्नेहाची मात्रा ः
  • एरंडस्नेह शोधनासाठी घेताना पूर्ण मात्रेत घ्यावा.
  • स्नेहाची मात्रा ही प्रत्येकाच्या बलाच्या व कोष्ठाच्या प्रकारावरून ठरवावी. वैद्याच्या सल्ल्यानेच स्नेह घ्यावा.
  • साधारणतः मोठ्यांनी (२१ वर्षांवरील) व बल चांगले असल्यास सहा चमचे स्नेह घ्यावा. साधारण ३० मिली.
  • मध्यम बल व युवा पिढी किंवा १८ ते २१ वर्षांमधील मुलामुलींनी साधारण ४ चमचे एरंड स्नेह घ्यावे.
  • लहान मुलांमध्ये शक्यतो क्रूर कोष्ठ असल्याने, कफाचा काळ असल्याने ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना ३ चमचे स्नेह देण्यास काहीच हरकत नाही.
  • ६ वर्षाखालील मुलांनाही एरंड स्नेह देण्यास हरकत नाही. लहान बालकांना देताना प्रथम एका चमच्याने सुरुवात करावी. स्नेह कसा मानवतो तो पाहावा व नंतर मात्रा ठरवावी.
    मलावष्टंभ, त्वचाविकार, सर्दी-खोकला किंवा पचन-विकार असता एरंड स्नेह मृदू विरेचन म्हणून घ्यायचा असल्यास….
  • रोज सकाळी १ चमचा स्नेह गरम पाण्याबरोबर घ्यावा.
  • किंवा रोज सकाळी १ चमचा स्नेह व १ चमचा मध घ्यावा.
  • किंवा १ ते २ चमचे स्नेह कणीक भिजवताना त्यात घालून त्याच्या चपात्या किंवा भाकरीमधून सेवन करावा.
  • एरंड स्नेह किंवा कोणतेही औषध हे स्वखुशीने घ्यावे.
  • आभ्यंतरात स्नेह घेण्यास कंटाळा येत असल्यास तेलाने भिजवलेला कापूस किंवा गॉज गुदभागी ठेवावे किंवा कापसाचा फाया तेलाने भिजवून नाभी प्रदेशी ठेवावा.
    आपला कोठा साफ झाला हे कसे ओळखावे?…..
  • शोधन म्हणून एरंड तेल पिताना स्नेह पूर्ण मात्रेत घ्यावे. तेल प्यायल्यानंतर दोन तासांनी संडासला होते. त्यानंतर कफयुक्त संडासला होते. थोड्या वेळाने पित्तयुक्त संडासला होते. (साधारणतः संडासच्या जागी जळजळ व्हायला लागते) व शेवटी वातयुक्त, आवाज करत, पाण्यासारखी संडासला होते. अशाप्रकारे जेव्हा संडासला होते तेव्हा कोठा साफ झाला हे जाणावे.

कोठा साफ झाल्यावर शक्यतो हलकाच आहार घ्यावा.
शोधनासाठी स्नेह हा नेहमी सुट्टीच्या दिवशी घ्यावा. पण आहार मात्र साधा, हलका- पेज- कढण, सूप, तुपभात ह्याप्रमाणेच घ्यावा व हळूहळू दुसर्‍या दिवसापासून आहाराची मात्रा वाढवून पूर्ववत सेवन करावा.
एरंडस्नेहाचे फायदे …

  • एरंडस्नेह हा थेट यकृत या अवयवापर्यंत कार्य करत असल्याने पचनकार्यात ह्या स्नेहाचा महत्त्वाचा भाग आहे.
  • नेहमी निरोगी राहण्यासाठी एरंड स्नेह घ्यावा.
  • मेदोवृद्धी (लठ्ठपणा)मध्ये एरंड स्नेह घ्यावा.
  • मासिकपाळीचे त्रास असल्यास अनियमित मासिक स्राव असल्यास एरंडस्नेह घ्यावा.
  • त्वचा विकारांमध्ये एरंडस्नेह घ्यावा.
  • कावीळ-रक्ताल्पतामध्ये एरंडस्नेह घ्यावा.
  • संधिवातासारख्या वातविकारांमध्ये एरंडस्नेह घ्यावा.
  • केसात कोंडा, केसगळतीमध्येही एरंड स्नेहाचा उपयोग होतो.
    साधारणतः सर्वच वातविकारांमध्ये एरंडस्नेहाचा उपयोग होतो. म्हणूनच सध्या शरद ऋतूमध्ये वैद्याच्या सल्ल्याने एरंडस्नेहाचा उपयोग करावा.