शोकांतिका

0
634

पराकोटीची गुंतागुंत आणि वेळोवेळी मिळत गेलेली नवनवी वळणे यामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या आरुषी – हेमराज दुहेरी हत्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने राजेश व नुपूर तलवार या आरुषीच्या आईवडिलांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. अर्थात, हा उच्च न्यायालयाचा निवाडा असल्याने आणि सीबीआय त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता असल्याने हा अंतिम निवाडा म्हणता येत नाही. परंतु तरीही एखाद्या गूढपटामध्येच शोभावे तशा प्रकारे या हत्या प्रकरणाला वेळोवेळी जे वेगळेच वळण मिळत गेले, त्यातील हा नवा अध्याय म्हणावा लागेल. चौदा वर्षांची हसती खेळती आरुषी एका काळरात्री अनैसर्गिक मृत्यूला सामोरी गेली. दुसर्‍या दिवशी घरच्या नोकराचाही मृतदेह गच्चीवर मिळाला. या दोन्ही हत्या कोणी आणि का केल्या याविषयी आजवर प्रचंड मंथन झालेले आहे. कधी आरुषीच्या पालकांनाच दोषी धरले गेले, तर कधी कृष्णा, राजकुमार या नोकरांना, कधी विजय मंडल ह्या शेजार्‍यांच्या घरच्या नोकराला खुनी ठरवले गेले. नाना तर्‍हेने या प्रकरणात शर्थीने तपास झाला. खरा खुनी कोण हे मात्र आजतागायत स्पष्ट झालेले नाही. अगदी सुरवातीला नोएडा पोलिसांनी केलेला तपास, नंतर सीबीआयकडे हे गुंतागुंतीचे प्रकरण सोपवले गेल्यानंतर सीबीआयने केलेला तपास, नंतर सीबीआयच्या नव्या तपास अधिकार्‍याने केलेला तपास एवढे सगळे होऊनही सीबीआयच्या हाती काही लागले नाही. त्यांनी तपास बंद करण्याचा निर्णय घेऊन न्यायालयाला तसा अहवाल सादर केला. परंतु तेव्हा आरुषीच्या आईवडिलांनीच तसे करण्यास विरोध केला होता. पण त्यानंतर पुन्हा नव्याने तपास झाला तेव्हा आरुषीच्या आई वडिलांनाच खुनी ठरवले गेले आणि जन्मठेप झाली. आता उच्च न्यायालयाने त्या दोघांना पुराव्यांअभावी मुक्त केलेले आहे. म्हणजे अखेरीस सत्य काय हे गुलदस्त्यातच आहे. राजेश आणि नुपूर तलवार हे दोघेही निष्णात दंतवैद्य कुटुंब. त्यांनी स्वतःच्याच मुलीची हत्या करावी असे नेमके काय त्या काळरात्री घडले होते हे कोणी त्रयस्थ सांगू शकणार नाही. त्यामुळे नाना तर्‍हेच्या शंका कुशंका आजवर काढल्या गेल्या. आरुषीसारख्या उमलत्या वयातील कोवळ्या मुलीचे चारित्र्यहननही वृत्तवाहिन्यांनी चालवले. कोणी ह्या हत्यांना ‘ऑनर कीलिंग’ ठरवले, तर कोणी अन्य उद्देश पुढे आणले. कोणी नोकरांवर संशय घेतला, कोणी कंपाऊंडरवर, तर कोणी चोर – दरोडेखोरांवर देखील संशयाचे बोट ठेवले. खरे तर आरुषीचा बळी कोणी घेतला याच्या इतकेच तो का घेतला गेला हे गूढ आहे आणि आज नऊ वर्षे पाच महिन्यांनंतरही ते उलगडू शकलेले नाही. राजेश आणि नुपूर यांच्यावर सर्वाधिक संशय राहिला त्याचे कारण हे दुहेरी हत्याकांड झाले, तेव्हा घर आतून बंद होते आणि घरात तलवार दांपत्य होते. पण स्वतःच्याच लाडक्या मुलीचा जीव त्यांनी घ्यावा असे काय घडले होते हे मात्र कोणी सांगू शकलेले नाही. कोणत्याही न्यायालयीन प्रकरणामध्ये पुराव्यानिशी साबीत करण्याची जबाबदारी आरोपीवर नसते. ते फिर्यादी पक्षाचे काम असते. त्यामुळे या एवढ्या गहन आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात अगदी सुरवातीपासून झालेल्या उथळ आणि दिशाहीन तपासाच्या पार्श्वभूमीवर तलवार दांपत्यावर कितीही संशय असला तरी त्यासंबंधीचे सबळ पुरावे दिसत नव्हते. सीबीआय न्यायालयाने जन्मठेप दिली तरीही संशयाची सुई कायम होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने सबळ पुराव्यांची कमतरता लक्षात घेऊन त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. पण येथे हा विषय संपणार नाही. आरुषीला कोणी मारले, का मारले, हेमराजचा त्यात का बळी गेला हे प्रश्न अजूनही आहेत आणि तपासयंत्रणांसाठी ते मोठे आव्हान आहे. मुळात तपासाच्या वेळोवेळी बदलत गेलेल्या दिशा आणि काढले गेलेले निष्कर्ष एकूण तपासकामाच्या सत्यतेविषयीच शंका निर्माण करीत आहेत. ज्याला जो वाटेल तो खुनी अशा प्रकारे हा सारा तपास आजवर झाला आहे. त्यामुळे आपण ज्याच्यावर संशय घेतला तोच कसा खुनी आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा वेळोवेळी होत राहिला. आजही गुन्हेगार सापडतील वा न सापडतील. तलवार दांपत्य संशयाच्या घेर्‍यात आजही जरी असले तरी ते भविष्यात दोषी धरले जाईल वा न जाईल, परंतु एक मात्र खरे. या हसत्या खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी होऊन गेली आहे. एक सुखी समाधानी कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेले आहे. शत्रूच्याही वाट्याला न येवोत असे दुःखभोग या मात्यापित्यांना भोगावे लागले आहेत यात शंका नाही. आपल्या सुटकेमुळे त्यांनी आनंद जरी व्यक्त केलेला असला तरी त्यांच्या आयुष्यातला खरा आनंद कधीच निघून गेला आहे. मागे उरली आहे ती तपासातील विसंगतींनी निर्माण केलेली गुंतागुंत आणि या प्रकरणास आजवर मिळत गेलेली नवनवी वळणे यांनी निर्माण केलेली एक चिरंतन शोकांतिका..