शेती-संस्कृतीचा दीपोत्सव

0
255
  • डॉ. जयंती नायक

दिव्याशिवाय दिवाळीची संकल्पना पूर्ण होतच नाही. माझ्या मते ‘दिवाळी’ हा शब्दच ‘दिव्यांच्या ओळी’ या अर्थाने जन्माला आला आहे. दिवा किंवा दीप म्हणजे तेजाचे, अग्नीचे प्रतीक. त्याला गर्भप्रतीक पण मानले जाते. जीवनाच्या अखंडत्वाचे ते रूपक. दिवाळीच्या उत्सवात दिवे पेटवणे हे प्रतीकात्मक असून या उत्सवानिमित्ताने आमच्या पूर्वजांनी जीवनाच्या अखंडत्वाची कामना केलेली दिसते.

दिवाळी अथवा दीपावली म्हणजे उजेडाचा, दिव्यांचा उत्सव. अंधाराला दूर करून प्रकाशाचे स्वागत करण्याचा उत्सव. निसर्गही या दिवसांत प्रफुल्लित असतो. वर्षाऋतू संपून शरदाने आपली कोवळी कोवळी सोनपिवळी किरणे पृथ्वितलावर पांघरायला सुरुवात केलेली असते. पावसाळ्यात हिरवटलेली धरती आता नखशिखान्त सोनरंगात न्हालेली असते. घरे-दारे, कोठारे धनधान्याने भरलेली असतात. सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. अशा वेळी शरद ऋतूच्या ऐन मध्यावर, आश्‍विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस दिवाळीचा सण.

प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य ज्यावेळी उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्याकाळी या सणाचा उगम झाला असा समज आहे. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून, जेव्हा सहा महिन्यांचा दिवस सुरू होतो, तेव्हा ध्रुव प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखेवाटले असावे, अन् म्हणून त्यांनी हा उजेडाचा आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली असावी, असे मानले जाते.

चौदा वर्षांचा वनवास संपून राम आपली भार्या सीता आणि बंधू लक्ष्मणासह अयोध्येस परत आले त्या दिवशी प्रजेने दीपोत्सव साजरा केला. इथूनच दीपावलीची सुरुवात झाली, असेही मानले जाते.
धारणा काहीही असो, परंतु दिवाळी अथवा दीपावली हा मूळ शेती-संस्कृतीशी संबंधित सण. तो धान्य-लक्ष्मीचा, जी पर्यायाने धनलक्ष्मीही आहे तिच्या स्वागताचा उत्सव. गोव्यासारख्या मूळ मातृप्रधान संस्कृतीशी संलग्न असलेल्या प्रदेशांत या उत्सवाचे हेच स्वरूप सुस्पष्ट होते. या दिवसांत गोव्यात नुकतीच सुगी सुरू झालेली असते. नव्या धान्याचा दरवळ घर-दारे, शेत-शिवारांत अजूनही दरवळत असतो. शेतकरीही मनातून आनंदून गेलेला असतो. अशावेळी तो आनंद व्यक्त करण्याच्या उद्देशाने, अन् ज्याने आपल्याला झोळी भरभरून दिली त्या या जगातील अज्ञात सर्वश्रेष्ठ शक्तीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ही दीपोत्सवाची रचना केली गेली असावी, हे सत्य दिवाळी साजरी करण्याचा काळ आणि तिच्याशी संबंधित प्रथा-परंपरा यांचा अभ्यास केल्यास पुढे येते.

आज कित्येक जुन्या परंपरा नामशेष झालेल्या आहेत. शहरांमध्ये तर तुरळकपणे त्या निदर्शनाला येतात. गोव्याच्या ग्रामीण भागातही आधुनिकतेचे बरेच वारे वाहते आहे, तरी पूर्णपणे हा भाग आधुनिकतेच्या आहारी गेलेला नाही, म्हणूनच अजूनही या भागांत पूर्वीच्या कित्येक परंपरा दिवाळीच्या दिवशी आत्मीयतेने पाळलेल्या अन् गोव्यातील दिवाळीच्या त्या वैशिष्ट्य बनून राहिलेल्या दिसतात.

दसरा अन् दिवाळी या सणांचा बंधुत्वाचा संबंध आहे. गोव्यात पूर्वीच्या काळी आश्विन महिन्यात दसर्‍याच्या उत्सवाला धरून कापणीला सुरुवात होत होती. विजयादशमीच्या दिवशी बहुतेक गावांमध्ये देवाची पालखी वा तरंग (अवसर) गावच्या मुख्य शेतीत अथवा नमशीत मिरवणुकीने जाते अन् तिथे काही विधी संपन्न करून देवीने कौल दिल्यावर कापणीला सुरुवात होते. ही प्रथा आजही बर्‍याच गावांमध्ये बघायला मिळते. काही गावांमध्ये विजयादशमीच्या दिवशी शेतात पालखी जाण्याऐवजी नवरात्रीच्या ठरावीक दिवशी हे विधिवत ‘नवें’ (नव्या धान्याचे कणीस) कापतात अन् नंतर कापणीला सुरुवात होते.

दसर्‍याला सुरू केलेली कापणी दिवाळीआधी संपते, ती संपवायलाच हवी असते. दिवाळीला घरे-दारे, कोठारे नव्या धान्याने भरलेली असायलाच हवीत, कारण या धान्याच्याच पावलांनी शेतकर्‍याच्या घरात ‘धनलक्ष्मी’ प्रवेश करते अशी धारणा आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी येणारी धनत्रयोदशी (आश्‍विन शुक्ल त्रयोदशी) हेच सुचित करते, किंबहुना धनत्रयोदशी म्हणजेच ‘धान्यलक्ष्मी’ घरात प्रवेशण्याचा हा लाक्षणिक दिवस असतो.

दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करून होते. फक्त गोव्यातच नव्हे तर देश-विदेशांत जिथे जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो तिथे तिथे त्याची सुरुवात दीप पेटवून होते. पारंपरिकपणे दिवाळीला मातीच्या आणि कणकेच्या पणत्या घरा-दारांत पेटवल्या जातात. तसेच घराच्या दारात किंवा घरासमोर उंच जागी- एखाद्या झाडावर किंवा घराच्या छप्परावर- आकाशकंदील लावला जातो. धनत्रयोदशी दिवशी लावलेला हा दिवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत तेवत ठेवण्याची प्रथा आहे.
दिव्याशिवाय दिवाळीची संकल्पना पूर्ण होतच नाही. माझ्या मते ‘दिवाळी’ हा शब्दच ‘दिव्यांच्या ओळी’ या अर्थाने जन्माला आला आहे. दिवा किंवा दीप म्हणजे तेजाचे, अग्नीचे प्रतीक. त्याला गर्भप्रतीक पण मानले जाते. जीवनाच्या अखंडत्वाचे ते रूपक. दिवाळीच्या उत्सवात दिवे पेटवणे हे प्रतीकात्मक असून या उत्सवानिमित्ताने आमच्या पूर्वजांनी जीवनाच्या अखंडत्वाची कामना केलेली दिसते.

धनत्रयोदशी दिवशी पेटवलेला हा आकाशकंदील दक्षिण दिशेला लावण्याची प्रथा आहे. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यमदेवाच्या आदरार्थ तो पेटवला जातो असे सांगतात. यासंबंधाने एक पुराणकथा सापडते. पुराणकाळी म्हणे हैम नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या पुत्राचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाला. स्वतः यमदुताला त्याचा प्राण घेऊन जाताना खूप दुःख झाले. त्याने आपल्या मनातील सल यमराजासमोर बोलून दाखवली तेव्हा यमाने सांगितले, जो कोणी धनत्रयोदशीपासून पाच दिवसपर्यंत आपल्या घराच्या दारात दिवे पेटवणार त्याला कधीच आडमृत्यू येणार नाही, आणि तेव्हापासून लोक धनत्रयोदशीला आपल्या दारात दिवा पेटवायला लागले. या पुराणकथेत तथ्य असो वा नसो, परंतु ती जाणत्याकडून मुलांना ऐकवली जाते. तसेच दिवाळीला दारात आकाशकंदील लावला तर त्या उजेडात आपले स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपे वास करायला येतात अशीसुद्धा कथा ग्रामीण भागात मुलांना ऐकवली जाते.

धनत्रयोदशी दिवशी नवीन वस्तू खरेदी करून घरात आणण्याची प्रथा आहे. असे केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होते अशी समजूत आहे. आदिमकाळी या दिवशी शेतीप्रधान संस्कृतीत नव्या फसलेचे धान्य घरी आणले जायचे, या प्रथेतूनच या प्रथेचा उगम झाला असावा.

धनत्रयोदशीच्या आदला दिवस म्हणजे आश्‍विन शुक्ल द्वादशी. गोव्यात या दिवसाचे तेवढे महत्त्व मानण्यात येत नाही; मात्र इतर राज्यांत- खास करून महाराष्ट्रात- या दिवशी ‘वसुबारस’ असते. या दिवशी संध्याकाळी तुलसीवृंदावनासमोर दिवे पेटवले जातात. नंतर गोठ्यातील गुरांची पूजा केली जाते. यावेळी लहान पोरांनी (गुराख्यांनी) ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ असे गाणे म्हणत सणाची बिदागी मागत घरोघरी फिरण्याची प्रथा आहे. काही आदिवासी जमातीत या सणाला ‘वाघबारस’ असेही म्हणतात आणि वाघदेवाची मातीची किंवा लाकडाची आकृती करून तिची पूजा करतात. तिला कोंबडा अथवा बकरा बळी देऊन गुरा-वासरांची राखण मागितली जाते.
गोव्यात सर्वसामान्यपणे सगळ्या समाजांत नरकचतुर्थीच्या दिवसापासून दिवाळीच्या प्रथांना सुरुवात होते. परंपरासंपन्न गावांमध्ये या दिवशी संध्याकाळी सवाष्णी पाण्याचे हंडे, कळशा घासून-पुसून लखलखीत करतात. त्यावर चुन्याने नक्षी काढतात, त्यांना फुलांच्या माळा घालून सजवतात अन् त्या घेऊन नदीवर (तळीवर किंवा विहिरीवर) जातात. तिथे फूल-कुंकूम अर्पण करून पाण्याची पूजा केली जाते. नदीच्या पाण्यात कणकेचे दिवे सोडतात (किंवा काठावर पेटवून ठेवतात). पूजा-प्रार्थना करून सजलेल्या भांड्यांमध्ये पाणी भरून घरात आणले जाते. हे पाणी सजवलेल्या मोठ्या हंड्यात भरून ते तापवले जाते. या हंड्याजवळही दिवा पेटवला जातो, विडा ठेवला जातो. मग पहाटे प्रतीकात्मक रीतीने नरकासुराचा वध करून घरात आलेली पुरुषमंडळी याच पाण्याने अंगाला तेल-उटणे लावून अभंग्यस्नान करतात. स्नानाअगोदर घरातील सवाष्ण स्त्रीने त्यांना पाटावर बसवून तेल लावण्याचीही प्रथा आहे.

पूर्वीच्या काळी दिवाळीच्या दिवशी अभंग्यस्नान करून पुरुष मंडळी पायाने ‘कारीट’ (काकडीच्या जातीतील परंतु आकारानं एकदम लहान असे अत्यंत कडू फळ) चिरडून फोडायचे अन् त्याचा तुकडा तोंडात टाकायचे. हे कारीट फोडणं म्हणजे प्रतीकात्मक रीतीने नरकासुर दैत्याचा वध करणे अशी समजूत आहे. हल्लीच्या काळी शहरांमध्ये अन् काही प्रमाणात गावांमध्येसुद्धा नरकासुराची प्रतिकृती बनवून त्याचा वध केला जातो. यासंबंधाने स्पर्धाही आयोजित केल्या जातात. नरकासुर हा एक दैत्य राजा. तो खूप माजलेला होता. तो जनतेला खूप पिडायचा. त्याने आपल्या बंदिशाळेत सोळा सहस्त्र स्त्रियांना कैद करून ठेवले होते. श्रीकृष्णाने त्या दैत्याचा नरकचतुर्दशी दिवशी वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्याचबरोबर त्या स्त्रियांची सुटका केली अशी पुराणकथा आहे. आणि या घटनेची आठवण म्हणून प्रतीकात्मक रीतीने कारीट चिरडले जाते अशी जनमानसांत लोकधारणा आहे.

नरकासुर वध करून घरात शिरलेल्या पुरुषांना सवाष्णीने ओवाळायची प्रथा आहे. यावेळी ते तिला ओवाळणीची भेट देतात. या प्रथेत आता थोडासा बदल झालेला दिसतो. आता अभंग्यस्नानानंतर ही ओवाळणी केलेली दिसते.
ओवाळणीनंतर पोह्यांचा फराळ होतो. गोव्यात पोह्यांचे अन् दिवाळीचे खास नाते आहे. या सणालाच ग्रामीण भागात ‘फोवांची परब’ म्हणजे पोह्यांचा सण म्हणतात. आधी घरातील वडीलमाणूस देवाची पूजा करून त्याला गोड्या पोह्यांचा नैवेद्य दाखवतो. पहिली ‘वाडी’ म्हणजे पान देवाला, नंतर घरपुरुशाला (कुलपुरुष) आणि त्यानंतर घरातील मंडळी या पोह्यांच्या फराळाचा आस्वाद घेतात. शेजारपाजार्‍यांनी एकमेकांना पोह्यांची वाडी पोचवण्याची आणि एकमेकांच्या घरी फराळ खायला जाण्याची प्रथा आहे. सुखवस्तू घरांमध्ये गुळाच्या पोह्यांबरोबरच पोह्यांचे आणि कित्येक प्रकार बनवले जातात. उदा. नारळाच्या दुधातील गोड पोहे, बटाटे पोहे, दुधातील पोहे, फुलवलेले पोहे, तिखट पोहे, ताकातील पोहे, दह्यातील पोहे, साखरेचे पोहे वगैरे. शिवाय वाटाण्याची उसळ, आंबाड्याची करम… हे प्रकारसुद्धा बनवले जातात. हे पोहे नव्या उत्पादनाच्या भाताचेच बनवले पाहिजेत अशी गावांमध्ये- जिथे शेती संस्कृती रुजलेली होती, तिथे- प्रथा होती. यानिमित्ताने नव्या फसलेच्या धान्याचा पहिला मान देवाला किंवा सृष्टिकर्त्याला ज्याने हे धान्य तयार केले त्याला दिला जायचा. त्याचबरोबर नव्या धान्याचा आनंदोत्सव पण साजरा केला जायचा.
एकेकाळी लोक हे पोहे लाकडी उखळीत मुसळांनी कांडून किंवा लाटीवर कांडून करायचे. कापणी-मळणी लगबगीने उरकून लोक पोह्यांच्या कामाला लागायचे. या दिवसांमध्ये शेतकर्‍यांची घरे नव्या धनधान्याने अन् ताज्या पोह्यांच्या गोड दरवळाने भरून गेलेली असायची. आज बहुतेक लोकांनी शेती सोडलेली आहे. शिवाय आता पोह्यांच्या गिरणी झालेल्या आहेत. शिवाय जवळच्या किराणा दुकानातून पोहे विकत मिळत असल्याने गावातील हा गोड दरवळ हरवलेला आहे किंवा तो अपवादानेच हुंगता येत आहे.

दिवाळी म्हणजे धनलक्ष्मीचा उत्सव असल्याने याच दिवशी अथवा तिथीपरत्वे अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. गोव्यात काही वर्षांअगोदर दुकानदार, व्यापारीच अमावस्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन करायचे.
आज घरांमध्येही पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. ग्रामीण भागात दिवाळीच्या दिवशी नवी झाडू (नारळीच्या चुडतांच्या विरांपासून बनवलेली झाडू) पाटावर ठेवून तिची पूजा केली जाते अन् मग त्या झाडूने घर झाडलं जातं. झाडूला ग्रामीण लोक लक्ष्मी मानतात. ही प्रथासुद्धा मुद्दाम नोंद घेण्यासारखी आहे.

गोव्यात वसुबारशेची परंपरा नसली तरी बैलपाडव्याची प्रथा आहे. याला ‘गोरवां पाडवो’ असेही म्हणतात. हा पाडवा दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल प्रतिपदे दिवशी असतो. या दिवशी गुरांना सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना पोळे-सान्ना खायला घालतात अन् मोकळेपणाने त्यांना चरायला सोडतात. या दिवशी कोणी त्यांना राखत नाही किंवा कोण काठी मारत नाही. नवीन दाव्यांचीही (दोर) या दिवशी पूजा केली जाते. ही नवीन दावी त्या दिवशी संध्याकाळी गुरांच्या गळ्यात बांधली जातात. या दिवशी शेतीप्रधान गावांमध्ये राखणे घरोदारी जाऊन अंगणात बनवलेल्या शेणाच्या गोठ्यापुढे (काही लोक याला ‘गवळ’ तर काहीजण ‘गोवर्धन’ म्हणतात) ‘धेणलो’ नाचवतात. धेंणलो हा गुराख्यांचा देव मानतात. त्याला गुरांच्याच गळ्यातून काढलेल्या फुलांच्या (खास करून झेंडू) माळांनी सजवले जाते. धेंणलो नाचवल्यानंतर गुराख्यांच्या (पोरांच्या) टोळीला प्रत्येक घरातून नारळ-तांदूळ इत्यादीची तळी दिली जाते, ज्यांचे ते नंतर जेवण बनवून जेवतात.
पाडव्याच्या दुसर्‍या दिवशी येणारी तिथी म्हणजे भाऊबीज. बहीण-भावाच्या नात्याची वीण मजबूत करणारा हा सण. गोव्यात काही वर्षांपूर्वी याचं तेवढंसं प्रस्थ नव्हतं. हल्ली मात्र सर्व स्थरांवर भाऊबिज साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावांची एवाळणी करून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.

इतर राज्यांत भाऊबिजेने दिवाळीचा सण खरं तर संपतो; गोव्यात मात्र तो कार्तिक द्वादशी ते कार्तिक पौर्णिमा या पाच दिवसांच्या देवदिवाळीने म्हणजे तुलसीलग्नाच्या सोहळ्याने संपन्न होतो. या दिवाळीला मोठी दिवाळी असेही म्हटले जाते.
…तर असा हा दिवाळीचा खरं तर उत्साहाचा, उल्हासाचा उत्सव. यंदा मात्र कोरोना महामारीच्या संसर्गाच्या छायेत या उत्सवावर बरेच विरजण पडलेले दिसते. अजूनही कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत. सरकाराने नरकासुर व इतर सामूहिक कार्यांसाठी मान्यता दिलेली असली तरी सरकारच्या एस.ओ.पी.खाली ते होणे बंधनकारक आहे. अजूनही सामान्य जनतेच्या मनातील कोविडची भीती गेलेली नाही. अजूनही लोकांचं प्रत्यक्ष भेटणं-मिसळणं पूर्वीसारखं सुरू झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे बिघडलेली लोकांची अर्थिक स्थिती अजूनही पूर्ववत झालेली नाही. अशा या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी आली. त्या जगत्‌कर्त्याशी प्रार्थना आहे की ही दिवाळी हे कोरोनाचे तिमिर दूर करण्यास समर्थ ठरो!