शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांविरूद्ध दडपशाही : कॉंग्रेस

0
147

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केलेल्या दिशा रवी या युवतीला खलिस्तानवाद्यांची हस्तक ठरवून मोदी सरकारने अटक केलेली असून सरकारविरूद्ध आवाज उठवणार्‍या लोकांचा आवाज बंद केला जात आहे असा आरोप काल कॉंग्रेसने केला. या दडपशाहीचा महिला कॉंग्रेस तीव्र निषेध करीत असल्याचे प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवी दिल्लीत गेल्या ८० दिवसांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन चालू असून सुमारे २०० शेतकर्‍यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, मोदी सरकारला या शेतकर्‍यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे सांगून त्यांना पाठिंबा व्यक्त करणार्‍या दिशा रवीसारख्या कोवळ्या युवतीला अतिरेक्यांची हस्तक ठरवले जात आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या. मोदी सरकारने देशात हुकूमशाही चालवली असल्याचा आरोपही यावेळी कुतिन्हो यांनी केला.

देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारविरोधात बोलणारे युवक, विद्यार्थी, महिला, दलित तसेच अल्पसंख्यक समाजातील लोकांना लक्ष्य करू लागले असल्याचा आरोपही कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत केला. सरकारच्या गैरकृत्यांवर लिहिणार्‍या पत्रकारांनाही तुरूंगात डांबले जात असल्याचे सांगून महिला कॉंग्रेस याचा निषेध करीत असून दिशा रवीला न्याय मिळायला हवा, असे सांगून तिची सुटका करण्यात यावी अशी अखिल भारतीय महिला कॉंग्रेसची मागणी असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.