शेतकरी-सरकारमध्ये आज होणार चर्चा

0
107

नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याच्या शेतकरी संघटनांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना आज बुधवार दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बैठकीला बोलावले आहे. आज होणारी ही चर्चेची सातवी फेरी आहे. आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास महिनाभरापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही तोडगा न निघालेला नाही. दरम्यान, पंतप्रधानांवर दबावतंत्राचा परिणाम होणार नाही, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी स्पष्ट केले आहे. तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या भूमिकेवर शेतकरी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे दिसत आहे.

विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकर्‍यांना आंदोलनाची काय गरज होती? असा सवालही यावेळी भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केला आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाला काही राजकीय पक्षांची फूस आहे. या आंदोलनाच्या आडून विरोधी पक्ष राजकारण करत आहेत, हे आंदोलन विरोधी पक्षांच्या ताब्यात गेले आहे अशी विविध विधाने येत असून त्या चर्चांवर राकेश टिकैत यांनी वरील विधान केले आहे.

आश्‍वासनांवर विश्‍वास नाही
टिकैत म्हणाले की, जर तुम्ही जुन्या घडामोडी पाहिल्या तर विश्वास ठेवण्याचे कुठलेच कारण दिसत नाही. जर सरकार कायद्यात बदल करण्यास तयार आहे. तर मग कायदे मागे घेण्यात काय अडचण आहे? आणि त्याचमुळे केंद्र सरकारच्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवता येणार नसल्याचे टिकैत म्हणाले.

आंदोलकांसाठी केरळमधून अननस
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकर्‍यांसाठी केरळच्या शेतकरी संघटनांनी १६ टन अननस एका ट्रकमध्ये भरून पाठवले आहेत. हा ट्रक दिल्लीला पाठवण्यासाठी येणारा सगळा खर्च या शेतकर्‍यांनी आपल्या खिशातून केला आहे. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वझाकुलममधून हा ट्रक रवाना झाला.

’आप’कडून मोफत वाय-फाय
दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाकडून मंगळवारी आंदोलक शेतकर्‍यांना मोफत वाय-फाय पुरवण्याची घोषणा करण्यात आली. पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी सिंघू सीमेवर वाय-फाय हॉटस्पॉट लावण्यात येणार असल्याचे सांगितले.