>> विविध भागातील शेतकरी उतरणार रस्त्यावर
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा देशातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असून उद्या मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीला मोर्चा नेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मोदी सरकारकडून बळीराजाच्या प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात पंजाब आणि हरियाणाव्यतिरिक्त देशाच्या विविध भागांतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.
उद्या दिल्लीकडे मोर्चा
किसान युनियन, पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी उद्या 13 फेब्रुवारीला मोठ्या संख्येने दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने केंद्र सरकारही चिंतेत असून 2020-21 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. त्यात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सरकारकडे आधारभूत किमतीच्या अंमलबजावणीची हमी देण्याची मागणी केली आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांनाही पेन्शनची सुविधा व पीक विमा द्यावा अशी मागणी आहे.
2020 च्या शेतकरी आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते ते रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी आहे. त्याचप्रमाणे एमएस स्वामीनाथन आयोगाने सरकारला केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.